Breaking News

Team India Victory Parade : “गुजरातच्या बसला चांगली पार्कींगची जागा देऊ, पण…”, भारताच्या मिवरणूक बसवरुन रोहित पवारांची नाराजी

Team India Victory Parade :- तब्बल 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक जिंकला. बार्बाडोस, वेस्ट इंडिज येथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) उंचावला. भारतीय संघाच्या या घवघवीत यशाने क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुगली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. परंतु या बसवरुन राजकारण तापले आहे.

त्याचे झाले असे की, मुंबईमध्ये आज संध्याकाळी भारतीय संघाची भव्यदिव्य विजयी मिरवणूक निघणार आहे. यासाठी एक विशेष बस मुंबईत दाखल झाली आहे. पण या बसचे पासिंग हे गुजरातचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांनी सवाल उपस्थित केला आहे. यावरुन एमसीएचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

रोहित पवार म्हणाले, “भारतीय संघाला सर्वांनी ताकद दिली, त्यामुळे भारताने विश्वचषक जिंकला, त्याचा आम्हाला आनंद आहे. आता, भारतीय संघ विश्वचषक घेऊन महाराष्ट्रात, विशेष करुन मुंबईत येत आहे. मग, ही रॅली महाराष्ट्रातील बसमधूनच, मुंबईतील बेस्ट बसमधून काढायला हवी. कारण, मुंबई शहर प्रवासाच्या बाबतीत अत्यंत सुखद आहे, मग मुंबईत विश्वचषक येत असेल तर बेस्टच्या बसचा वापर केल्यास आम्हाला आनंद होईल. आम्ही त्यासाठी बीसीसीआयकडे विनंती करू, शेवटी तेच निर्णय घेतील,” महाराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी म्हटले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “विश्वविजेत्या संघाच्या रॅलीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही चांगली पार्कींगची जागा देऊ. पण, बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे, भारतीय संघाच्या रॅलीत बेस्टची बस वापरल्यास आम्हाला अधिक आनंद होईल”, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

Exit mobile version