Breaking News

INDW vs SAW: अखेर द. आफ्रिकेला लाभले यश! पहिल्या टी20 मध्ये भारत पराभूत, जेमिमाची झुंज अपयशी

INDW vs SAW
Photo Courtesy: X/ICC

INDW vs SAW: चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) येथे भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ (INDW vs SAW) यांच्या दरम्यान टी20 मालिकेला सुरुवात झाली. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने नाबाद अर्धशतक झळकावले. मात्र, तिची झुंज अपयशी ठरली.

या आधी वनडे मालिका व त्यानंतर एकमेव कसोटीत भारतीय संघाने आपल्या नावे केली. दौऱ्यावरील आपला पहिला विजय शोधत असलेल्या दक्षिण आफ्रिकेला नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. कर्णधार लॉरा वॉल्वर्ट व तझ्मीन ब्रिट्स (Tazmin Brits) यांनी 7 षटकात अर्धशतकी भागीदारी संघाला करून दिली. लॉरा हिने 33 धावा केल्या.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

यानंतर ब्रिट्स व मरिझान काप यांनी 96 धावांची मोठी भागीदारी करत संघाला सामन्यात पुढे नेले. कापने 33 चेंडूंमध्ये 57 धावांची खेळी केली. तर, ब्रिट्सने 56 चेंडूंवर सर्वाधिक 81 धावा कुटल्या. भारतासाठी पूजा वस्त्रकार व राधा यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. दक्षिण आफ्रिकेने यासह 189 धावा उभारल्या.

विजयासाठी मिळालेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला वेगवान सुरुवात मिळाली. स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांनी केवळ 5.2 षटकात 56 धावा चोपल्या. वर्माने 18 तर स्मृतीने 30 चेंडूवर 46 धावा केल्या. यानंतर हेमलता व कर्णधार हरमनप्रीत यांनी काहीसा संथ खेळ केला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमा हिने जोरदार सुरुवात केली. अखेरच्या षटकात 21 भावांची गरज असताना जेमिमा व हरमनप्रीत केवळ 8 धावा करू शकल्या. जेमिमाने 30 चेंडूंवर 53 तर हरमनप्रीतने 27 चेंडूमध्ये फक्त 33 धावा केल्या.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दौऱ्यावर प्रथमच विजयाची चव चाखली. आणखी एक विजय मिळवून ते मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करतील.

(INDW vs SAW South Africa Beat India By 12 Runs Jemimah Fight)

Exit mobile version