Breaking News

Womens T20 World Cup: श्रीलंकेला एकतर्फी लोळवत भारतीय संघाची मुसंडी, सेमी-फायनलच्या आशा उंचावल्या

womens t20 world cup
Photo Courtesy: X/BCCI Womens

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारताने आपला तिसरा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध (INDW v SLW) खेळला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयाने आपल्या गटात दुसऱ्या स्थानी पोचलेल्या भारताच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

भारतीय संघाला आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले होते. भारताचा अखेरचा सामना विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार असल्याने, हा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर भारताला शफाली वर्मा व स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी 91 धावांची मोठी सलामी दिली. स्मृती हिने अर्धशतक ठोकले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने नाबाद अर्धशतक ठोकत भारताला 168 पर्यंत पोहोचवले. यानंतर भारताच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट मारा केला. रेणुका ठाकूर व आशा शोभना यांनी श्रीलंकेचा डाव 90 धावांमध्ये गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हरमनप्रीतला तिच्या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार दिला गेला.

भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवत सरस धावगतीच्या जोरावर पाकिस्तान व न्यूझीलंड यांना मागे सारत दुसरे स्थान पटकावले. भारतीय संघाला आता अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. त्याआधी, श्रीलंकेने न्यूझीलंडला हरवल्यास भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला तरी उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

(Womens T20 World Cup 2024 India Beat Srilanka In Must Win Match)

IND v BAN Delhi T20I: दिल्लीचे तख्त राखत टीम इंडियाने जिंकली मालिका, सूर्याच्या नेतृत्वात तिसरा मालिकाविजय