Breaking News

IPL Archives: ललित मोदींनी लावलेलं आयपीएल नावाचं रोपट 18 वर्षांचं झालंय

IPL ARCHIVES
Photo Courtesy: X

IPL Archives: इंडियन प्रीमियर लीग.. क्रिकेटला नावे ठेवणाऱ्यांसाठी टाईमपास क्रिकेट, युवा गुणवान क्रिकेटपटूंसाठी संधी, समीक्षक, युट्युबर्ससाठी उगीचच डेली एनालिसिस करण्याचा मौसम आणि तुमच्या आमच्यासारख्या क्रिकेट चाहत्यांसाठी मनाच्या अगदी जवळ असलेली स्पर्धा. अशा आयपीएलचा अगदी नवा कोरा म्हणजेच 18 वा हंगाम सुरू होतोय.

IPL Archives How Lalit Modi Founded IPL

सध्या वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वात मोठा मोठा ब्रँड कोणता असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचे येणारे उत्तर म्हणजे आयपीएल. मात्र, हा ग्लोबल ब्रँड बनवणारा माणूस कोण, हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही हाडाचे क्रिकेटप्रेमी असल्यावर तुम्हाला हे निश्चितच माहीत असणार. मनोरंजनाचा बाप म्हणल्या जाणाऱ्या आयपीएलचा बाप म्हणजे ललित कुमार मोदी! याच ललित मोदी यांनी ही आयपीएल कशी उभी केली, याबद्दल आपण जाणून घेऊया.

ललित मोदी आधी काय करायचे आणि आता ते काय करतात, हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. कारण, आज आपला विषय आहे, ललित मोदींनी आयपीएल कसे सुरु केले. त्यामुळे ललित मोदी हे बीसीसीआयमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते, इथपासून आपण या गोष्टीला सुरुवात करू.

बीसीसीआयशी बंडखोरी करून, काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी, विशेषता 1983 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी इंडियन क्रिकेट लीगची घोषणा केली होती. यात कपिल देव यांच्यापासून संदीप पाटील, मोहिंदर अमरनाथ व सय्यद किरमाणी यांच्यासारख्या दिग्गजांचा थेट समावेश होता. या घोषनेनंतर बीसीसीआय पुरती हादरलेली. एक तर तो काळ असा होता, ज्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये काहीच आलबेल नव्हते. वनडे वर्ल्डकपमध्ये पानिपत झाल्यानंतर, चॅपेल एरा संपला होता. आनंदाची गोष्ट एकच की, इंग्लंडमध्ये संघाने टेस्ट सिरीज जिंकलेली. त्याच इंग्लंड दौऱ्यावरून टीम इंडिया विमानतळावर उतरताच, ‌बीसीसीआयने प्रेस कॉन्फरन्स घेत तडकाफडकी आयपीएलची घोषणा करण्यात आली. ही घोषणा केवळ आयसीएलला काऊंटर करण्यासाठी होती. (IPL Archives)

ही घोषणा करताच या आयोजनाची जबाबदारी ललित मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यावेळी बीसीसीआय व मोदी यांच्यामध्ये एक करार झाला. ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते की, ही सर्व लीग मोदी यांनीच उभी करायची, सर्व निर्णय त्यांनी घ्यायचे आणि यासाठी त्यांना एक रुपयाही मानधन देण्यात येणार नाही. त्यावेळी बीसीसीआयकडून त्यांना 25 मिलियन रुपये देण्यात आले. ज्यामध्ये त्यांना बीसीसीआय, सहभागी होणाऱ्या फ्रॅंचाईजी आणि स्पॉन्सर्स यांना फायदा करून द्यायचा होता. हे शिवधनुष्य मोदींनी उचलले.

मोदी यांनी ही सगळी सिस्टीम कशी उभी केली, हे जाणून घ्यायचा असेल तर थोडसं फ्लॅशबॅकमध्ये जायला लागेल. मोदी हे अस्सल स्पोर्ट्स प्रेमी होते. त्याच वर्षाच्या जुलै महिन्यात ते टेनिसजगतातील मानाची विम्बल्डन पाहण्यासाठी लंडनला गेलेले. तिथे त्यांची भेट मोठ्यामोठ्या स्पर्धांचे मॅनेजमेंट करणाऱ्या आयएमजी स्पोर्ट्सचे व्हाईस प्रेसिडेंट ऍंड्रु विलबर्ड यांच्याशी झाली होती. मोदी-विलबर्ड भेटीमध्ये, भारतात युरोपातील फुटबॉल लीग्सप्रमाणे, शहरांच्या नावाने क्रिकेट लीग सुरू करता येऊ शकते का? यावर अगदी चर्चा झाली होती.

त्यानंतर मोदी भारतात येऊन यावर विचार करत असतानाच, आयसीएलचे बिगुल वाजलेले. आयसीएल ही थोडक्यात त्यांच्याच विचारांसारखी स्पर्धा होती. त्यांनी हा ड्रीम प्रोजेक्ट बीसीसीआयला सांगितला आणि लगेचच त्यावर काम सुरू झालं. अमेरिकेतील एनएफएल आणि एमसीएल या स्पर्धांचा यासाठी बारकाईने अभ्यास केला गेला. अखेर 12 सप्टेंबर 2007 रोजी आयपीएलची घोषणा केली. (IPL Archives)

इथून पुढे मोदी यांची खरी कसरत सुरू झाली. कारण, छोट्यातील छोटी आणि मोठ्यातील मोठी गोष्ट मोदी यांनाच पाहायची होती. त्यांच्यापुढे सर्वात मोठे टारगेट होते, या ड्रीम प्रोजेक्टसाठी स्पॉन्सर्स, फ्रॅंचाईजी आणि जगातील बडे खेळाडू उपलब्ध करून देणे. तिकडे सुभाष चंद्रा व एसेल ग्रुपची आयसीएल 30 नोव्हेंबर 2007 रोजी सुरू झाली. ब्रायन लारा, इंजमाम उल हक व केपलर वेसेल्स यांच्यासारखे नुकतेच रिटायर झालेले दिग्गज या स्पर्धेत खेळत होते. या लीगमुळे खेळाडूंचे काहीही भले होणार नाही, अस म्हणत ही स्पर्धा अनधिकृत असल्याचे बीसीसीआयने जाहीर करून टाकले. त्यामुळे त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या बड्या खेळाडूंनी आयसीएलपासून चार हात लांब राहण्याचेच ठरवले.

आता, मोदी यांच्यापुढे दुसरे आव्हान होते स्पॉन्सर्स‌ व फ्रेंचाइजी आणण्याचे. उद्योगपती के के मोदी यांचे पुत्र असलेल्या ललित यांच्यासाठीही गोष्ट तितकी कठीण झाली नाही. उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांचे सर्वांशी सख्य होते. हेच मित्रत्वाचे असलेले नाते त्यांच्या कामी आले. ज्यादिवशी आयपीएलच्या 8 फ्रॅंचाईजींची बोली लागणार होती, त्या दिवशी तेथे आलेले आसामी पाहून अनेकांनी आ वासला. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान,‌ सर्वात श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी, बॉलिवूडची ‘प्रिटी गर्ल’ प्रीती झिंटा आणि लिकर किंग विजय मल्ल्या यांना पाहून, अंदाज येऊ लागलेला की, धुरळा उडणारेय!

फक्त एक क्रिकेट फ्रॅंचाईजी घेण्यासाठी आलेल्या त्या सर्व लोकांना वाटलेही नसेल की, काही दिवसातच आपण क्रिकेटच्या सर्वात मोठ्या ब्रँडचा भाग बनणार आहोत. सात बड्या शहरांचे सात संघ तयार झाले होते. अखेरच्या राजस्थान फ्रॅंचाईजीसाठी कोणी बोली लावत नव्हते. त्यावेळी, मोदी यांचे मेहुणे सुरेश चेलाराम व त्यांचे मित्र मनोज बदाले पुढे आले. आठवी फ्रॅंचाईजी बनतात ‘आयपीएल’ होणार आहे निश्चित झाले. (IPL Archives)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

आयपीएल या प्रोजेक्टला ग्लॅमर आणल खेळाडूंच्या लिलावाने. टॉपच्या इंटरनॅशनल क्रिकेटपटूंच्या बरोबरीने डॉमेस्टिक व अंडर 19 क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंना लखपती-करोडपती या लिलावाने बनवले. या लिलावानंतर आयपीएलच्या चर्चांची राळ उडाली. एक-एक करत आयपीएलच्या मार्गातील आव्हाने संपत गेली. अखेर, 18 एप्रिल 2008 हा क्रिकेटच्या इतिहासातील क्रांतिकारी दिवस उजाडला.

आयपीएलचा श्रीगणेशा झालेला हा दिवस गाजवला ब्रेंडन मॅकलम नावाच्या बहाद्दराने. विस्फोटक, धुवाधार, झंझावाती अशी शेकडो विशेषणे ज्या खेळीसाठी तोकडी पडतील, अशी खेळी त्यादिवशी बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळली गेली. पहिल्याच सामन्याने आयपीएल काय धमाका करणार हे जगाला दाखवून दिले. दीड महिना नॉन स्टॉप क्रिकेट सामन्यांची लागलेली पंगत पाहून क्रिकेटप्रेमी म्हणाले, आयपीएल म्हणजे इंडिया का त्योहार!’

मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर 1 जून रोजी शेन वॉर्न आणि राजस्थान रॉयल्सने पहिल्या सीझनची ट्रॉफी उचलली तेव्हा, ललित मोदी यांचे आयपीएल नावाचे स्वप्न साकार झाले. दुसऱ्या वर्षी लोकसभा निवडणुकांमुळे मोदी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेऊन गेले. वेळेचे आणि अर्थकारणाचे पक्के गणित जमवत त्यांनी तिथेही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. तिसऱ्या हंगामानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना आयपीएल आणि बीसीसीआय पासून दूर व्हावे लागले. ते लंडनला पळून गेले.

जनसामान्यांना माहित न पडलेल्या अनेक गोष्टी त्यावेळी घडल्या. मोदी आजतागायत भारतात आले नाहीत. मात्र, ललित मोदी यांनी लावलेल्या या रोपट्याचे झाड आज 18 वर्षांचे झालेय. त्या झाडाची फळे बीसीसीआय आयसीसीतील मक्तेदारी व खेळाडू पैशाच्या रूपाने, आणि आपण सर्व क्रिकेटप्रेमी मनोरंजनाच्या रूपाने चाखतोय, हे निर्विवाद सत्य आहे!

(IPL Archives: How Lalit Modi Founded IPL)

Virat-Rohit ने दिली देशवासियांना डबल खुशखबरी! महत्वाचा निर्णय घेऊन टाकलाच

Exit mobile version