Breaking News

Yashasvi Jaiswal खरंच आऊट होता का? दिग्गज पंचाने सगळंच क्लियर केलं

yashasvi jaiswal out
Photo Courtesy: X

Yashasvi Jaiswal Controversial Out: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला 184 धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाने हाराकिरी केल्याने, संघाला मालिकेत 2-1 असे पिछाडीवर पडावे लागले. भारताच्या दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला बाद देण्याचा निर्णय काहीसा वादग्रस्त ठरला. त्यावर आता माजी आंतरराष्ट्रीय पंच सायमन टॉफेल (Simon Taufel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विजयासाठी चौथ्या डावात 340 धावांचा पाठलाग करत असताना भारताचे प्रमुख फलंदाज बाद झाले होते. त्यावेळी जयस्वाल याने एकाकी झुंज देताना 208 चेंडूत 84 धावांची खेळी केली. मात्र, त्याला बाद देण्याचा निर्णय चर्चेत राहिला. काहीशा आखूड टप्प्याच्या असलेल्या चेंडूवर त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा फटका फसला आणि यष्टिरक्षक ऍलेक केरी याने चेंडू झेलला. मैदानी पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली.

डीआरएसमध्ये चेंडू बॅटला किंवा त्याच्या ग्लोव्हजला लागल्याचे स्पष्ट होत नव्हते. स्निको मीटरवर कोणताही आवाज न आल्याने जयस्वाल नाबाद असल्याचे सर्वांना वाटले. मात्र, तिसऱ्या पंचांनी उघड्या डोळ्यांनी दिसत असलेले चित्र ग्राह्य धरत त्याला बाद ठरवले. उघड्या डोळ्यांनी चेंडू ग्लोव्हजला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसरा पंचांनी असा निर्णय केला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या प्रकरणावर अनेक माजी खेळाडूंनी टीका करत, तंत्रज्ञान उपलब्ध असताना असे निर्णय का दिले गेले, अशी विचारणा करण्यात येतेय. सुनील गावसकर, इरफान पठाण व इतर माजी क्रिकेटपटूंनी याबाबत निशाणा साधला. त्यावर बोलताना टॉफेल यांनी म्हटले,

“माझ्यामते हा निर्णय योग्य होता. पंचांनी अखेर बरोबर निर्णय दिला. तंत्रज्ञान असले तरी, उघड्या डोळ्यांनी दिसणारा पुरावा असल्यास पंच तोच ग्राह्य धरून निर्णय देऊ शकतात. चेंडू ग्लोव्हजला लागला हाच निर्णायक पुरावा होता. तिसऱ्या पंचांनी तेव्हा अन्य एका तांत्रिक मार्गाचा उपयोग केला इतकेच. मात्र, अंतिमतः तिसरे पंच बरोबर होते.”

टॉफेल यांना क्रिकेटमधील सर्वात अचूक पंचांपैकी मानले जाते.

(Simon Taufel On Yashasvi Jaiswal Controversial Out)

हे देखील वाचा- भारतीय फलंदाजीची हाराकिरी ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर! Melbourne Test जिंकत यजमानांची मालिकेत 2-1 आघाडी

Exit mobile version