
Kartik Sharma Bags Big Money In IPL Auction 2026: आयपीएल 2026 (IPL 2026) साठी खेळाडूंचा मिनी लिलाव नुकताच पार पडला. सर्व दहा संघानी आपले प्रमुख खेळाडू यापूर्वीच कायम ठेवलेले. अबुधाबी येथे झालेल्या या लिलावात राजस्थानचा युवा यष्टिरक्षक फलंदाज कार्तिक शर्मा (Kartik Sharma) हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर 14 कोटी 20 लाखांची बोली लावली. अवघ्या 19 वर्षाच्या कार्तिकला मिळालेली ही रक्कम पाहून अनेकांनी डोळे विस्फारले. त्याच कार्तिकची गोष्ट आपण जाणून घेऊ.
Kartik Sharma New CSK Sensation
आयपीएल रिटेन्शननंतर अचानकपणे राजस्थानचा युवा यष्टिरक्षक फलंदाज कार्तिक शर्मा हा चर्चेत आला होता. दिल्लीविरुद्ध रणजी सामन्यात तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. त्याने कर्णधार महिपाल लोमरोर याच्यासोबत 225 धावांची भागीदारी केलेली. यामध्ये कार्तिकने 120 धावांची खेळी केली. या खेळीत पाच चौकार आणि तब्बल नऊ षटकार सामील होते. याआधी मुंबईविरुद्ध त्याने 139 धावांची खेळी केली होती. मागील हंगामात पदार्पण करताना त्याने उत्तराखंडविरूद्धही शतकी मजल मारलेली.
रणजी ट्रॉफीप्रमाणेच लिस्ट ए पदार्पणात विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने महाराष्ट्राविरूद्ध 90 चेंडूत 7 चौकार व 11 षटकारांच्या मदतीने 123 धावा कुटलेल्या. टी20 मध्ये आतापर्यंत केवळ 7 सामने तो खेळला आहे. यामध्ये 164 चा स्ट्राईक रेट राखण्यात त्याला यश आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये सुरुवातीचे सामने खेळल्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता. तरी, देखील अनेक संघ त्याला आपल्याकडे खेचण्यासाठी उत्सुक होते.
कार्तिक याने वयाच्या पाचव्या वर्षी प्लास्टिक बॅटने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याचे वडील देखील क्रिकेटपटू होते. मात्र, त्यांना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी लहानपणापासून त्याला फक्त मोठे फटके मारायला शिक असाच सल्ला दिला होता.
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर याचे वडील व राहुल चहर याचे काका लोकेंद्र हेच कार्तिक याचे प्रशिक्षक आहेत. “छक्के मारनेवाला खिलाडी बनना है” असे त्याने चहर यांना म्हटले होते. तो दीपक व राहुल यांनाच आपला आदर्श मानतो. त्यांना खेळताना पाहून आपण मोठे झाल्याचे त्याने प्रामाणिकपणे सांगितले. लोकेंद्र यांनी दीपक व राहुल यांच्याप्रमाणे त्याला प्रशिक्षण व प्रेम दिल्याचे कार्तिक सांगतो.
चहर अकादमीसाठी खेळताना त्याने 50 षटकांच्या सामन्यात 300 धावा देखील केल्या आहेत. सुरुवातीला केवळ फलंदाज म्हणून खेळणाऱ्या कार्तिक याला चहर यांनी यष्टिरक्षक बनण्याचा सल्ला दिला होता. कित्येकदा त्याच्या हट्टामुळे त्याच्या अकादमीच्या संघाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावी लागते. कारण, विरोधी संघ लवकर बाद झाल्यास आपल्याला फलंदाजीची कमी संधी मिळते, असे कार्तिकचे म्हणणे असते. त्याचा आवडता खेळाडू वीरेंद्र सेहवाग असून, राजस्थान संघाचे त्याचे प्रशिक्षक अंशू जैन त्याला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ असे म्हणतात. कार्तिक 16 वर्षांचा असताना त्यांनी तो लवकरच भारतीय संघासाठी खेळणार असल्याचे भाकित केले होते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कधी होणार Vaibhav Suryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री? प्रशिक्षकांनीच दिली महत्वाची अपडेट
अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये कार्तिकचा खेळ पाहून आयपीएल फ्रॅंचाईजींनी त्याला ट्रायलसाठी बोलवले होते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स यांचा समावेश होता. तसेच, रणजी ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर सर्व संघांचे लक्ष होते.
लिलावात अनकॅप्ड भारतीय यष्टिरक्षकांच्या पहिल्याच सेटमध्ये आलेल्या कार्तिकची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. सर्वात कमी पर्स असलेल्या मुंबईने त्याच्या बोलीची सुरुवात केली. मात्र, लखनऊ सुपरजायंट्स व कोलकता नाईट रायडर्स यांनी बोली पुढे नेली. लखनऊने 2 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत कार्तिकसाठी रस दाखवला. मात्र, त्यानंतर लिलावात सर्वाधिक पर्स असलेल्या कोलकाता व चेन्नई सुपर किंग्सने आक्रमकपणे बोली लावण्यास सुरुवात केली. या दोन्ही संघांदरम्यान तब्बल 13 कोटींपर्यंत संघर्ष झाला. अखेर केकेआरने 12 कोटी 80 लाखांंनतर माघार घेतली. चेन्नई 13 कोटींमध्ये कार्तिकला खरेदी करणार असे वाटत असताना, सनरायझर्स हैदराबादने अनपेक्षितपणे बोली लावली. मात्र, चेन्नईने हार न मानता बोली पुढे नेत 14 कोटी 20 लाखांची सर्वोच्च बोली लावून कार्तिकला आपल्या संघात सामील करून घेतले. यासोबतच तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू बनला.
Story Of IPL Auction 2026 Wonder Boy Kartik Sharma
यष्टिरक्षक व फिनिशर फलंदाज असलेला कार्तिक आयपीएल कॅम्पचा अनुभव देखील घेऊन बसला आहे. मागील वर्षी त्याने आरसीबी संघासाठी ट्रायल दिली होती. तसेच, बराच काळ चेन्नई सुपर किंग्स संघासाठी देखील तो मेहनत करताना दिसलेला. वंश बेदी दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतर कार्तिक याला त्याच्या जागी संधी मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र, मागील वर्षी त्याने आयपीएल लिलावासाठी नावनोंदणी न केल्याने त्याला संधी मिळाली नाही. मात्र, यावर्षी मिळालेल्या मोठ्या रकमेचे व संधीचे सोने करण्याची अपेक्षा त्याच्याकडून असेल.
Latest Sports News In Marathi
2 comments
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।