T20 World Cup | सर व्हिव्हीयन रिचर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरद्ध झालेल्या टी२० विश्वचषकातील (T20 World Cup 2024) २४व्या सामन्यात नवख्या नामिबिया संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नामिबियाचा संघ अवघ्या ७२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ५.४ षटकातच ९ गडी राखून नामिबियावर विजय मिळवला. या सामन्यादरम्यान नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस (Gerhard Erasmus) याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या नामिबियाकडून कर्णधार इरास्मसने संघर्षपूर्ण खेळी केली. ४३ चेंडूंचा सामना करताना इरास्मसने नामिबियाकडून सर्वाधिक ३६ धावा केल्या. परंतु या खेळीदरम्यान एक लज्जास्पद विक्रम त्याच्या नावावर झाला. इरास्मसने पहिली धाव काढण्यासाठी तब्बल १७ चेंडू खर्च केले. यासह इरास्मस हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे ज्याने खाते उघडण्यासाठी १७ चेंडू खेळले. तसेच यासह इरास्मसने १७ वर्षांचा लज्जास्पद विक्रमही मोडला.
यापूर्वी हा नकोसा विक्रम केनियाच्या तन्मय मिश्राच्या नावावर होता. २००७मध्ये चौरंगी टी२० मालिकेदरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मिश्राने १६ चेंडूंत आपले खाते उघडले होते. आता मिश्राच्या नावावरील हा लाजीरवाणा विक्रम नामिबियाचा कर्णधार इरास्मसच्या नावावर जमा झाला आहे.
Namibia skipper Gerhard Erasmus took 17 balls to get off the mark against Australia.
– It’s the longest any batter has taken to get off the mark in T20i history. pic.twitter.com/j898EcFtcf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 12, 2024
इरास्मसची संघर्षपूर्ण खेळी
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसला पहिली धाव काढण्यासाठी बराच वेळ लागला तरीही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाची लाज वाचवली. इरास्मसने ४३ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या, याच्या मदतीने नामिबियाचा संघ ७२ धावा करू शकला. मार्कस स्टॉइनिसने इरास्मसची विकेट काढली.