
WPL 2026 Auction Top 11 Crorepati: वुमेन्स प्रिमियर लीग 2026 चा लिलाव गुरूवारी (27 नोव्हेंबर) पार पडला. स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी झालेल्या या लिलावात 73 खेळाडूंवर बोली लागली. तर, हंगामात एकूण 90 खेळाडू खेळताना दिसतील. या मेगा लिलावात एकूण 40.80 कोटी रुपये खेळाडूंसाठी खर्च केले.
WPL 2026 Auction Top 11 Crorepati
लिलावातील सर्वात महागड्या 11 खेळाडू:
1) दिप्ती शर्मा (Deepti Sharma)- भारतीय संघाची अनुभवी अष्टपैलू दिप्ती शर्मा या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली. पहिले तीन हंगाम युपी वॉरियर्झ संघासाठी खेळलेल्या दिप्तीला या लिलावाआधी करारमुक्त केले गेलेले. नुकतीच वनडे विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू राहिलेल्या दिप्तीसाठी दिल्ली कॅपिटल्सने केवळ एकच बोली लावली. तिला 50 लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केले. मात्र, युपीने तिच्यासाठी RTM वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीने 3 कोटी 20 लाख इतकी नवी बोली सांगितली. युपी वॉरियर्झने ही रक्कम स्वीकारत दिप्तीला आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले.
2) एमेलिया कर (Amelia Kerr)- न्यूझीलंडची अष्टपैलू एमेलिया कर हीच्यासाठी मोठी बोली लागणार हे निश्चित होते. मुंबई इंडियन्सने लिलावाआधी तिला रिलीज केलेले. मात्र, लिलावात मुंबईने तिच्यासाठी आक्रमक बोली लावली. युपी वॉरियर्झला मागे टाकत त्यांनी तीन कोटी रुपयांची सर्वोच्च बोली लावून तिला पुन्हा एकदा मुंबईकर बनवले.
3) शिखा पांडे (Shikha Pandey)- भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे या लिलावात ‘सरप्राइज पॅकेज’ ठरली. सध्या भारतीय संघाच्या बाहेर असलेल्या शिखासाठी अनेक संघ इच्छुक दिसले. मागील तीन हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळलेल्या 36 वर्षीय शिखासाठी आरसीबी व युपी भिडले. अखेर 2.40 कोटी इतकी रक्कम मोजत युपी वॉरियर्झने तिला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
4) सोफी डिवाईन (Sophie Devine)- न्यूझीलंडची कर्णधार राहिलेल्या अनुभवी सोफी डिवाईन हिच्यासाठी लिलावातील चौथी सर्वात मोठी बोली लागली. पहिले तीन हंगाम आरसीबीसाठी खेळलेल्या सोफीला गुजरात जायंट्सने आपल्या संघाचा भाग बनवले. यासाठी त्यांनी 2 कोटी इतकी मोठी रक्कम मोजली.
5) मेग लॅनिंग (Meg Lanning)- तब्बल पाच वेळा महिला विश्वचषक जिंकणारी कर्णधार म्हणून ओळख असलेली ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग यावेळी लिलावात सहभागी होती. पहिले तीन हंगाम दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारी कर्णधार असतानाही दिल्लीने तिला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. ही संधी साधताना युपी वॉरियर्झने 1 कोटी 90 लाखांची सर्वोच्च बोली तिच्यासाठी लावली. मेग सलामीवीर व कर्णधार म्हणून एलिसा हिलीची जागा घेताना दिसेल.
6 ) श्री चरणी (Shree Charani)- भारताची युवा फिरकीपटू श्री चरणी ही देखील करोडपती बनली. नुकताच महिला वनडे विश्वचषक गाजवलेल्या श्री चरणीसाठी दिल्ली कॅपिटल्सने 1 कोटी 30 लाख रुपये मोजले. ती स्नेह राणासह दिल्लीच्या फिरकीची बाजू सांभाळेल.
7) चिनेल हेन्री (Chinelle Henry)- वेस्ट इंडिजची अष्टपैलू चिनेल हेन्री या लिलावात अनपेक्षितपणे करोडपती ठरली. आक्रमक फटकेबाजी व उपयुक्त मध्यमगती गोलंदाज असलेल्या हेन्रीसाठी अनेक संघ इच्छुक दिसले. मात्र, दिल्लीने पुन्हा एकदा आक्रमक बोली लावताना तिच्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपये मोजले. मारिझान कापसह ती दिल्लीच्या संघाला मजबुती देईल.
8) फिबी लिचफिल्ड (Phobe Lichfield)- ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची सर्वात उदयोन्मुख खेळाडू असलेली फिबी लिचफिल्ड लवकरच लिलावात आली. वनडे विश्वचषक गाजवलेल्या फिबीसाठी मुंबई इंडियन, आरसीबी व युपी वॉरियर्झ यांच्या दरम्यान चांगले युद्ध रंगले. मात्र, अखेर या लिलावात सर्वाधिक पैसे घेऊन उतरलेल्या युपीने बाजी मारली. फिबीसाठी 1 कोटी 20 लाख रुपयांची बोली त्यांनी लावली. ती मेग लॅनिंगसह युपी संघासाठी सलामी देताना दिसेल.
9) लॉरा वॉल्वर्ट (Laura Wolvarrtdt)- वनडे विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट हिच्या बोलीवर सर्व क्रिकेटजगताचे लक्ष होते. मागील हंगाम गुजरात जायंट्ससाठी खेळलेल्या लॉराने मार्की खेळाडू असताना देखील आपली बेस प्राईस 30 लाख अशी कमी केलेली. मात्र, वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा केलेल्या लॉरासाठी दिल्ली कॅपिटल्स आक्रमक बोली लावताना दिसली. दिल्लीने 1 कोटी 10 लाख अशी अखेरची बोली तिच्यासाठी लावली. ती या आमदाबाद दिल्ली संघाचे नेतृत्व देखील करू शकते.
10) आशा शोभना (Asha Shobhna)- डब्लूपीएलमधूनच नाव कमावलेल्या फिरकीपटू आशा शोभनाला मोठी किंमत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. युपी वॉरियर्झ व दिल्ली कॅपिटल्सने तिला आपल्याकडे खेचण्याकरिता मोठे द्वंद केले. अखेर युपीने 1 कोटी 10 लाख रुपये मोजत आगामी हंगामासाठी तिची सेवा निश्चित केली. लेगस्पिनर असलेली आशा आरसीबीसाठी खेळ प्रसिद्धीझोतात आली होती
11) जॉर्जिया वेरहॅम (Georgia Warehame)- ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू जॉर्जिया वेरहॅम ही करोडपती होणारी अकरावी खेळाडू ठरली. गुजरात जायंट्सने तीच्यासाठी एक कोटींची बोली लावली. ती आपल्या देशाच्या ऍश्ले गार्डनरसह गुजरातचे प्रतिनिधित्व करेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: WPL 2026 Auction च्या मार्की खेळाडूंची आली लिस्ट, वर्ल्डकप गाजवणाऱ्या धाकड संघांच्या रडारवर
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।