Breaking News

पाहा ENG vs IND मालिकेतील टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड! कोणी नापास, कोणी काठावर तर कोणी मेरिटमध्ये पास, 10 पैकी…

eng vs ind
Photo Courtesy: X/Grok

Team India Report Card In ENG vs IND Test Series: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्त झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने रोमांचकरित्या आपल्या नावे केला. यासह ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. भारतीय खेळाडूंच्या याच कामगिरीचे मूल्यांकन सदर रिपोर्ट कार्डमधून करूया.

Team India Report Card In ENG vs IND Test Series

यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)- भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा सातत्याने परदेशात दमदार कामगिरी करत आला होता. मालिकेतील पहिल्याच कसोटीत शतक झळकावून त्याने झोकात सुरुवात केलेली. मात्र, त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तसेच, स्लिप आणि गलीमध्ये त्याच्याकडून जवळपास पाच झेल सुटले. पुढील तीन कसोटीत त्याच्या बॅटमधून केवळ दोन अर्धशतके आली. मात्र, अखेरच्या डावात पुन्हा शतक ठोकत त्याने दौऱ्याची यशस्वी सांगता केली. त्याने मालिकेत 41.10 च्या सरासरीने 411 धावा बनवल्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 6.5 गुण देण्यात येत आहेत.

केएल राहुल (KL Rahul)- इंग्लंड दौऱ्यावर भारताचा सर्वात अनुभवी फलंदाज म्हणून केएल राहुल संघात सामील झालेला. आपल्या खांद्यावर असलेली जबाबदारी त्याने यशस्वीरीत्या पार पाडली. जवळपास सर्वच डावात त्याने चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने देखील मालिकेत दोन शतके व दोन अर्धशतके ठोकली. मँचेस्टर कसोटीत भारतीय संघ अडचणीत असताना चौथ्या दिवशी दोन सत्र यशस्वीपणे खेळून काढत त्याने सामना वाचवण्यात सिंहाचा वाटा उचललेला. मैदानावर परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर कर्णधार गिलला मदत करताना तो दिसला. संघातील वातावरण निकोप ठेवण्यात त्याचे सहकार्य मिळत असल्याचे, मैदानावर स्पष्टपणे दिसत होते. तसेच त्याचे स्लिपमधील क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिले. राहुलने मालिकेतील तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज बनताना 49.90 च्या सरासरीने 532 धावा जमवल्या. विशेष म्हणजे तो मालिकेत तब्बल 1066 चेंडू खेळला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7.5 गुण देण्यात येत आहेत. 

साई सुदर्शन (Sai Sudarshan)- आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर साई सुदर्शन याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. पहिल्याच सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, आपल्या पहिल्या डावात तो खातेही खोलू शकला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने केवळ 30 धावा केल्या. त्यामुळे पुढील दोन कसोटीसाठी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. मँचेस्टर कसोटीत पुनरागमन करताना त्याने 61 धावांची खेळी केली. परंतु, दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर तो परतला. शेवटच्या ‌ओव्हल कसोटीतही तो आपली छाप पाडू शकला नाही. मालिकेत तीन सामने खेळताना त्याने 23 च्या सरासरीने 140 धावा केल्या. हा त्याचा पहिलाच दौरा असल्याने त्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4 गुण देण्यात येत आहेत.

करूण नायर (Karun Nair)- जवळपास नऊ वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या करूण नायर याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. दौऱ्याच्या सुरुवातीला भारत अ संघासह त्याने द्विशतक करून चांगली सुरुवात केलेली. मात्र, मुख्य मालिकेत तो अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. त्यानंतर पुढील दोन सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसला. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर तो प्रत्येक वेळी मोठी खेळी करण्यात कमी पडत होता. पहिल्या तीन कसोटीत एकदाही 40 धावा पार न केल्याने त्याला चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले. अखेरच्या कसोटीत इतर भारतीय फलंदाज पहिला डावात झगडत असताना त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक करत भारताला 200 पार नेले. परंतु, अखेरच्या डावात तो पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात कमी पडला. तो चार सामन्यात 205 धावा करू शकला. परंतु, त्याला वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. तसेच स्लिपमध्ये त्याने उत्कृष्ट झेल टिपले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 5 गुण देण्यात येत आहेत.

ENG vs IND: बॅझबॉल खेळत इंग्लंडने मारली Headingley Test, टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, 371 धावांचा केला यशस्वी पाठलाग

शुबमन गिल (Shubman Gill)- प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या शुबमन गिल याच्याकडे फलंदाज आणि कर्णधार अशा दुहेरी नजरेतून लक्ष होते. तो या दोन्ही पातळीवर सक्षम ठरला. पहिल्या दोन सामन्यात तीन शतके त्याच्या बॅटमधून निघाली. दुसऱ्या एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात दीडशतक करून त्याने भारतीय संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.‌ त्यानंतर मँचेस्टर कसोटी वाचवताना त्याने आणखी एक शतक झळकावले. या मालिकेत त्याने 75.40 च्या अविश्वसनीय सरासरीने विक्रमी 754 धावा फटकावल्या. मात्र, वेगवान गोलंदाजीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर तो काहीसा अवघडलेला दिसला.‌ यासोबतच नेतृत्व करताना इंग्लंडच्या खेळाडूंना जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न त्याने केला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 9.5 गुण देण्यात येत आहेत.

Team India Report Card In ENG vs IND Test Series

रिषभ पंत (Rishabh Pant)- भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत याच्यासाठी पुन्हा एकदा इंग्लंड दौरा लाभदायक ठरला. इंग्लंडमधील यापूर्वीच्या कामगिरीची त्याने पुनरावृत्ती केली. हेडिंग्ले येथील मालिकेतील पहिल्याच कसोटीत त्याने दोन्ही डावात शतके साजरी केली. त्यानंतर पुढील तीनही सामन्यात त्याने प्रत्येकी एक अर्धशतक ठोकले. मँचेस्टर कसोटीत पायाला फ्रॅक्चर असताना देखील, फलंदाजीला येत अर्धशतक करण्याची कामगिरी त्याने करून दाखवली. दुर्दैवाने, मालिकेतील अखेरच्या सामन्यात तो खेळू शकला नाही. पंतने 68.42 च्या सरासरीने 479 धावा झोडल्या. यष्टीरक्षण करताना त्याने काही सोप्या चुका केल्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7 गुण देण्यात येत आहेत.

ध्रुव जुरेल (Dhruv Jurel)- भारतीय संघाचा प्रमुख यष्टिरक्षक असलेल्या रिषभ पंत याच्यामुळे ध्रुव जुरेल याला बाकावर बसावे लागत होते. मात्र, एका टीम मॅनप्रमाणे पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्याने यष्टीरक्षकाची धुरा सांभाळली. काही अपवाद वगळता त्याने आपल्या यष्टीरक्षणाने मने जिंकली. अखेरच्या कसोटीत जो रूटचा अत्यंत महत्त्वपूर्ण झेल त्याने झोकून देत टिपला. ओव्हल कसोटीत संधी मिळाल्यानंतर त्याने दोन्ही डावात मिळून महत्वपूर्ण 53 धावा केल्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 4 गुण देण्यात येत आहेत.

ENG vs IND: ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान

नितिश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy)- ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नितिशकुमार रेड्डी याच्याकडे भारतीय संघाचा भविष्यातील मध्यमगती गोलंदाज अष्टपैलू म्हणून पाहिले जात होते. मात्र, या दौऱ्यावर तो पूर्णतः अपयशी ठरला. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. एजबॅस्टन कसोटी भारतीय संघाने विजय मिळवला. मात्र, रेड्डी याने दोन्ही डावात प्रत्येकी एक धाव केली. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात आपल्या पहिल्या षटकात दोन बळी मिळवण्याची एकमेव उत्कृष्ट कामगिरी त्याच्याकडून या दौऱ्यात झाली. फलंदाजीत गरज असताना हा कसोटी सामना जिंकून देण्यात त्याला अपयश आले. त्यानंतर दुखापतग्रस्त होत तो मालिकेतून बाहेर पडला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 3 गुण देण्यात येत आहेत.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)- भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा इंग्लंड दौऱ्यावर पोहोचला होता. जवळपास सर्वच सीनियर खेळाडू संघातून बाहेर असल्याने त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी होती. त्याने आपल्याकडून असलेल्या अपेक्षा फलंदाजीत पूर्ण केल्या. हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीत त्याने केवळ 36 धावा व एक बळी मिळवला. मात्र, त्यानंतर तो जबरदस्त फॉर्ममध्ये आला. एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावात त्याने अर्धशतके केली. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीच्या देखील दोन्ही डावात त्याने पन्नाशी गाठली‌. या सामन्यात अखेरपर्यंत नाबाद राहत त्याने संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. मॅंचेस्टर कसोटी वाचताना त्याने नाबाद शतक झळकावले. याच कसोटीच्या पहिल्या डावात त्याने इंग्लंडचे चार फलंदाजही बाद केलेले. अखेरच्या कसोटीतही त्याने अर्धशतक करत दौऱ्याची सांगता केली. गोलंदाज म्हणून त्याला केवळ 7 बळी मिळवता आले. मात्र, फलंदाजीत त्याने ऐतिहासिक कामगिरी करताना 86 च्या सरासरीने 5 अर्धशतके व एका शतकाच्या जोरावर तब्बल 516 धावा केल्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 9 गुण देण्यात येत आहेत.

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)- रविचंद्रन अश्विन याचा उत्तराधिकारी या नावावर वॉशिंग्टन सुंदर याने या दौऱ्यातून शिक्कामोर्तब केले. पहिल्या सामन्यात बाकावर बसल्यानंतर सुंदर याने प्रत्येक सामन्यात योगदान दिले. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने चार बळी मिळवले. त्यानंतर मँचेस्टर कसोटी वाचवताना त्याने नाबाद शतक ठोकले. तर, ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाचे 9 फलंदाज बाद झालेले असताना त्याने आक्रमक फटकेबाजी करत 46 चेंडूत 53 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण खेळी करत भारताची आघाडी 350 पार नेऊन ठेवली. याच धावा अखेरीस भारतीय संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरल्या. त्याने मालिकेत कंजूस गोलंदाजी करत सात बळी मिळवले. तर, फलंदाजीत 8 डावात 47.33 च्या सरासरीने 284 धावा केल्या. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 8.5 गुण देण्यात येत आहेत.

ENG vs IND: जड्डूसह बुमराह-सिराजची झुंज अपयशी! थरारक Lords Test जिंकत इंग्लंडची मालिकेत 2-1 आघाडी

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)- मागील इंग्लंड दौऱ्यावर अष्टपैलू म्हणून शार्दूल ठाकूर याने आश्वासक कामगिरी केलेली. मात्र, या दौऱ्यावर एक स्पेल वगळता तो प्रभावहीन ठरला. त्याला मालिकेत केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातही कर्णधार गिल याने त्याचा योग्य वापर करून घेतला नाही. दोन सामन्यांच्या तीन डावात त्याने केवळ 27 षटके गोलंदाजी केली. यामध्ये दोन बळी त्याने टिपले. तर, फलंदाजीतही तो केवळ 46 धावा करू शकला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 3 गुण देण्यात येत आहेत.

आकाश दीप (Akash Deep)- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात छाप पाडलेल्या आकाश दीप याला इंग्लंड दौऱ्यासाठी निवडले गेले होते. मात्र, पहिला कसोटीत त्याला स्थान मिळाले नाही. एजबॅस्टन येथील खेळपट्टीवर फलंदाजांनी धावांचे डोंगर उभे केल्यानंतरही, आकाशने इंग्लंडमधील आपल्या पहिल्याच सामन्यात पहिला डावात 4 व दुसऱ्या डावात 6 असे दहा बळी मिळवले. लॉर्ड्स कसोटीत मात्र तो फारसे योगदान देऊ शकला नाही. चौथ्या कसोटी सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. ओव्हल येथील अखेरच्या कसोटीत दुसऱ्या डावात नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला येताना त्याने तुफानी 66 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीतही तब्बल 20 षटके टाकली. सिराज व कृष्णा यांच्या जोडीने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून, इंग्लंडच्या फलंदाजांना त्याने अडचणीत टाकले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7.5 गुण देण्यात येत आहेत.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)- भारतीय संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा या दौऱ्यावरील सर्व सामने खेळणार नव्हता हे जाहीर होते. हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच डावात त्याने पाच बळी आपल्या नावे केले. दुसऱ्या सामन्यात विश्रांती घेतल्यानंतर लॉर्ड्स कसोटीच्याही पहिल्या डावात पंचक मिळवून त्याने ऑनर्स बोर्डवर आपले नाव कोरले. याव्यतिरिक्त दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने दुसऱ्या डावात 5 धावा करण्यासाठी तब्बल 54 चेंडू झुंज दिली. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात देखील त्याने दोन बळी आपल्या नावे केले. त्यानंतर मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी त्याला विश्रांती दिली गेली. बुमराहने 3 सामन्यात 14 बळी घेताना, 26 ची सरासरी राखली. बुमराह त्याने खेळलेल्या तीनही सामन्यात प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरला. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7 गुण देण्यात येत आहेत.

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)- जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या दिग्गज गोलंदाजांच्या छायेतून बाहेर येत सिराज याने भारतीय गोलंदाजीचा प्रमुख म्हणून या मालिकेत स्वतःला सिद्ध केले. दोन्ही संघांकडून पाच सामने खेळणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज ठरला. दुखापत अथवा वर्क लोड मॅनेजमेंट म्हणून एकही सामन्यात त्याने विश्रांती घेतली नाही. मालिकेतील अखेरच्या स्पेलमध्ये देखील त्याने सातत्याने 145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. त्याने मालिकेत दोन वेळा पाच बळी आपल्या नावे केले. पाच सामन्यांच्या 9 डावात मालिकेत सर्वाधिक 23 बळी टिपले. तसेच लॉर्ड्स कसोटी जिंकून देण्यासाठी त्याने फलंदाज म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 10 पैकी 10 गुण देण्यात येत आहेत.

प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna)- भारताच्या वेगवान गोलंदाजीचा नवा भिडू प्रसिद्ध कृष्णा याच्यावर पहिला सामन्यातील खराब कामगिरीनंतर मोठी टीका झाली होती. या कसोटीत पाच बळी मिळवले तरी तो महागडा ठरला होता. दुसऱ्या कसोटीत तो केवळ एक बळी मिळवू शकला. यानंतर पुढील दोन सामन्यातून त्याला वगळले गेले. ओव्हल येथील अखेरच्या कसोटीत मात्र त्याने आपला दर्जा दाखवून दिला. पहिल्या डावात त्याने चार बळी टिपत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. दुसऱ्या डावात इंग्लंड विजयाकडे जात असताना बेथल व जो रुट यांचे बळी मिळवत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेरच्या दिवशीही सिराजसह अचूक गोलंदाजी करताना टंगचा बळी मिळवला. दोन्ही डावात प्रत्येकी चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत त्याने, भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने मालिकेत तीन सामने खेळताना 14 फलंदाज बाद केले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 7 गुण देण्यात येत आहेत.

ENG vs IND: भारतीय फलंदाजांनी घेतली इंग्लंडची शाळा! Manchester Test ड्रॉ

अंशुल कंबोज (Anshul Kamboj)- नितिशकुमार रेड्डी बाहेर झाल्यानंतर मध्यमगती गोलंदाज अंशुल कंबोज याला मँचेस्टर कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, या सामन्यातील एकमेव डावात 18 षटके टाकताना त्याने तब्बल 89 धावा देत एकच बळी मिळवला. विशेष म्हणजे तो 125 किमी प्रतितास इतक्या कमी वेगाने गोलंदाजी करत असल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्यामुळे त्याला अखेरच्या कसोटीतून वगळण्यात आले. आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये त्याला 2.5 गुण देण्यात येत आहेत.

या 16 खेळाडूंव्यतिरिक्त फिरकीपटू कुलदीप यादव, सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या सुरुवातीपासून संघासोबत असलेल्या खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर, रिषभ पंतचा पर्यायी खेळाडू म्हणून आलेला एन. जगदिसन याला अखेरच्या सामन्यात यष्टीरक्षक म्हणून आपली जागा बनवण्यात अपयश आले.

(Team India Report Card In ENG vs IND Test Series)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा:  ENG vs IND: ऐतिहासिक कमबॅकसह Oval Test टीम इंडियाच्या नावे, मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली

 

Exit mobile version