Breaking News

ZIM vs IND: विश्वविजेत्या भारताला पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेचा धोबीपछाड! गिलची यंग इंडिया 102 धावांत ढेर, यजमानांची मालिकेत आघाडी

ZIM VS IND
Photo Courtesy: X/Zimbabwe Cricket

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत (IND vs ZIM) यांच्या दरम्यानचा पहिला टी20 सामना हरारे येथे झाला. झिम्बाब्वे संघाला केवळ 115 धावांवर रोखल्यानंतर, भारतीय फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला. घरच्या मैदानावर खेळताना झिम्बाब्वे संघाने भारताला 13 धावांनी हरवले. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या या सामन्यात यजमान संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, भारतीय गोलंदाजानी शानदार कामगिरी करत झिम्बाब्वेला केवळ 115 धावांवर रोखण्यात यश मिळवले. झिम्बाब्वेचे 9 फलंदाज केवळ 90 धावांवर बाद झाल्यानंतर, यष्टीरक्षक मडांडे याने अखेरपर्यंत किल्ला लढवत महत्वपूर्ण नाबाद 29 धावा केल्या. भारतासाठी फिरकीपटू रवी बिश्नोई याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या 116 धावांचा पाठलाग करताना भारताला चौथ्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. पदार्पण करणारा अभिषेक शर्मा खातेही खोलू शकला नाही. यानंतर ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग व ध्रुव जुरेल हे दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. कर्णधार शुबमन गिल याने 31 धावांचे योगदान दिले. संघ अडचणीत असताना वॉशिंग्टन सुंदर याने अखेरपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. तीन बळी मिळवणारा झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सामनावीर ठरला.

(ZIM vs IND Zimbabwe Beat India By 13 Runs Sikander Raza Shines)

Exit mobile version