Breaking News

जमील पर्वाची सनसनाटी सुरूवात! CAFA Nations Cup 2025 च्या पहिल्याच सामन्यात मिळवला विजय

India Beat Tajikistan In CAFA Nations Cup 2025: भारतीय पुरुष फुटबॉल संघाने ताजिकिस्तान येथे खेळल्या जात असलेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात यजमान ताजिकिस्तानला 2-1 असे पराभूत करत सनसानाटी निकाल नोंदवला. खालिद जमील (Khalid Jamil) यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. 

India Beat Tajikistan In CAFA Nations Cup 2025

तब्बल 21 महिन्यांपासून विजय न मिळवलेल्या भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. जमील यांनी अनेक अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेच, मोहन बागान सुपरजायंट्सने आपल्या क्लबचे खेळाडू या स्पर्धेसाठी भारतीय संघात पाठवण्यास नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारतीय फुटबॉल संघ मैदानात उतरलेला.

भारतीय संघासाठी पाचव्याच मिनिटाला पहिला गोल अन्वर अली याने केला. त्यानंतर आठ मिनिटांनी संदेश झिंगन याने आणखी एक गोल करत भारताची आघाडी वाढवली. सामन्यातील 23 व्या मिनिटाला ताजिकिस्तानने गोल करत पुनरागमनाचा प्रयत्न केला. भारताचा कर्णधार गुरप्रीत सिंग संधू याने एक पेनल्टी वाचवत भारतीय संघाचा विजय निश्चित केला. संदेश झिंगन याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

ताजिकिस्तान फिफा क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या म्हणजे 105 व्या क्रमांकावर आहे. तब्बल 16 वर्षानंतर भारत ताजिकिस्तानला पराभूत करण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात पंचांनी अनेक निर्णय ताजिकिस्तानच्या बाजूने दिल्याचे दिसले. या स्पर्धेत भारताचे उर्वरित दोन साखळी सामने इराण व अफगाणिस्तानविरुद्ध होतील. विशेष म्हणजे, मलेशिया संघाने नकार दिल्यानंतर भारताला ऐनवेळी या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.

 

Exit mobile version