Breaking News

खळबळजनक! विश्वविजेत्या खेळाडूच्या घरावर ह’ल्ला, भीतीने सोडले शहर

james vince
Photo Courtesy: X

Attack On James Vince House: इंग्लंड क्रिकेट वर्तुळाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज ‌जेम्स विन्स (James Vince) याच्या घरावर दुसऱ्यांदा ह’ल्ला झाला असून, त्याने भीतीपोटी आपल्या कुटुंबासह शहर सोडले आहे.‌ एक सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली (England Cricketer James Vince).

जेम्स विन्स याने आपल्या सोबत घडलेल्या आपबीतीची कहाणी एका पोस्टद्वारे सांगितली. त्याच्या म्हणण्यानुसार, यावर्षीच 1 मे रोजी त्याच्या घरावर काही लोकांनी ह’ल्ला केला होता. त्यांनी त्याच्या घरातील भिंतींची व सामानाची नासधूस केलेली. त्यावेळी सावध असलेल्या विन्स याने आपल्या तेथून सुरक्षित स्थळी नेले होते. पुढे त्या पूर्ण भागाची दुरुस्ती करण्यात आली.

आता पुन्हा एकदा त्याच्यावर तसाच प्रसंग ओढावला असून, त्याच्या कारची तोडफोड करण्यात आली. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन व्यक्ती त्याच्या कारवर विटा मारत काचा फोडताना दिसत आहेत. या दोन हल्ल्यामुळे घाबरलेल्या विन्स यांनी आता आपल्या कुटुंबासह नॉर्दम्पटन शहर सोडले असून, तो दुसरीकडे स्थलांतरित झाला आहे.‌ यासोबतच त्याने लोकांना आवाहन केले आहे की, या हल्लेखोरांबद्दल काहीही माहित असल्यास हॅम्पशायर पोलिसांना कळवावे.

सध्या हॅम्पशायर पोलिस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत. भूतकाळातील काही आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, अद्याप तरी त्याने कोणत्याही संशयिताला अटक केलेली नाही.

जेम्स विन्स याने इंग्लंडसाठी 2015 मध्ये पदार्पण केले होते. मात्र, तो मोठ्या कालावधीसाठी संघात आपली जागा बनवू शकला नाही. त्याला केवळ 13 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. तर त्याने 25 वनडे सामन्यात राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले. इंग्लंडने 2022 मध्ये जिंकलेल्या टी20 विश्वचषक संघाचा तो सदस्य होता. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2023 मध्ये खेळला आहे.

(At’tack On English Cricketer James Vince House)

 

Exit mobile version