Breaking News

SL vs IND: जबरदस्त कमबॅक करत ‘सूर्या सेने’ची विजयी सलामी, श्रीलंकन फलंदाजांना नडला धसमुसळेपणा

SL VS IND
Photo Courtesy: X/ICC

SL vs IND T20I: श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव केवळ 170 धावांमध्ये संपला. यासह भारतीय संघाने 43 धावांनी मोठा विजय साजरा केला.

श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, यशस्वी जयस्वाल व शुबमन गिल यांनी पहिल्या षटकापासूनच वेगवान फलंदाजी सुरू केली. दोघांनी श्रीलंकेचा खराब गोलंदाजीचा फायदा उठवत केवळ 36 चेंडूंमध्ये 74 धावा कुटल्या. यशस्वी याने 21 चेंडूंमध्ये 40 तर गिलने 16 चेंडूंमध्ये 34 धावांचे योगदान दिले. ते दोघेही बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने डावाची सूत्रे हाती घेतली.

सूर्यकुमारने केवळ 26 चेंडूंमध्ये 58 धावा फटकावल्या. यष्टीरक्षक रिषभ पंत याने 49 धावा करत संघाला 213 पर्यंत मजल मारून दिली. श्रीलंकेसाठी वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला पथुम निसंका व कुसल मेंडिस यांनी शानदार सलामी दिली. या जोडीने 8.4 षटकात 84 धावा जोडल्या. बाद होण्यापूर्वी कुसल याने 45 धावांचे योगदान दिले. त्यानंतर दुसऱ्या गाड्यांसाठी निसंका व कुसल परेरा यांनी 56 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला विजयाच्या दिशेने नेले.

श्रीलंकेला विजयासाठी सहा षटकांमध्ये 74  धावांची गरज असताना, अक्षर याने निसंकाला बाद केले. त्यानंतर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांनी आपले अखेरचे आठ गडी केवळ 30 धावांमध्ये गमावले. अखेर श्रीलंकेचा डाव 170 धावांमध्ये समाप्त झाला. भारतासाठी रियान पराग याने केवळ आठ चेंडूंमध्ये 3 बळी मिळवले. तर अक्षर व अर्शदीप यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

(SL vs IND India Beat Srilanka By 43 Runs)

SL vs IND: कॅप्टन बनताच सूर्या तळपला! श्रीलंकन गोलंदाजी फोडत टीम इंडियाने उभारल्या 213 धावा

Exit mobile version