Breaking News

Gautam Gambhir ने पूर्ण केले वर्तुळ! कॅप्टन आणि मेंटर म्हणून उचलली KKR साठी IPL ट्रॉफी

gautam gambhir
Photo Courtesy: X

Gautam Gambhir|आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई येथे पार पडला. अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी नमवत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वातील या संघाने ही कामगिरी करून दाखवली. त्याचवेळी यंदा प्रथमच केकेआरचे मेंटर पद मिळवलेल्या गौतम गंभीर याने देखील संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. दहा वर्षांपूर्वी केकेआरला कर्णधार असताना अखेरच्या वेळी त्यानेच विजेतेपद जिंकून दिले होते. त्यामुळे यंदा हे वर्तुळ पूर्ण झाले.

आयपीएलच्या सुरुवातीला पहिले तीन हंगाम गंभीर याने दिल्ली डेअरडेविल्स संघासाठी खेळले होते. त्यानंतर त्याला 2011 मध्ये केकेआरने त्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून आपल्या ताफ्यात करून घेतले. गंभीरने संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय दुसऱ्याच वर्षी सार्थ ठरवत केकेआरला पहिल्यांदा विजेता बनवले. त्यानंतर पुन्हा एकदा 2014 मध्ये त्याने ही किमया करून दाखवली. यानंतर आणखी तीन वर्ष गंभीर केकेआर संघाचा भाग राहिला. मात्र, त्याला आपल्या संघाला पुन्हा विजेता बनवता आले नाही.

आयपीएल 2018 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार बनला. परंतु अर्ध्या हंगामातून त्याने श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवत निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो सक्रिय राजकारणात सामील झाला. 2019 मध्ये खासदार बनल्यानंतर त्याने फक्त समालोचनात हात आजमावला. मात्र, 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा समावेश झाल्यानंतर त्याच्याकडे मेंटर पद दिले गेले. इथे देखील त्याने आपल्या मॅनेजमेंटचे कौशल्य दाखवले आणि संघाला सलग दोन हंगाम प्ले ऑफ्सपर्यंत नेले.

आयपीएल 2024 लिलावाआधी केकेआरने आपला सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या गंभीरला मेंटर म्हणून आणले. लिलावात मिचेल स्टार्क याच्यासाठी सर्वात मोठी बोली लावणे असो किंवा महत्त्वाच्या युवा खेळाडूंना संघात स्थान देणे असो हे काम त्याने केले. संघाच्या पहिल्याच ट्रेनिंग सेशनमध्ये आपण यावर्षी जिंकणारच आहोत असा विश्वास त्याने निर्माण केला. त्यानंतर आता अंतिम सामन्यात ट्रॉफी जिंकून त्याने दिलेला शब्द पूर्ण करत, विनिंग कॅप्टन ते विनिंग मेंटर असे वर्तुळ पूर्ण केले.

(Gautam Gambhir Complete Circle Of IPL Winning Captain To IPL Winning Mentor For KKR)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version