
Ashes 2025-2026 Perth Test Day 2: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) यांच्या दरम्यानची ऍशेस 2025-2026 मालिकेतील पहिली कसोटी दुसऱ्याच दिवशी समाप्त झाली. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्स राखून सामना जिंकला. अवघड खेळपट्टीवर ट्रेविस हेड (Travis Head) याने तुफानी शतक झळकावत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला. सामन्यात 10 बळी मिळवणारा मिचेल स्टार्क (Mitchell Starc) सामन्याचा मानकरी ठरला.
Australia Won Perth Test In Ashes 2025-2026
सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 19 बळी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी 9 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा डाव 132 धावांवर संपला. इंग्लंडला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण अशी 40 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची अवस्था पुन्हा एकदा पहिल्या डावासारखीच झाली. स्टार्कने क्राऊलीला शून्यातून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर बेन डकेट व ओली पोप यांनी 65 धावांची भागीदारी केली. डकेटला बाद करून बोलॅंडने ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्यानंतर पोप, हॅरी ब्रूक व जो रूट हे तिघेही अवघ्या सहा चेंडूंच्या अंतरात माघारी परतल्याने इंग्लंडची अवस्था दयनीय झाली. कर्णधार बेन स्टोक्स हा देखील फक्त दोन धावा बनवू शकला.
गस ऍटकिन्सन व ब्रायडन कार्स या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, स्टार्क, बोलॅंड व डॉगेट या वेगवान त्रिकुटाने इंग्लंडचा डाव 164 धावांवर संपवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान राहिले.
ऑस्ट्रेलियन आपल्या फलंदाजी क्रमात बदल करत ट्रेविस हेड याला सलामीला पाठवले. त्याने आपल्या संघाचा विश्वास सार्थ करताना जोरदार फटकेबाजी केली. त्याने केवळ 35 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. जॅक वेदराल्डसोबत 75 धावांची सलामी देऊन ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुढे केले. मार्नस लाबुशेनसोबत 117 धावांची भागीदारी करत केवळ 83 चेंडूंमध्ये 123 धावा करताना ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. विजयासाठी तेरा धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. अखेर लाबुशेन-स्मिथ जोडीने ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला जाणार आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: स्टार्कवर भारी पडला स्टोक्स! Ashes 2025-2026 च्या पहिल्याच दिवशी ‘दर्जा’ क्रिकेटची मेजवानी
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।