Breaking News

… आज सफल झाली सेवा!!!

 

RAHUL DRAVID
Photo Courtesy: X/BCCI

– महेश वाघमारे 

भारताच्या क्रिकेट संघाने 11 वर्षांचा वनवास संपवून आयसीसी ट्रॉफी जिंकली. मध्यरात्री सारा भारत रस्त्यावर आला. सोशल मीडियावर फॅन वॉर करणारे स्टोरीला ‘We R The World Champions’ लावून जोरदार पार्टी करत होते. विराट-रोहितने टी20 मधून थांबण्याचा निर्णय घेतला म्हणून, Die Hard फॅन्स भावूक होते. एक चांगली फायनल पाहिल्याच समाधान जुन्या-जाणत्यांना लाभलं. या साऱ्यात माझ्यासारख्या अनेक Millennials ची नजर एका माणसाला शोधत होती. आणि तो होता हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid).

राहुल द्रविडला ज्यांनी खेळताना पाहिला त्यांच्यासाठी तो फक्त एक खेळाडू नक्कीच नव्हता. एखाद्या मिडल क्लास बापाला आपला मुलगा इतका सिन्सिअर असावा असं वाटायच. आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो आयडल. लाखो तरूणींचा क्रश तर बऱ्याच एकलव्यांचा द्रोणाचार्य.

द्रविडचा सॉलिड डिफेन्स बघून क्रिकेटप्रेमींची आणि क्रिकेटर्सची सर्वात जुनी पिढी त्याचे कौतुक करताना थकत नसायची. कसोटीत दिवसभर बॉलर्सला थकवणारा द्रविड वनडे क्रिकेटमध्ये 22 बॉलमध्ये फिफ्टी देखील मारायचा. कॅप्टन म्हणला विकेटकीपिंग कर, ग्लोव्हज हातात घालायचा. स्लीपमध्ये, सिली पॉईंट किंवा आऊटफिल्ड कुठेही फिल्डिंग करण्याची तयारी. भारतीय क्रिकेट सर्वात वाईट काळातून जात असताना, कॅप्टन्सीचा काटेरी मुकुटही त्याने डोक्यावर घेतला. ना कुठली तक्रार, ना कसला आकांडतांडव. एक परफेक्ट टीममॅन.

एक बॅटर म्हणून त्याने भारतीय क्रिकेटला काय दिलं? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर लिहायला शब्द पुरेसे पडणार नाहीत. सचिन नावाच्या एव्हरेस्टच्या सावलीत द्रविड नावाचा सह्याद्री बऱ्याचदा खुजा वाटला. आकडेवारी सगळं काही बोलत असली तरी द्रविडला त्याचा Due मिळाला नाही ही अनेक क्रिकेटप्रेमींची खंत नक्कीच आहे. लहानपणी कुठेतरी वाचले होते, ‘आदर्श सचिनचा जरूर घ्या. मात्र, मार्ग द्रविडचा धरा.’ त्याचा Context इतकाच होता की, दरवेळी तुम्हाला सगळं काही मिळणार नाही. संयम दाखवा वेळेवर तुमची दखल नक्की घेतली जाईल.

द्रविडला कधीतरी त्याचा Due मिळेल, ही अपेक्षा होती. 1999 आणि 2003 ला वर्ल्ड चॅम्पियन व्हायची भारताची संधी हुकली. 2007 ला द्रविडच कॅप्टन असताना कॅरेबियन बेटावर वर्ल्डकपमध्ये मोठा फियास्को झाला. टी20 ला निवड होण्याची काहीच संधी नव्हती. 2011 ला भारत वर्ल्ड चॅम्पियन बनली खरी, मात्र तिथे द्रविड नव्हता. वर्ल्डकपची ट्रॉफी उचलायचे स्वप्न आता कायमचे अधुरे राहणार, हे स्फटिकासारखे स्पष्ट झालेले.

वर्ल्डकपनंतर इंग्लंड टूर आली आणि भारतीय संघाचं टेस्ट सिरीजमध्ये अक्षरशः पानीपत झालं. डोळ्यावर असलेली वर्ल्डकपची धुंदी उतरली. लाजिरवाण्या 4-0 अशा पराभवाच्या अंधारात द्रविड मात्र हिऱ्यासारखा लकाकलेला. करिअरच्या संध्याकाळीही ‘द वॉल’ नाव सार्थ करत राहिला. सगळ्याच बॅटर्सनी नांग्या टाकलेल्या असल्याने वनडे आणि टी20 सिरीजसाठी द्रविडची अनपेक्षित निवड झाली. त्याच्यासाठी देखील हा धक्काच होता. त्यातच त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा करून टाकली. शेवटच्या वनडेत लाजवाब फिफ्टी आणि एकमेव टी20 मध्ये समित पटेलला सिक्सर्सची मारलेली हॅट्रिक, असे आठवणीत राहणारे क्षण तो देऊन गेला.

करिअर शेवटाकडे आले याची कल्पना त्याला देखील होती. त्याच वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियात देखील भारताची इंग्लंड सारखीच दयनीय अवस्था झाली. यावेळी मात्र पराभवाचे खापर पूर्णपणे सिनियर्सवर फोडले गेले. चौफेर टीका होऊ लागली. घरच्या मैदानावर एखादी टेस्ट खेळून निवांत रिटायर व्हावे, असं त्याला मनात वाटलं असेलच. आणि बोलून दाखवले असते तरी, त्याला नाही म्हणणारे कोणी नव्हते. मात्र, त्याने ते प्रिव्हिलेज न घेण्याचं आधीच ठरवलेल असावं. अगदी कोणताही गाजावाजा न करता ऑस्ट्रेलियावरून आल्यावर ‌रिटायर होत असल्याची घोषणा त्याने केली. इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर होताना द्रविड सहकाऱ्यांच्या खांद्यावर असावा, हे चित्र पाहायचं राहूनच गेलं.

आयपीएलमध्ये खेळताना तरी Fairy Tale एंडिंग होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तिथेही हाती निराशा आली. शेवटची संधी होती चॅम्पियन्स लीगची. राजस्थान रॉयल्स फायनलपर्यंत पोहोचली देखील. द्रविडच्या व्यावसायिक क्रिकेटमधली ती शेवटची मॅच. दुर्दैवाने म्हणा किंवा काहीही म्हणा, इथे देखील सचिनच त्याला सरस गेला आणि एक खेळाडू म्हणून ट्रॉफी उचलत Sign Off करण्याची द्रविडची संधी हुकली ती कायमचीच!

पुढे द्रविड कोचिंगमध्ये आला. भारताच्या अंडर 19 संघाला सलग तीन अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये नेलं. त्यात 2018 ला चॅम्पियन ही बनवलं. परंतु, सीनियर लेवलच्या इंटरनॅशनल ट्रॉफीची कमतरता अजूनही होतीच. नॅशनल टीम मोठ्या काळापासून आयसीसी ट्रॉफी जिंकत नाही, या Desparation ने शेवटी 2020 मध्ये द्रविड टीम इंडियाचा हेड कोच बनला.

द्रविडला तीन वर्षाचा कार्यकाळ मिळणार होता. यामध्ये त्याला आपल्या साऱ्या करिअरचा निचोड काढायचा होता. पण, बिग ट्रॉफी द्रविडच्या नशिबातच नाही, असं चित्र दिसू लागलं. टीम जबरदस्त खेळत होती. मात्र, मोठ्या मॅचेसला कच खाणे सुरू होते‌. 2021 डब्ल्यूटीसी फायनल, 2022 टी20 सेमी फायनल, पुन्हा 2023 डब्लूटीसी फायनल आणि शेवटी 2023 वनडे वर्ल्डकप फायनल. सगळीकडे टीम इंडियाच्या आणि द्रविडच्या हाती लागलं अपयश.

द्रविड 2023 वनडे वर्ल्डकपनंतरच पद सोडणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, एक बनवलेली टीम अशीच दुसऱ्या कोचच्या हातात द्यायला कॅप्टन रोहित शर्मा आणि सीनियर विराट कोहलीने विरोध केला. “अजून थोडे दिवस” म्हणत टी20 वर्ल्डकपपर्यंत द्रविडला थांबण्याची विनंती केली. द्रविडनेही त्यांच्या विनंतीला मान दिला. आणि बरोबर सात महिन्यांनी इतिहास घडला.

ज्या वेस्ट इंडिजच्या भूमीवर द्रविडला आभाळा एवढं अपयश आलं होतं, त्याच भूमीवर द्रविडच्या करिअरचा सर्वात मोठा क्षण आला. जवळपास तीन दशक ज्या वर्ल्डकप ट्रॉफीला हातात घेण्यासाठी द्रविड तरसलेला, ती वर्ल्डकप ट्रॉफी हातात आल्यावर द्रविड वेड्यासारखा ओरडताना दिसला. जगाची कोणतीही पर्वा न करता. द्रविडच्या करिअरचं वर्तुळ पूर्ण झालेल!!!

टीम इंडियाचा वर्ल्डकप विनिंग कोच म्हणून द्रविड आज थांबतोय. हा प्रवास थांबवत असताना, तुकाराम महाराजांनी गाथेत म्हटल्याप्रमाणे त्याच्या मनात फक्त हीच भावना असेल,

“तुका म्हणे देवा, आज सफल झाली सेवा!!!”

(Rahul Dravid Glorious Cricket Carrier)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version