Breaking News

ते सध्या काय करतात? Mumbai Indians साठी पहिली IPL मॅच खेळलेले 11 जण कुठे आहेत? नक्की वाचाच

MUMBAI INDIANS
Photo Courtesy: X

Mumbai Indians First Playing XI: सध्या सुरू असलेला आयपीएलचा अठरावा हंगाम मध्यात पोहोचला आहे. आयपीएलचा पहिला सामना 18 एप्रिल 2018 रोजी बेंगलोर येथे खेळला गेलेला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या व पाच वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपला पहिला सामना 20 एप्रिल रोजी खेळला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पाच घडी राखून पराभूत केले होते.

Mumbai Indians First Playing XI

त्या सामन्यात मुंबईसाठी खेळलेले 11 खेळाडू सध्या काय करतात हे आपण जाणून घेऊया.

1) हरभजन सिंग (कर्णधार) – नियमित कर्णधार सचिन तेंडुलकर दुखापतीमुळे पहिल्या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे हरभजन सिंग याला कर्णधार नियुक्त केले गेलेले. हरभजन तब्बल 10 हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खेळला. त्याच्या नेतृत्वात संघाने 2012 मध्ये चॅम्पियन्स लीग देखील जिंकली होती. भारताचा महान फिरकीपटू असलेला हरभजन निवृत्तीनंतर सध्या समालोचन करतो. तसेच, तो राज्यसभेचा सदस्य देखील आहे.

2) सनथ जयसूर्या- श्रीलंकेचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू असलेल्या जयसूर्याने पहिले तीन हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खेळले. त्यानंतर तो सर्व प्रकारचे क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर त्याने राजकारणात हात आजमावत. काही वर्षांपूर्वीच गंभीर दुखापतीमुळे तो अंथरुणाला खिळून होता. मात्र, मागील सहा महिन्यांपासून तो श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक असून, त्याच्या मार्गदर्शनात संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Mumbai Indians First Playing XI

3) शॉन पोलॉक- दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेल्या पोलॉक याने पहिल्या हंगामात हरभजन सिंग याच्या निलंबनानंतर संघाचे नेतृत्व देखील केले होते. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक असलेल्या पोलॉकने निवृत्तीनंतर पूर्णवेळ समालोचक म्हणून कारकीर्द सुरू ठेवली आहे.

4) रॉबिन उथप्पा- भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेला रॉबिन उथप्पा हा त्यावेळी मुंबई संघासाठी मधल्या फळीत फलंदाजी करत. मुंबईच्या पहिल्या सामन्यात त्याने संघासाठी सर्वाधिक 48 धावांची खेळी केली होती. आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2022 मध्ये निवृत्त झाल्यानंतर उथप्पा समालोचकाच्या भूमिकेत दिसतो.

5) अभिषेक नायर- मुंबईकर असलेला अभिषेक नायर त्यावेळी मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा पहिला मुंबईकर खेळाडू ठरलेला. भारतीय संघाकडून केवळ दोन सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. आयपीएलमध्ये मुंबई, पुणे व राजस्थान अशा विविध संघांसाठी तो खेळताना दिसला.‌ निवृत्तीनंतर नायर हा एक नामांकित प्रशिक्षक म्हणून ओळखला जातो. त्याच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2024 आयपीएल जिंकण्याचा कारनामा केला. तसेच, काही काळ तो भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक देखील राहिला. आयपीएल 2025 मध्ये तो पुन्हा एकदा केकेआर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दिसत आहे.

Mumbai Indians First Playing XI

6) ल्युक रॉंची- ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा दोन देशांसाठी खेळणारा यष्टीरक्षक ल्युक रॉंची मुंबई इंडियन्ससाठी पहिल्या सामन्यात सलामीवीर म्हणून उतरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर 120 पेक्षा जास्त सामने खेळणारा रॉंची 2017 मध्ये निवृत्त झाला. निवृत्तीनंतर त्याने न्यूझीलंड संघासाठी‌ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक व नंतर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली‌. काही दिवसांपूर्वी तो पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात होती.

7) डॉमिनिक थॉर्नली- ऑस्ट्रेलियन फलंदाज असलेला डॉमिनिक थॉर्नली या सामन्यात पाच चेंडू खेळून एकही धाव न काढता दुखापतग्रस्त होऊन बाहेर झाला होता. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर प्रशिक्षक म्हणून त्याने विविध संघांसाठी काम पाहिले. सध्या तो ऑस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्स महिला संघाचे प्रशिक्षकपद भूषवतो.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

8) आशिष नेहरा- भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य राहिलेला आशिष नेहरा पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज होता. त्यानंतर नेहरा दिल्ली डेअरडेविल्स, पुणे वॉरियर्स, सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांचा भाग राहिला. निवृत्तीनंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व‌ गुजरात टायटन्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. त्याच्याच मार्गदर्शनात गुजरातने 2022 मध्ये आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएल विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. तो सध्या देखील गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

9) धवल कुलकर्णी- भारतीय संघाचा गोलंदाज राहिलेला धवल कुलकर्णी मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा दुसरा मुंबईकर होता. धवलने आयपीएलमध्ये मुंबईसह राजस्थान रॉयल्स व गुजरात लायन्स संघाच्या प्रतिनिधित्व केले. धवलने 2023 रणजी ट्रॉफी विजयानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो अनेक निवृत्त क्रिकेटपटूंच्या लीग खेळताना दिसतो. तसेच, आयपीएल दरम्यान मराठी समालोचन संघाचा देखील तो भाग असतो.

10) पिनल शहा- यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या पिनल शहा याने पहिले दोन हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खेळले होते. पहिल्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्यांनी 19 धावांची खेळी केलेली. मात्र, कामगिरीत सातत्य न राखता आल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप देखील करण्यात आले होते. त्याने काही सामन्यांमध्ये बडोदा संघाचे नेतृत्व देखील केलेले. शहा याने 2021 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सध्या तो बडोदा येथे क्रिकेट अकादमी चालवतो.

11) मुसावीर खोटे- मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी अथवा गोलंदाजीची संधी न मिळालेला एकमेव खेळाडू मुसावीर खोटे हा होता. आक्रमक फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी अशी कौशल्य त्याच्याकडे होती. आयपीएलचा पहिला हंगामात त्याने मुंबईसाठी चार सामने खेळले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई व रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर तो मुंबई येथे क्रिकेट अकादमीत युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतो.

(Mumbai Indians First Playing XI In 2008)

हे देखील वाचा- कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

Exit mobile version