Breaking News

डॉक्टर्स डे स्पेशल: कोण आहेत Dr Dinshaw Pardiwala ? ज्यांच्यावर आहे प्रत्येक भारतीय खेळाडूचा 100% विश्वास

dr dinshaw pardiwala
Photo Courtesy: X

Dr Dinshaw Pardiwala Hope Of Every Indian Athlete: संपूर्ण देशभरात 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे (Doctors Day) साजरा केला जातो. खेळाचे मैदान आणि डॉक्टर्स यांचा खूप जवळचा संबंध आहे. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी व दुखापत झाल्यास त्यातून खेळाडूंना पुन्हा भरारी घेण्यासाठी हे डॉक्टरच मदत करत असतात. त्याचवेळी, भारतीय क्रीडाविश्वात एक असे डॉक्टर आहेत, ज्यांच्यावर प्रत्येक भारतीय खेळाडू डोळे झाकून विश्वास ठेवतो. क्रिकेटपासून कबड्डी, सचिन तेंडूलकरपासून नीरज चोप्रा या सर्वांना त्यांच्या दुखापतीच्या काळातून पुन्हा यशाकडे घेऊन जाणारे हे डॉक्टर आहेत डॉ. दिनशॉ पारडीवाला. डॉक्टर्स डे निमित्त आपण डॉक्टर पारडीवाला यांच्याविषयी जाणून घेऊया.

Who Is Dr Dinshaw Pardiwala

डॉक्टर पारडीवाला हे नाव सातत्याने चर्चेत असते. कोणताही भारतीय क्रिकेटपटू अथवा इतर खेळातील खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्यांच्याकडेच गेलेले दिसतात. जवळपास 25 वर्षाचा अनुभव असलेले पारडीवाला हे सध्या मुंबईतील प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ऑर्थ्रोस्कोपी व शोल्डर सर्विस विभागात संचालक आहेत. यासोबतच अमेरिकन सर्जन ऑफ स्पोर्ट मेडिसिन संचालकीय मंडळावर देखील त्यांची वर्णी लागली होती. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पोर्ट्स मेडिसिन कमिटीवर त्यांचा समावेश केला गेलेला. वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या कामासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिसून येतात.

क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाल्यास सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व एमएस धोनी यांच्यावर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याचा दुर्दैवी अपघात झाल्यानंतर, त्याला मैदानापर्यंत पुन्हा आणण्यात पारडीवाला यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पंत आणि त्याच्या आईने देखील यासाठी त्यांचे सार्वजनिकरित्या आभार मानले होते. पारडीवाला हे बीसीसीआयच्या मेडिकल कमिटीवर असल्याने, प्रत्येक खेळाडूच्या दुखापतीविषयी त्यांना माहिती दिली जाते.

इतर खेळांचा विचार केल्यास भारताला दोन ऑलिम्पिक पदक जिंकून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा, ऑलिम्पिक विजेता सुशील कुमार, साईना नेहवाल, पीव्ही सिंधू व बजरंग पुनिया यांच्यासारख्या अनेक ऍथलिटना तंदुरुस्त ठेवण्याचे काम ते करतात. पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये ते भारतीय पथकाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून गेले होते. विनेश फोगट हिला ऑलिंपिक फायनलसाठी 100 ग्रॅम वजन कमी करण्याकरिता त्यांनी अपार मेहनत घेतली होती. मात्र, अखेर विनेश तो अंतिम सामना खेळू शकली नव्हती. त्यानंतर झालेल्या वादावर पारडीवाला यांच्या प्रतिक्रियेनंतरच पडदा पडलेला.

डॉक्टर पारडीवाला यांच्या फी विषयी अनेकदा चर्चा होत असते. मात्र, त्यांची कन्सल्टेशन फी 2500 इतकी कमी असल्याचे सांगण्यात येते. तर, शस्त्रक्रियांसाठी ते 2 लाख ते चार लाखांपर्यंत फी घेत असल्याचे बोलले जाते. मात्र, अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Rufus The Hawk: 17 वर्षांपासून विम्बल्डनवर करडी नजर ठेवणाऱ्या रूफसची कहाणी

Exit mobile version