Team India Schedule : रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये व्यस्त आहे. 24 जूनपर्यंत भारतीय संघाला स्पर्धेतील सुपर 8 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सुपर 8 फेरीतील प्रदर्शनानुसार संघ उपांत्य फेरीचे तिकीट मिळवतील. उपांत्य फेरी सामने 26 जून आणि 27 जून रोजी होणार आहेत. अखेर 29 जूनला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. मात्र भारतीय संघाला टी20 विश्वचषकाच्या समाप्तीनंतरही विश्रांती करायला वेळ मिळणार नाही. कारण भारताचे वर्षभराचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. अशातच आज बीसीसीआयने आणखी एका दौऱ्याची घोषणा आहे.
भारतीय संघाला नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 टी20 सामने खेळायचे आहेत. 5 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपताच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या एका आठवड्याच्या कालावधीत एकूण 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील.
भारत वि. दक्षिण आफ्रिका वेळापत्रक-
8 नोव्हेंबर: पहिला टी-20, डर्बन
10 नोव्हेंबर: दुसरी टी20, पोर्ट एलिझाबेथ
13 नोव्हेंबर: तिसरी टी-20, सेंच्युरियन
15 नोव्हेंबर: चौथा टी20, जोहान्सबर्ग
🚨 NEWS 🚨
BCCI-CSA announce schedule of South Africa-India T20I series. #TeamIndia | #SAvIND
More Details 🔽https://t.co/JIi6wcoPcP
— BCCI (@BCCI) June 21, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत पाच मालिका खेळणार
टी20 विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघाला झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. यानंतर बीसीसीआयचा हा हंगाम संपणार आहे. भारतीय संघाचा पुढील हंगाम सप्टेंबरपासून सुरू होत असून या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत सातत्याने मालिका खेळायच्या आहेत. त्याची सुरुवात बांगलादेशपासून होईल, ज्यांच्या विरुद्ध 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत घरच्या मैदानावर 2 कसोटी आणि 3 टी20 सामने होतील.
अवघ्या चार दिवसांनंतर, 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 3 कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका संपताच 8 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान इंग्लंडचा संघ 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियालाही ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. अशाप्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाला एकूण 5 मालिका खेळायच्या आहेत.