Breaking News

IND v BAN: तिसऱ्या दिवशी भारताला कसोटी जिंकण्याची संधी, बांगलादेशसमोर 515 धावांचे आव्हान

IND V BAN
Photo Courtesy: X/BCCI

IND v BAN Chennai Test Day 3: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली. चेन्नई (Chennai Test) येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) व रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी पहिल्या सत्रात आक्रमक फटकेबाजी केली. दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर, तिसऱ्याच षटकात रिषभ पंतने आपल्या शतकाला गवसणी घातली. पंत परतल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुबमन गिल याने देखील आपले पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. गिलच्या शतकानंतर भारतीय संघाने काही काळ वेगवान धावा करत आपला डाव घोषित केला. त्यामुळे आता बांगलादेश समोर उर्वरित अडीच दिवसात 515 धावा बनवण्याचे अशक्यप्राय आव्हान असेल.

IND v BAN Chennai Test Day 3

दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने तीन बाद 81 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी पहिली काही षटके सावध खेळल्यानंतर, गिल व पंत या जोडीने आक्रमण केले. या दोघांनी नाबाद राहत पहिल्या सत्रात केवळ 28 षटकात 124 धावा केल्या. जेवणासाठी खेळ थांबला तेव्हा गिल 137 चेंडूंमध्ये 86 व पंत 108 चेंडूंमध्ये 82 धावा काढून नाबाद होते.

Photo Courtesy: X

दिवसातील दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर पंत याने शतकासाठी जास्त वेळ घेतला नाही. त्याने पहिल्या षटकात मिराज याला एक षटकार व एक चौकार ठोकत नव्वदीत प्रवेश केला. त्यानंतर तिसऱ्या षटकात शाकिबच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने आपले सहावे कसोटी शतक पूर्ण केले. शतकानंतर मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. त्याने 128 चेंडूंमध्ये 13 चौकार व चार षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या.

पंत बाद झाल्यानंतरही गिलने आपला संयम सोडला नाही. त्याने आपल्या शतकाच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण केले. अखेर त्याने आपला कसोटीतील उत्कृष्ट फॉर्म कायम राखत, पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. यासाठी त्याने 161 चेंडू खेळले.

शतकानंतर गिल व केएल राहुल यांनी आक्रमक खेळावर भर दिला. दोघांनी वेगाने धावा बनवत संघाला 500 ची आघाडी मिळवून दिली. अखेर दुसऱ्या डावात 4 बाद 287 धावा बनवून भारतीय संघाने बांगलादेश समोर 515 धावांचे मोठे आव्हान ठेवले. गिल याने नाबाद 119 व राहुलने 22 धावा बनवल्या. बांगलादेशसाठी मेहदी हसन मिराज याने सर्वाधिक दोन बळी मिळवले.

(IND v BAN Chennai Test Day 3 Updates)

IND v BAN: दुसरा दिवस भारताचा! घातक गोलंदाजीच्या बळावर मिळवली 300+ ची आघाडी, वाचा सर्व अपडेट

Exit mobile version