Breaking News

IPL 2025 च्या ‘यंगगन्स’! ज्या यावर्षी नक्कीच धडाडणार, भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणार

IPL 2025
Photo Courtesy: X

IPL 2025 Young Players To Watch Out For आयपीएलची चमचमती ट्रॉफी पाहिली की, केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर, क्रिकेटप्रेमींनाही ती ट्रॉफी हातात घेण्याची इच्छा होते. ती सर्वांना हवीहवीशी वाटणारी ट्रॉफी पाहिल्यानंतर काही अक्षरे कोरलेली दिसून येतात. आपल्या प्राचीन संस्कृत भाषेमधील ही अक्षरे आहेत, ‘यात्रा प्रतिभा अवसरा प्रपनोतिही’. मराठीत यांचा अर्थ होतो, इथे प्रतिभेला संधी मिळते म्हणजेच टॅलेंट्स मिट अपॉर्च्युनिटी!

IPL 2025 Young Players To Watch Out For

जागतिक क्रिकेटच्या सर्वात मोठ्या मंचावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या खांद्याला खांदा लावून, एखाद-दोन डोमेस्टिक मॅच खेळलेले युवा खेळाडू आपले कौशल्य दाखवताना दिसतात. याच आयपीएलने भारतीय क्रिकेटला रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांच्यासारखे सुपरस्टार दिले. आता आयपीएल 2025 मध्ये हीच परंपरा पुढे चालवण्यासाठी भारतीय क्रिकेटची आणखी एक पिढी तयार होतेय. याच आयपीएलच्या 18 व्या हंगामात असे कोणते पाच अनकॅप्ड पांडव असतील, जे हा सिझन गाजवताना दिसू शकतात, हे पाहूयात.

आयपीएलच्या या ‘फ्रेश’ हंगामामध्ये यंग ब्रिगेडमधील सर्वात चर्चित नाव राहू शकते, ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). अवघ्या तेरा वर्षांचा असलेला वैभव खऱ्या अर्थाने नवखा म्हणावा लागेल. राजस्थान रॉयल्स संघाने त्याच्यावर एक कोटी दहा लाखांची मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. सलामीला खेळणाऱ्या वैभव याने मागील वर्षी झालेल्या अंडर 19 आशिया चषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेली. त्याआधीच‌ भारत दौऱ्यावर आलेल्या अंडर 19 संघाविरुद्ध ताबडतोब शतक ठोकून त्याने चर्चा मिळवलेली.

वैभव हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहार संघाचे प्रतिनिधित्व करतो. सर्वात कमी वयात रणजी पदार्पण करण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे आहे. नेहमीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघात व दिग्गज राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात वैभव याला पैलू पाडण्याचे काम केले जाऊ शकते. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या फलंदाजीची मदार पूर्णपणे भारतीयांवर ठेवली आहे. त्यामुळे जखमी कर्णधार संजू सॅमसन फिटनेसमुळे काही सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यास, वैभव याला आपली चुणूक दाखवायची संधी मिळू शकते.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

आयपीएल 2025 गाजवू शकणारे दुसरे नाव आहे रॉबिन मिंझ (Robin Minz). एखाद्या बॉलिवूड मूव्हीला लाजवेल अशी त्याची कहाणी आहे. झारखंडच्या आदिवासी भागातील एका माजी सैनिकाचा मुलगा असलेला रॉबिन ‘झारखंडचा ख्रिस गेल’ या नावाने ओळखला जातो. दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने त्याचा खेळ पाहून त्याला आपल्या अकॅडमीत प्रवेश दिला होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्स अकॅडमी संघातर्फे इंग्लंडला देखील जाऊन आलेला. यष्टीरक्षक फलंदाज अशी भूमिका बजावणाऱ्या रॉबिन याचा आदर्श एमएस धोनी आहे.

IPL 2025 Young Players To Watch Out For

आयपीएल 2024 लिलावाआधी रांची विमानतळावर सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या रॉबिनच्या वडिलांची धोनी याच्याशी भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला निवडण्याची विनंती केली. तेव्हा धोनीने त्यांना म्हटले होते की, “त्याला कोणी बोली नाही लावली तर आम्ही नक्की निवडू.” मात्र, त्या हंगामात गुजरात टायटन्सने 3.60 कोटींची बोली लावून त्याला आपल्याकडे खेचले. हंगाम सुरू होण्याआधीच अपघात झाल्याने तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. आता मुंबई इंडियन्सने 65 लाखांची बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले. मागील दोन वर्ष नेहल वढेराने मुंबई इंडियन्ससाठी केलेली कामगिरी यावेळी रॉबिन करू शकतो.

आयपीएल 2025 मध्ये ज्याचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण जग सर्वाधिक आतुर आहे तो म्हणजे सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge). भारतीय खेळाडूंमध्ये आढळणारी वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक फटकेबाजी अशी काहीशी दुर्मिळ वैशिष्ट्ये त्याच्याकडे आहे. मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यांश याला पंजाब किंग्सने केवळ 30 लाखात आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मुंबईचाच त्याचा सहकारी श्रेयस अय्यर हा संघाचा कर्णधार असल्याने त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सध्या 22 वर्षाच्या असलेल्या सूर्यांश याने 2024-2025 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 252 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात तो सामनावीर होता. याव्यतिरिक्त तो 140 च्या वेगाने गोलंदाजी देखील करतो. यापूर्वी 2023 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघात त्याला निवडले गेले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुंबई व भारतीय क्रिकेटचे भविष्य मानल्या जाणाऱ्या सूर्यांशला आयपीएल 2025 मधून नवी ओळख मिळू शकते.

याच यादीत पुढचा क्रमांक आहे सनरायझर्स हैदराबादच्या अनिकेत वर्मा (Aniket Verma) याचा. प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजी क्रमात मध्य प्रदेशचा हा युवा फिनिशर धुमाकूळ घालताना दिसू शकतो. केवळ 30 लाखांच्या बेस प्राईसवर तो हैदराबादच्या संघात सामील झाला आहे. एमपी प्रीमियर लीग स्पर्धेत केवळ 32 चेंडूत शतक झळकावून तो चर्चेत आलेला.‌

अनिकेत हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. सनरायझर्स हैदराबादच्या प्री सिझन कॅम्पमध्ये सर्व दिग्गजांनी त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर इंट्रा स्कॉड सामन्यांमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली. त्याने एकाच षटकात सलग चार षटकार देखील मारले होते. तर, 16 चेंडूवर 46 धावा त्याने कुटलेल्या. त्यामुळे क्लासेन व अभिनव मनोहर यांच्यासह तो फिनिशरची जबाबदारी सांभाळू शकतो.

IPL 2025 Young Players To Watch Out For

हे देखील वाचा- IPL Archives: ललित मोदींनी लावलेलं आयपीएल नावाचं रोपट 18 वर्षांचं झालंय

आयपीएल 2025 लिलावात ज्या खेळाडूसाठी अनेक संघ इच्छुक दिसले तो होता दिल्लीचा युवा प्रियांश आर्या (Priyansh Arya). दिल्ली व आरसीबीला मागे टाकत पंजाबने तब्बल 3.80 कोटी इतकी मोठी रक्कम खर्च करून त्याला आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. डावखुरा सलामीवीर असलेला प्रियांश पहिल्या सामन्यापासून पंजाबसाठी दिसू शकतो.

प्रियांश दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेपासून प्रकाशझोतात आला होता. त्याने आयुष बदोनीसह 286 धावांची विक्रमी भागीदारी रचलेली. यात सामन्यात त्यांनी अवघ्या 50 चेंडूत 120 धावा कुटताना, एकाच षटकात सहा षटकार मारलेले. त्याने संपूर्ण स्पर्धेत 200 च्या स्ट्राईक रेटने 608 धावा झोडलेल्या. त्यानंतर झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतही त्याने एक शतक झळकावलेले.‌ त्याच्या याच कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला आयपीएलचा करार मिळाला. त्यानंतर आता तो आपल्या पहिल्याच हंगामात कौतुक वसूल करून घेण्यासाठी सज्जा आहे.

(IPL 2025 Young Players To Watch Out For)

Exit mobile version