Breaking News

Story Of NatWest Trophy 2002 Win: भारतीय क्रिकेट बदलणाऱ्या नेटवेस्ट ट्रॉफी विजयाची 21 वर्ष! वाचा लॉर्ड्सवर घडलेला संपूर्ण थरार

natwest trophy 2002
Photo Courtesy: Screengrab/X

Story Of NatWest Trophy 2002 Win: 13 जुलै, भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला दिवस. आज भारतीय क्रिकेट संघ जगभरातील सर्व संघांच्या डोळ्यात डोळे घालून भिडताना दिसतो. त्या आक्रमकतेची मुहूर्तमेढ ज्यादिवशी रोवली गेली तो दिवस म्हणजे 13 जुलै! नेटवेस्ट ट्रॉफी विजयाचा. त्याच विजयाला आज 21 वर्षे पूर्ण होत आहेत.

(21 Years Of Indias NatWest Trophy 2002 Win)

तिरंगी मालिकांच्या या जमान्यात भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला होता. इंग्लंड, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान नेटवेस्ट सिरीज (NatWest Trophy 2002) खेळली जाणार होती. लीग राऊंडमध्ये प्रत्येक संघ प्रत्येकाशी तीन-तीन वेळा दोन हात करणार होता. वेस्ट इंडिजची दोन महिन्यांची मोठी टूर करत भारतीय संघ येथे पोहोचलेला. इंग्लंडमध्ये क्रिकेटला मिळणारा प्रतिसाद पाहता ही सिरीज जबरदस्त होणार याची खात्री सर्वांना होती.

‘कॅप्टन फेअरलेस’ सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वात उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यात आधी इंग्लंडला आणि नंतर श्रीलंकेला किरकोळीत हरवले. इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. पुढे श्रीलंकेला हरवत टीम इंडियाने विजयी अभियान सुरूच ठेवले. मात्र, पाचव्या सामन्यात इंग्लंडने झटका देत ‘तारे जमीन पर’ आणले. शेवटच्या लीग मॅचमध्ये मात्र टीम इंडियाने कोणतीही चूक केली नाही आणि श्रीलंकेला हरवले. तिन्ही संघात टॉप राहत टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती. श्रीलंकेचा पॅकअप झालेल आणि इंग्लंड घरच्याच मैदानावर टीम इंडियाला (IND vs ENG) आव्हान द्यायला सज्ज झालेली.

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर (Lords Cricket Ground) 13 जुलै हा दिवस उजाडला. भारतीय क्रिकेटमध्ये हा दिवस अजरामर होऊन जाईल याची कल्पनाही कोणी केली नसेल. टीम इंडिया फेवरेट होती मात्र लॉर्ड्सवर असं काही घडणार होतं की, ज्याची गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जाईल. लंडनच्या त्या फ्रेश मॉर्निंगला इंग्लंडचा कॅप्टन नासिर हुसेनने टॉस जिंकत, बॅटिंगचा निर्णय घेतला. पीच जणू बॅटर्ससाठी नंदनवन वाटत होती. मोठा स्कोर टांगायचा आणि टीम इंडियाला दबावात टाकायचं असा सिंपल प्लॅन इंग्लंडचा होता.

सामना सुरू झाला. मार्कस ट्रेस्कोथिक आणि निक नाईट यांच्या बॅटवर चेंडू अगदी मिडल होत होते. सात ओव्हरमध्येच त्यांनी चाळीशी पार केली. अखेर, आठव्या ओव्हरमध्ये भारताला ब्रेक थ्रू मिळाला आणि झहीरने नाईटची दांडी गुल केली. त्यानंतर मैदानावर उतरला इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेन. होम ग्राउंडवर खेळत असलेल्या या दोघांनी त्यानंतर भारतीय संघाला अक्षरशा गुडघे टेकायला लावले. सर्वच भारतीय गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतला. एखादा चान्स भारतीय गोलंदाज क्रिएट करत होते. मात्र, यश त्यांच्या हाती लागले नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पाहता-पाहता इंग्लंड 200 पार गेली. ट्रेस्कोथिकने शतक मारले. अखेर कुंबळेने बोल्ड करत त्याची 109 रन्सची इनिंग थांबवली. इंग्लंड 2 बाद 227. ट्रेस्कोथिक बाद झाल्यानंतर आणखी 13 ओव्हर्स बाकी होत्या. इंग्लंडचे 300 पक्के दिसत होते. आता नासिरला साथ देण्यासाठी उतरलेला इंग्लंड क्रिकेटचा गुंडा म्हणला जाणारा ऍण्ड्रू फ्लिंटॉफ. त्याने अजिबातच डॉट बॉल न खेळता स्कोरबोर्ड हलता ठेवला. दरम्यान नासिरने आपल्या वनडे करिअरमधील पहिले शतक पूर्ण केले. मोठ्या स्टेजवर त्याने ‘कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट’ भूमिका घेत संघाला 300 च्या पलीकडे पोहोचवले. फ्लिंटॉफ 32 बॉलमध्ये 40 रन्स करून माघारी गेला. पुढच्याच ओव्हरला नेहराने नासिरची 115 रन्सची इनिंग थांबवली. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये कमबॅक झाला आणि टीम इंडिया इंग्लंडला 325 पर्यंत रोखण्यात यशस्वी ठरली.‌ या 325 मध्ये भारतीय बॉलर्सने 31 एक्स्ट्राजची खैरातही वाटलेली.

आज 300 रन्स वनडे क्रिकेटमध्ये अगदी सहज चेस होतात. मात्र, 21 वर्षांपूर्वी ही गोष्ट करणे म्हणजे दिव्य पार पाडण्यासारखे होते. टीम इंडियाला याच अग्निदिव्यातून जावे लागणार होते. आणि याची जबाबदारी खांद्यावर घेतली खुद्द कॅप्टन सौरव गांगुलीने. आपल्याला ‘गॉड ऑफ ऑफ साईड’ का म्हणतात हे त्यादिवशी दादाने सप्रमाण दाखवून दिले. टूडर, फ्लिंटॉफ आणि गॉफला पुढे येऊन-येऊन पॉईंट, मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि कव्हर्समधून त्याने जे काही फटके मारले, ते केवळ अवर्णनीय होते. 35 चेंडूंमध्ये त्याने फिफ्टी लावलेली. त्याचा धडाका इतका होता की, त्याच्यापुढे वीरेंद्र सेहवाग झाकोळला गेला होता.

दादा इतका सुसाट सुटला म्हटल्यावर गप्प बसेल तो वीरू कसला? त्याने रॉनी इराणीला हेरला आणि एकाच ओव्हरमध्ये चार चौकारांचे वळ उठवले. तेराव्या ओव्हरमध्ये भारताने शंभरी गाठलेली. सगळ्यांना कॉन्फिडन्स आलेला की, आपण जिंकू शकतो. मात्र, इतक्यात माशी शिंकली. टूडरने दादाला बोल्ड केले. दादा सॉलिड फाउंडेशन देऊन फक्त 43 चेंडूत 60 धावा करत माघारी गेलेला. पुढच्याच ओव्हरला जाईल्सच्या फिरकीत सेहवाग अडकला. त्याच्या बॅटमधून 45 रन्स आले.

Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती

इंग्लंडला ओपनिंग मिळाली होती. दोन्ही सेट ओपनर घालवल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी स्लो बॉलची नवी रणनीती आखली. त्यांच्या या रणनीतीत पुढच्या सात ओव्हरमध्ये ‌मोंगिया, सचिन आणि द्रविड सापडले. बिनबाद 106 वरून टीम इंडिया अचानक 5 बाद 146 अशी लडखडली होती. जाईल्सने सचिनला बोल्ड केल्यावर करोडो भारतीयांनी टीव्ही बंद केले. सचिन बाद झाल्यावर जो मोहम्मद कैफ बॅटिंगला आला, त्याच्या घरचेदेखील थेट कुलूप लावून मूवी बघायला थिएटरमध्ये गेलेले. चाहत्यांच्या दृष्टीने भारताची मॅच संपली होती.

म्हणतात ना जिथे गमावण्यासारखं काही नसतं, तिथे जिंकण्यासाठी खूप काही असतं. अगदी तीच म्हण त्या दिवशी भारताच्या दोन तरण्याबांड पोरांनी सत्यात उतरवून दाखवली. अगदी पंधरा वर्षांचे असल्यापासून भारताच्या ज्युनिअर संघाचे सोबती असलेले युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफ (Mohammad Kaif), क्रिकेटच्या पंढरीवर जमले. दोघांनी अंदाज घेत हळूहळू एकेरी-दुहेरी धावांनी स्कोरबोर्ड पुढे नेला. एखाद्या खराब चेंडूवर बाऊंड्री येत होती. स्लो वाटत असले तरी 10 ओव्हरमध्ये फिफ्टी पार्टनरशिप करत त्यांनी संघाला 200 पर्यंत नेले.

इथून मात्र युवराजने गिअर चेंज केले आणि इंग्लंडच्या बॉलर्सना पट्ट्यात घेतले. स्टायलिश सिक्स आणि फोर मारत त्याने 53 बॉल्समध्ये फिफ्टी पूर्ण केली. दुसरीकडे कैफ वेळ घेत होता. युवराजचा टच दिसत असल्याने, कॅप्टन गांगुलीने ड्रेसिंग रूममधून मेसेज पाठवला की, “स्ट्राइक युवराजला दे, तो सिक्स मारेल.” ही गोष्ट कैफच्या जिव्हारी लागली आणि त्याने पुढच्याच ओव्हरमध्ये टूडरला मिडविकेटवरून एक जोरदार छक्का ठोकला. युवी बरोबरच आता कैफही सुरू झालेला.‌ इंग्लंडला ही दुधारी त’लवार चांगलीच का’पत होती. कैफने देखील यादरम्यान आपले अर्धशतक फलकावर लावले.‌ (Yuvraj Singh NatWest Trophy)

सगळं काही ठीक असतानाच, युवीचा टॉप एज लागलेला बॉल टूडरने पकडला आणि 69 रन्स करून युवी तंबूत परतला. सहाव्या विकेटसाठीची 121 रनांची लाजवाब आणि बहारदार पार्टनरशिप तुटली होती. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 50 चेंडूंमध्ये आणखी 59 रन्स हवे होते. इथून खऱ्या अर्थाने कैफने (Kaif NatWest Trophy) डावाची सूत्रे हातात घेतली आणि पटापट धावा काढायला सुरुवात केली. कारण, मुख्य फलंदाजांपैकी तो एकटाच आता शिल्लक होता. त्याने षटकार-चौकार मारले. हरभजनने देखील महत्त्वाच्या 15 रन्स काढल्या.

मॅच टीम इंडियाच्या हातात आली होती. 16 बॉल्समध्ये गरज होती फक्त 12 रन्सची. इथे फ्लिंटॉफने ट्विस्ट आणला. त्याने हरभजनला बोल्ड केले. दोन बॉलनंतर त्याने कुंबळेला देखील खाते खोलू न देता माघारी पाठवले. मॅच फसू लागलेली. पुढच्या ओव्हरमध्ये गॉफने पाच बॉल टाईट टाकले. मात्र, तरीही पाच रन्स घेण्यात कैफ आणि झहीर यशस्वी ठरलेले. त्या ओव्हरच्या लास्ट बॉलला कैफच्या बॅटची आऊटसाईड एज लागून फोर गेला आणि भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. लास्ट ओव्हरमध्ये फक्त दोन रनची गरज होती.

बॉल फ्लिंटॉफच्या हातात आणि स्ट्राइकवर झहीर. काहीही घडू शकत होत. पहिल्या दोन बॉलला झहीर बॅटही लावू शकला नाही. आता दबाव वाढत होता. तिसरा बॉल त्याने कव्हर्सच्या दिशेने पुश केला. कैफ आणि झहीर जीवाच्या आकांताने पळाले. इरानीचा तो थ्रो स्टम्प्सवर लागू शकला नाही, आणि मिस फिल्डचा फायदा घेत दोघांनी दोन रन्स पूर्ण केले. टीम इंडियाने इतिहास रचला होता. इंग्लंडला इंग्लंडच्या मैदानावर मात द्यायची कामगिरी केली गेली होती. झहीर-कैफ एकमेकांना मिठी मारत होते. तर, इंग्लंडचे खेळाडू डोक्याला हात लावून खाली बसलेले. कैफची 75 बॉल्समधील 87 धावांची नाबाद इनिंग भारतीय क्रिकेटच्या इतिहासात लिहिली गेलेली.

हे सगळे घडत असताना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक बाल्कनीत मात्र आणखी एक न विसरला जाणारा आणि अविश्वसनीय क्षण घडलेला. कॅप्टन गांगुली थेट शर्ट काढून त्या बाल्कनीत फिरवत होता. त्याचा तो आवेश आणि ती साऱ्यांना भावली होती. इंग्लंड भारत दौऱ्यावर आला असताना, फ्लिंटॉफने वानखेडेवर असेच शर्ट काढून सेलिब्रेट केले होते. त्याची सव्याज परतफेड दादाने त्यांच्याच घरात जाऊन केलेली.

लॉर्ड्सवर असलेले भारतीय चाहते अक्षरशः वेडावले होते. युवी-कैफ यांच्या रूपाने भारतीय क्रिकेटला नवे हिरो आणि हिरे मिळाले होते. त्याहूनही अधिक मिळालं होतं ते म्हणजे दहा हत्तीचे बळ, जे पुढे जाऊन भारताला जागतिक क्रिकेटवर राज्य करण्यासाठी लागणार होतं!!!

(Story Of NatWest Trophy 2002 Win)

Exit mobile version