Breaking News

Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती

story of sourav ganguly
Photo Courtesy: X/ DD News

Story Of Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज (8 जुलै) आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.‌ खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेट प्रशासक अशा तीनही भूमिकांमध्ये आपले ‘दादा’ हे नाव सार्थ करणाऱ्या, सौरवच्या कहाणीचा घेतलेला हा मागोवा.

(Story Of Sourav Ganguly)

दादाचा जन्म कोलकात्याच्या सधन कुटुंबातला. तब्बल 30 जणांच भारतीय संस्कृतीला साजेस असं एकत्रित कुटुंब. कुटुंबातील सर्वच कर्तबगार असल्याने एक वेगळाच मानसन्मान त्यांना मिळायचा. घरामध्ये खेळाची देखील आवड सर्वांनाच होती. सौरवचा भाऊ स्नेहाशिष क्रिकेटच्या, तर सौरव साऱ्या कोलकातावासियांसारखा फुटबॉलच्या मैदानावर रमणारा. तशी क्रिकेटबद्दल त्याला आवड नव्हती असेही नाही. कधी वेळ मिळाला तर स्नेहाशिषच किट घालून घरातच बनवलेल्या प्रॅक्टिस एरियात तो देखील हात मोकळे करून घ्यायचा. मात्र, त्याला माहीत नव्हतं की, टेम्पररी खेळत असलेला खेळ त्याला एक दिवस जगभरात ओळख मिळवून देणार आहे.

स्नेहाशिष बंगालच्या अंडर 15 संघाचा नियमित सदस्य आणि महत्त्वाचा फलंदाज होता. एका स्पर्धेवेळी बंगालचे एकाच वेळी सात खेळाडू टायफाईडने आजारी पडले. स्पर्धा कोलकात्यातच होती. सौरवही घरीच होता. सामना खेळायचा तर होता म्हणून थेट स्नेहाशिषच किट घेऊन सौरवला सामन्यात उतरवल. एकदम बेफिकीर म्हणून सर्वांना माहीत असलेल्या सौरवने, त्या सामन्यात तशीच फलंदाजी केली आणि शतक ठोकलं. भावाच्या जागेवर खेळताना, भावाच्या बॅटने आणि किटने केलेल्या या शतकामुळे त्याचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.

या कहाणीची आणखी एक गंमत अशी की, सौरव तसा उजवा. मात्र, स्नेहाशिषला खेळताना पाहून आणि डावखुऱ्या फलंदाजाला सूट होईल असे किट वापरल्यामुळे सौरव डाव्या हाताने फलंदाजी करायचा. पुढे सातत्याने क्रिकेटशी जोडून राहिल्याने आणि मेहनत केल्याने 1989 मध्ये त्याला पहिल्यांदाच बंगालच्या रणजी संघात जागा मिळाली. इथे देखील त्याने भाऊ स्नेहाशिष याचीच जागा आपली केली. सीनियर लेव्हलला गेल्यावर दादाची दादागिरी आकड्यांमध्ये दिसली.

सौरवला रणजी ते टीम इंडिया असा प्रवास करायला तर तीन वर्षांचा कालावधी लागला. ऑस्ट्रेलियात झालेल्या 1992 च्या ऑस्ट्रेलिया-भारत-वेस्टइंडीज तिरंगी वनडे मालिकेसाठी त्याची निवड भारतीय संघात झाली. इथे त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याला 3 धावा करता आल्या. या मालिकेविषयी आणि दादाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात‌. एक गोष्ट अशी सांगितली जाते की, सौरवने ड्रिंक्स घेऊन जाण्यास नकार दिला होता. त्याचा हा ऍटीट्यूड अनेकांना आवडला नाही म्हणून त्याला संघातून बाहेर केले गेले. दुसरीकडे सौरवने त्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे की, त्या पहिल्याच टूरवर माझ्यासोबत अनेक जण वाईट वागले. मला वागणे सुधरायला लावले.

या टूरनंतर वनडे वर्ल्डकप व्हायचा होता. वर्ल्डकपला जाण्यासाठी तेव्हा सचिन तेंडुलकरने सौरवला त्याची जड बॅट मागितली. सौरवने तेव्हा ती बॅट दिली मात्र तेथून निघताना निश्चय केला की, “मी पुन्हा येईन” आणि सगळ्यांना माझ्या खेळाने उत्तर देईल. पुढचे तीन सिझन त्याची बॅट खरंच बोलली आणि त्याने टीम इंडियाचे दार पुन्हा एकदा ठोठावले.

अखेर तो दिवस आलाच जेव्हा दादाने मनाशी केलेला ‘मी पुन्हा येईन’ चा निश्चय पूर्ण केला. बरोबर चार वर्षांनी 1996 इंग्लंड टूर त्याचा संघात समावेश केला गेला. इथे देखील त्याला संधी मिळणार याची शक्यता कमी होती. मात्र, नशीब त्याच्या बाजूने होते. सिद्धू आणि कॅप्टन अझरुद्दीन यांच्यात वाजलं आणि सिद्धू तडकाफडकी घरी निघून आला. इथे त्याच्या नशिबाने दार उघडलं आणि टेस्ट डेब्यू झाला थेट क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. सौरवने पदार्पणातच लॉर्ड्सवर शतक ठोकल आणि दुसऱ्या नॉटिंगहॅम कसोटीतही बॅट उंचावण्याची संधी त्याला मिळाली. गांगुली एराची ती सुरुवात होती.

सौरव आता टीम इंडियाचा पर्मनंट मेंबर झाला होता.‌ बॅटिंग ऑर्डरमधला कणाही झालेला. अशात भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट काळ सुरू झाला. 2000 चे मॅच फिक्सिंग प्रकरण चांगल्या-चांगल्यांना घेऊन बुडाल. या वाईट काळात सर्वात अवघड जबाबदारी सौरवने खांद्यावर घेतली. तो कॅप्टन बनला. खरंतर अनेक सिनियर खेळाडू प्रकरणात लिप्त असल्याचे समोर आल्यानंतर, सौरवपुढे एक नवीन टीम तयार करायचे आव्हान होते. ते त्याने स्वीकारले आणि यशस्वीही केले.

आज जे 90 किड्स युवराज, कैफ, हरभजन, सेहवाग आणि धोनी यांच्या कहाण्या सांगतात, त्यांना घडवण्यात सौरवची कॅप्टन म्हणून मोठी भूमिका आहे. त्याचवेळी सीनियर सचिन, द्रविड, लक्ष्मण आणि कुंबळे यांना देखील अजिबात नाराज त्याने केले नाही. याच टीमने पुढे जाऊन सर्वांचा पाणी पाजल. 2001 ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, 2002 ची नेटवेस्ट ट्रॉफी आणि 2003 चा वर्ल्डकप ही त्याचीच काही उदाहरणे. दादा हा 19 वर्षानंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार होता ही गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते. 2002 चॅम्पियन्स ट्रॉफी शेअर करत जिंकल्याने याची फारशी चर्चा झाली नाही इतकेच.

भारतीय क्रिकेट एका नव्या उंचीवर पोहोचणार असे वाटत असताना, गांगुलीला खऱ्या अर्थाने ज्यांनी भक्कम पाठिंबा दिला त्या जॉन राईट यांनी टीम इंडियाचे कोच म्हणून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये जो काही अभूतपूर्व कलह झाला त्यात केंद्रस्थानी आला दादा. ज्या ग्रेग चॅपेल यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात गांगुलीने पुढाकार घेतला, त्याच चॅपेल यांनी त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले आणि नंतर संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवला (Ganguly-Chappell Controversy). हे सगळच अनपेक्षित होतं आणि भारतीय क्रिकेटमध्ये पुरता गोंधळ निर्माण झालेला.

जवळपास 16 महिने तो वनडे संघातून बाहेर होता. याच काळात त्याची ती लोकांना प्रचंड भावनिक करणारी ‘मेरा नाम सौरव गांगुली है, भुले तो नहीं ना’ ही जाहिरात येऊन गेली आणि त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट आणखीनच वाढली. दादाने वर्ल्डकपआधी दमदार पुनरागमन करत टीम इंडियातील जागा पुन्हा मिळवली. पुढे संघाचे 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये पानिपत झाले आणि चॅपेल यांना हटवले गेले.  तो एक काळा कार्यकाळ समाप्त झाला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

संघाचे नेतृत्व एमएस धोनीकडे आले आणि त्याने पुढच्या वर्ल्डकपसाठी नवीन खेळाडूंची फौज पाहिजे अशी अट घातली आणि इथे दादासह अनेकांचा वनडे टीममधील पत्ता कट झाला. धोनीने ऑस्ट्रेलिया सिरीज जिंकून दाखवल्याने, बीसीसीआयलाही कॉन्फिडन्स आलेला आणि त्यांनी तो निर्णय घेतला. पुढे दादाने आणखी वर्षभर कसोटी क्रिकेट खेळले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नोव्हेंबर 2008 मध्ये अलविदा केला. भारतीय क्रिकेटमधील दादागिरी संपली होती. धोनीने त्याला अखेरच्या काही ओव्हर्स कॅप्टन्सी करायला लावत, त्याचा यशोचित सन्मानही केला.

पुढे आयपीएलचा मैदानही त्याने गाजवलं. वादांनी इथेही पाठ सोडली नाही आणि त्याच्याच कोलकात्यातून त्याला तीन सीझननंतर बाहेरचा रस्ता दाखवला गेला. चाहत्यांनी चक्क मोर्चे काढले. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. कोलकाता सोडून आयपीएलसाठी दादा पुणेकर झाला. वाढत वय आणि ढासळती कामगिरी या गोष्टी लक्षात घेत त्याने स्वतःच 2012 आयपीएलनंतर खेळाडू म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा- .. आज सफल झाली सेवा!!!

मुळातच नेतृत्व नसानसात भिनलेला दादा घरी बसणारा नव्हता. त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये प्रवेश केला. बंगालचा क्रिकेट सुधारलं. ईडन गार्डन्सच तर रूपच बदलून टाकलं. सर्वात अत्याधुनिक सुविधा त्याने ईडनवर आणल्या. यानंतर बारी होती थेट बीसीसीआयचा बादशहा होण्याची. दादा बीसीसीआय अध्यक्ष झाला. भारतीय क्रिकेटचा सर्वेसर्वा. अनेक ऐतिहासिक निर्णय त्याच्या कार्यकाळात घेतले गेले. नेहमीप्रमाणे वादांनी इथेही पाठ सोडलीच नाही. मात्र, तो आपल्या जागी ठाम राहिला. रवी शास्त्री आणि विराट कोहली सोबत वाद झाल्याच्या बातम्यांनी तर अक्षरशः रान पेटवलं होतं. विराटला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णयही त्याचाच असल्याचे बोलले जाते. विराटने देखील प्रेस कॉन्फरन्स घेत हे प्रकरण चांगलेच वाढवले होते. मात्र, दादा विराटच्या स्टारडमपुढे झुकला नाही. चार वर्षांनी का होईना रोहित शर्मा ला कर्णधार करण्याचा त्याचा निर्णय योग्यच होता, हे टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यावर सिद्ध झालं. आज दादा फक्त दिल्ली कॅपिटल्सचा मेंटर म्हणून दिसतो. अधूनमधून तो राजकारणात जाणार अशा बातम्या देखील येत असतात. मात्र, तो यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही.

गांगुलींच्या कुटुंबातील छोटा सौरव, खेळाडू म्हणून बेफिकीर, कर्णधार म्हणून निर्भीड आणि क्रिकेट प्रशासक म्हणून धोरणी या सगळ्याच भूमिका त्याने अगदी योग्य वठवल्या. ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ म्हणून येत भारतीय क्रिकेटचा ‘दादा’ होणे त्याला चांगलच जमलं!

(Story Of Sourav Ganguly On His 52 Birthday)

 

Exit mobile version