Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ही क्रिकेटचाहत्यांची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. आपल्या फलंदाजीबरोबरच स्मृती तिच्या सौंदर्यानेही लोकांची मने जिंकते. स्मृती ही असंख्य तरुणांच्या हृदयाची राणी आहे. पण स्मृतीच्या हृदयात आधीच एका तरुणानं घर केलं आहे. तो आहे पलाश मुच्छल (Palash Muchhal). रविवारी (07 जुलै) स्मृती आणि तिचा बॉयफ्रेंड पलाशच्या नात्याला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. पलाशने सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
27 वर्षीय स्मृती आणि 29 वर्षीय पलाश मुच्छल यांच्या नात्याच्या बातम्या सतत येत असतात. परंतुया दोघांनीही अद्याप त्यांचे नाते अधिकृत केलेले नाही. पण स्मृती सोबतच्या त्याच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याचं पलाशच्या इंस्टाग्राम पोस्टवरून स्पष्ट होतंय.
पलाशने स्मृती सोबत केक कापतानाचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये हॅशटॅग 5 लिहून हार्ट इमोजी टाकले आहेत. या पोस्टवरुन स्मृती आणि पलाश यांच्यातील रिलेशनशिपच्या बातम्यांना दुजोरा मिळत असून दोघांच्या नात्याला 5 वर्षे पूर्ण झाल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.
कोण आहे पलाश मुच्छाल?
पलाश मुच्छाल हा संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहेत. पलाशची मोठी बहीण पलक पार्श्वगायिका आहे. तसेच, पलाशने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘खेले हम जी जान से’ या चित्रपटातही काम केले आहे. पलाशने 40 हून अधिक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. त्याने रिक्षा नावाची वेब सीरिज आणि राजपाल यादव स्टारर अर्ध चित्रपट देखील दिग्दर्शित केला आहे.