Breaking News

Womens T20 World Cup: हरमनसेनेने पाकिस्तानला 105 धावांत रोखले, अरुंधती-श्रेयंकाचा भेदक मारा

womens t20 world cup
Photo Courtesy: X/BCCI Women

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे खेळल्या जात असलेल्या महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत रविवारी (6 ऑक्टोबर) भारतीय महिला क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान महिला क्रिकेट संघ (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. भारतीय महिला संघाने जबरदस्त गोलंदाजी करत, पाकिस्तानचा डाव 105 धावांवर सीमित ठेवला. भारतासाठी अरुंधती रेड्डी हिने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

भारतीय संघाला स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीचे आमंत्रण मिळाले. रेणुका ठाकूर हिने पहिल्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर पाकिस्तानची गाडी रुळावर आलीच नाही. दुसरी वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असलेल्या अरुंधती रेड्डीने उत्कृष्ट गोलंदाजी केली. तिने संघासाठी सर्वाधिक तीन बळी मिळवले.

फिरकीची बाजू सांभाळत असलेल्या श्रेयंका पाटील व दीप्ती शर्मा यांनी कंजूस गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले. श्रेयंकाने केवळ तीन धावांच्या इकॉनॉमी रेटने धावा देत दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. दीप्ती व सजना यांनी देखील प्रत्येकी एक बळी मिळवला. भारतीय संघाला या सामन्यात मोठा विजय मिळवून स्पर्धेतील आपले आवाहन कायम ठेवावे लागेल. भारताचा पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होणार असून, अखेरचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाईल.

(India Restrict Pakistan On 105 In Womens T20 World Cup 2024)

Exit mobile version