Breaking News

Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ दाखवणारे सुनील गावसकर

sunil gavaskar
Photo Courtesy: X/SRH

Sunil Gavaskar Story: भारतीय क्रिकेटचा पहिला सुपरस्टार कोण? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाची उत्तरे अनेक दिली जातात. कोणी कर्नल सीके नायडू यांचे नाव घेतात, कोणी टायगर पतौडी, तर कोणी नाव घेतो लालाजींचे. मात्र प्रसिद्धी, मैदानावरील खेळ, आकडे आणि इतर सगळ्यात बाबींचा विचार केल्यास हा मान जाईल ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांना. आज (10 जुलै) भारतीय क्रिकेटमधील (Sunil Gavaskar Birthday) हा विक्रमादित्य आपल्या आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय.

भारताने जेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून आपला संघ नेहमीच दुबळ्या संघात गणला जायचा. क्रिकेटवर खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवले इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांनी. त्यांच्या या साम्राज्याला सुरुंग लावण्याचे पहिले काम केले भारताने. कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 वनडे विश्वचषक (1983 ODI World Cup) भारताने जिंकला आणि भारत खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील महासत्ता होण्याच्या दिशेने, मार्गक्रमण करू लागला. मात्र, त्याआधी 1971 मध्ये सुनील गावसकर यांनी भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ आणण्यास सुरुवात केलेली.

भारतात जसे क्रिकेट आले तेव्हापासून मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी झालेली. कारण भारतीय संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडू हे मुंबईचे असायचे. हीच परंपरा देशांतर्गत क्रिकेट गाजवत सुनील गावसकर यांनी कायम ठेवली. मुंबई आणि रणजीची मैदाने गाजवल्यावर गावसकर यांना त्यावेळी सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासह पाठवण्यात आले.

आजकालची पिढी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि आता भारताचे ही वेगवान गोलंदाज पाहून, हे किती जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत असे उद्गार काढत असतील. मात्र, 70 आणि 80 च्या दशकातील ‌विंडीजच्या गोलंदाजांची नावे काढली तरी, कोणत्याही फलंदाजाला धडकी भरायची. तेव्हा फक्त 22 वर्षाच्या गावसकर यांनी आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये 5 कसोटीत धावा केल्या होत्या 774 आणि ‌ त्यांची सरासरी होती तब्बल 154 तर शतके चार. बिना हेल्मेट फलंदाजांना कर्दनकाळ असलेल्या त्या खेळपट्ट्यांवर त्यांनी दाखवलेली जिगर आजही अनेक फलंदाज इन्स्पिरेशन म्हणून पाहतात.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

गावसकरांच्या पदार्पणाच्या आधीच माजी कर्णधार चंदू बोर्डे हे अजित वाडेकरांना म्हणाले होते की, “मुंबईचा हा पोरगा पुढे जाऊन भारताचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू बनेल” त्यांच्या या शब्दांना गावसकर पहिल्याच सिरीजमध्ये जागले. त्यानंतर लोकांनी फक्त त्यांचा खेळ आणि ते मोडत असलेले रेकॉर्ड पाहिले. वेस्ट इंडिजमध्ये टाच मारलेला त्यांचा यशाचा रथ जगभरात सगळीकडे धावला.

गावसकर किती महान होते हे परिस्थिती आणि आकडे स्पष्ट करतात. मार्शल, गार्नर, इम्रान, लिली,‌ थॉम्पसन, हेडली यांच्यासारख्या अस्सल वेगवान गोलंदाजांना त्यांनी फोडून काढले होते. त्यांच्यावर पुढे फिरकी गोलंदाज गोलंदाजी करायला घाबरायचे. जगभरातील कोणत्याही मैदानावरती खेळायला उतरले तरी त्यांच्याबद्दल विरोधी खेळाडू आदर दाखवायचे. क्रिकेटच्या पहिल्या पिढीतील अनेक दिग्गज त्यांच्या बॅटिंगचे सुंदर अशा शब्दात वर्णन करत.

Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती

क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे असे म्हणतात. तर, गावसकर त्याचे देखील राजे झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 30 कसोटी शतके झळकावणारे ते पहिले फलंदाज. 10,000 धावांची ऐतिहासिक मजल मारणारे ते पहिलेच. कसोटीच्या चारही डावांमध्ये त्यांच्या बॅटमधून द्विशतके आलीत. त्यांचं कसोटी करिअर थांबलं तेव्हा त्यांच्या नावावर 10,000 पेक्षा जास्त धावा, 34 शतके आणि 51 ची सरासरी. त्यांच्या नावापुढे लिजेंड असं लावायला हे आकडे पुरेसे आहेत.

कसोटी क्रिकेटमधील यश गावसकर यांना वनडेत मात्र मिळालं नव्हतं. पहिल्या वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात त्यांची 36 धावांची ती टुकटुक खेळी त्यांच्या कारकिर्दीवरील डागाप्रमाणे राहिली. मात्र, असे असले तरी 1983 वनडे विश्वचषक आणि 1985 वनडे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट या स्पर्धा भारतीय संघाला जिंकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 1987 वनडे वर्ल्डकप खेळताना सर्वात वेगवान 88 चेंडूत शतक देखील त्यांनी मारले. याच वर्ल्डकपनंतर त्यांनी वनडे क्रिकेटला गुड बाय केला.

गावसकर हे जितके आदर्श क्रिकेटपटू होते तितकेच ते मैदानावर आक्रमक देखील असायचे. ऑस्ट्रेलियात घडलेले ते वॉक आऊट प्रकरण असो किंवा कपिल देव यांच्यासोबत ड्रेसिंग रूममध्ये झालेला वाद असो. गावसकर हे नेहमीच आपला मुंबई स्वॅग दाखवण्यास मागेपुढे पाहत नसत. मैदानावर त्यांचे हे रूप संघ सहकाऱ्यांना चांगलेच माहीत होते.

क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर त्यांनी कॉमेंट्री क्षेत्रात आपली सेकंड इनिंग सुरू केली. जगभरातील सर्वात वरिष्ठ समालोचकांपैकी ते एक आहेत. अगदी बेधडकपणे आपले म्हणणे मांडण्यास ते जराही कचरत नाहीत. अनेकदा त्याच्यामुळे विशिष्ट खेळाडूंच्या चाहत्यांच्या निशाण्यावर ते येतात. मुंबईच्या खेळाडूंचे खास कौतुक केल्यामुळे देखील त्यांच्यावर अनेकदा टीका होते. असे असले तरी, एकदा व्यक्त केलेल्या मतावरून ते हटत नाहीत.

लहानपणी एका नातेवाईकाच्या हुशारीमुळे कोळीवाड्यात जाण्यापासून वाचलेले सुनील मनोहर गावसकर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले नाव आहे, यात शंकाच नाही!

(Story Of Greatest Indian Cricketer Sunil Gavaskar)

Exit mobile version