![T20 World Cup 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/afg-v-png.jpg)
T20 World Cup 2024, Super 8 :- टी20 विश्वचषक 2024चे साखळी फेरी सामने अंतिम टप्प्याकडे वळत असून सुपर आठ फेरीचे चित्रही स्पष्ट होत आहे. 19 जूनपासून सुपर आठ फेरीचे सामने सुरू होणार आहेत. सलग तीन विजयांसह अ गटातून भारतीय संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे क गटातून अफगाणिस्ताननेही सलग तीन सामने जिंकत सुपर आठ फेरीचे तिकीट मिळवले आहे. आता उभय संघातील लढतही निश्चित झाली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 8 सामना बार्बाडोस येथे होणार आहे. हा सामना 20 जून रोजी रात्री 8 वाजता सुरू होईल. भारतीय संघाचे सुपर आठमधील सर्व सामने रात्री 8 वाजल्यापासून खेळवले जातील. भारतीय चाहत्यांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतानंतर सुपर 8 मध्ये अफगाणिस्तानचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 22 जून रोजी होणार आहे.
भारत सुपर 8 मध्ये कधी आणि कोणासोबत खेळणार?
सुपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. यानंतर भारतीय संघाचा सामना ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होणार आहे. हा सामना 22 जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे होणार आहे. यानंतर स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना 26 जून रोजी तर दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी होणार आहे. अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.