Breaking News

Pat Cummins : कमिन्सचा क्लास! ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाने टी20 विश्वचषकात पुन्हा हॅट्ट्रिक घेत केला विश्वविक्रम

Pat Cummins Consecutive Hattrick :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण बनला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने पुन्हा एकदा आपला दमखम दाखवला. कमिन्सने या सामन्यात विकेट्सची हॅट्ट्रिक घेत विश्वविक्रम रचला आहे. 

कमिन्सने अफगाणिस्तानच्या डावातील अठरावे षटक टाकताना शेवटच्या चेंडूवर कर्णधार राशिद खानची विकेट घेतली. टीम डेविडच्या हातून कमिन्सने त्याला झेलबाद केले. त्यानंतर पुढील 19वे षटक जोश हेझलवुडने टाकले. त्यानंतर अखेरच्या 20व्या षटकात गोलंदाजीची धुरा पुन्हा कमिन्सकडे सोपवण्यात आली. कमिन्सने 19व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर टीम डेविडच्या हातून करिम जनतला झेलबाद केले. त्यानंतर पुढील चेंडूवर नुकताच फलंदाजीला आलेल्या गुलबदिनला ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद करत विकेट्सची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

ही कमिन्सची टी20 विश्वचषकातील सलग दुसरी हॅट्ट्रिक होती. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात त्याने सलग 3 चेंडूंवर 3 फलंदाजांना बाद केले होते. अशाप्रकारे टी20 विश्वचषकात सलग दोन सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारा कमिन्स जगातील पहिलाच आणि एकमेव गोलंदाज बनला आहे. त्याने या सामन्यात 4 षटकांत 28 धावांवर 3 विकेट्स घेतल्या. (Hat-tricks in consecutive international matches)

याव्यतिरिक्त टी20 क्रिकेटच्या सामन्यांमध्ये विकेट घेत दोनवेळा हॅटट्रिक करणारा कमिन्स हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version