Breaking News

Harmanpreet Kaur Century : 4,6,4… हरमनप्रीत कौरची ‘सुपर से भी ऊपर’ वाली खेळी, धडाकेबाज स्टाईलने पूर्ण केले शतक

Harmanpreet Kaur Century : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी शतकांचा धडाका लावला. दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दोघींनीही शतके करत संघाला ३२५ धावांचा डोंगर उभारुन दिला. त्यातही हरमनप्रीतने डावाच्या शेवटी तिचा जलवा दाखवत शतकाला आणखी खास बनवले. 

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्मृतीने १२० चेंडूत १३६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान तिने २ खणखणीत षटकार आणि १८ चौकार मारले. स्मृती बाद झाली तेव्हा कर्णधार हरमनप्रीतचेही अर्धशतक पूर्ण झालेले होते. डावाच्या शेवटच्या षटकात अर्थातच ४९.२ षटकात हरमनप्रीत ८५ चेंडूत नाबाद ८८ धावांवर खेळत होती. पण उर्वरित चेंडूंवर हरमनप्रीतने असा काही खेळ दाखवला की क्रिकेट चाहते अवाक् झाले.

हरमनप्रीतने पुढील ३ चेंडूत सलग चौकार, षटकार आणि पुन्हा एक चौकार लगावला. अशाप्रकारे ३ चेंडूत १४ धावा जमवत हरमनप्रीतने आक्रमक पद्धतीने आपले शतक पूर्ण केले. तिच्या या धडाकेबाज फिनिशिंगची सर्वत्र वाह वाह होत आहे.

हरमनप्रीतचे हे वनडे कारकिर्दीतील सहावे शतक होते. यासह ती भारतीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या यादीत स्मृती मंधाना आणि मिताली राज ७ शतकांसह अव्वलस्थानी आहेत. तसेच हरमनप्रीतने वनडेतील ३५०० धावाही पूर्ण केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version