
India Beat South Africa In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना रांची येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार संघर्ष केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी करत 17 धावांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहली (Virat Kohli) याचे शतक व कुलदीप यादव याची गोलंदाजी निर्णायक ठरली.
India Beat South Africa In Ranchi ODI
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यशस्वी जयस्वाल केवळ 18 धावांवर बाद झाल्याने भारताची सुरुवात खराब झाली. मात्र, रोहित शर्मा व विराट कोहली या अनुभवी जोडीने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी 100 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने आपापली अर्धशतके पूर्ण केली. रोहितने 57 धावा जमवल्या. यादरम्यान त्याने वनडे इतिहासात सर्वाधिक 352 षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी केवळ 190 चेंडूंमध्ये 136 धावा फटकावल्या. चौथ्या क्रमांकावर आलेला ऋतुराज गायकवाड 8 धावांचे योगदान देऊन बाद झाला.
विराटने आपली खेळी आक्रमकपणे पुढे नेत वनडे कारकिर्दीतील 52 वे शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. बाद होण्यापूर्वी त्याने 11 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने आपली 135 धावांची खेळी सजवली. कर्णधार केएल राहुलने 60 व रवींद्र जडेजाने 32 धावा करत भारताला 349 पर्यंत पोहचवले.
विजयासाठी 350 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. हर्षित राणा याने दुसऱ्या षटकात रेयान रिकल्टन व क्विंटन डी कॉक यांना खातेही खोलू न देता तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार ऐडन मार्करम हा देखील केवळ 7 धावा बनवू शकला. मात्र, त्यानंतर टोनी डी झोर्झी व मॅथ्यू ब्रित्झके यांनी 66 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान जिवंत ठेवले. झोर्झी याने 39 धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेल्या युवा डेवाल्ड ब्रेविस याने फटकेबाजी करत आक्रमक 37 धावा काढल्या.
ब्रेविस बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका झटपट बाद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, मार्को जेन्सन यांनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला करत 39 चेंडूमध्ये 70 धावा तडकावल्या. जेन्सन व ब्रित्झके या जोडीने 97 धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने एकाच षटकात दोघांना बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या आशा कमी केला. ब्रित्झके याने 72 धावा काढल्या. अखेरीस कॉर्बिन बॉश याने 51 चेंडूत 67 धावा करत विजयासाठी संघर्ष केला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी अचूक मारा करत, भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शानदार शतक ठोकणारा विराट कोहली सामनावीर ठरला.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल