Breaking News

IND v NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे जोरदार कमबॅक! बेंगळुरू कसोटी रंगतदार अवस्थेत

ind v nz
Photo Courtesy: X

IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोमांचक खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने झळकावलेले शानदार शतक, टीम साऊदीचे आक्रमक अर्धशतक व दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली तुफानी फलंदाजी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघ केवळ 46 धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्यानंतर डेवॉन कॉनवे याच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कुच केलेली. तिसऱ्या दिवशी मधल्या फळीतील फलंदाज फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, युवा रचिन रविंद्र याने अनुभवी टीम साऊदीला साथीला घेत शतकी भागीदारी केली. रचिन याने 134 धावा करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. तर, साऊदीने अर्धशतक झळकावले. दोघांचा फलंदाजामुळे न्यूझीलंडने 402 धावांपर्यंत मजल मारली. यासह त्यांनी पहिल्या डावात भारतावर तब्बल 356 धावांची आघाडी घेतली. भारतासाठी कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

मोठी पिछाडी भरून काढण्याचे आवाहन असलेल्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व यशस्वी जयस्वाल यांनी 72 धावांची सलामी दिली. यशस्वीने 35 धावा केल्या. तर, रोहितने केवळ 63 चेंडूंमध्ये 52 धावांचा दणका दिला. भारतीय संघ पुन्हा ढेपाळणार का असा प्रश्न निर्माण झाला असताना, अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) व युवा सर्फराज खान (Sarfaraz Khan) यांनी धुरा सांभाळली. दोघांनी आक्रमक फटकेबाजी करताना 136 धावांची शानदार भागीदारी केली. विराट दुर्दैवीरित्या दिवसातील अखेरच्या चेंडूवर 70 धावा करून बाद झाला. तर, सर्फराज 70 धावा काढून नाबाद आहे. सध्या भारत 125 धावांनी पिछाडीवर असून, चौथ्या दिवशी ही पिछाडी भरून काढत न्यूझीलंडला पुढे मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.

(IND v NZ Team India Fight Back In Bengaluru Test On Day 3)

Exit mobile version