Breaking News

T20 World Cup 2024| सॉल्टच्या फटकेबाजी पुढे वेस्ट इंडिज हतबल, सुपर 8 मध्ये इंग्लंडची धमाकेदार सुरूवात

t20 world cup 2024
Photo Courtesy: X/England Cricket

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेते इंग्लंड (WI vs ENG) यांच्या दरम्यान खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 गड्यांनी विजय संपादन केला. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) याने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

सेंट लुसिया येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंग 23 धावा करत रिटायर्ड हर्ट झाला. तर, जॉन्सन चार्ल्स व निकोलस पूरन अपेक्षित धावगती राखू शकले नाहीत. त्यांनी अनुक्रमे 32 व 36 धावा केल्या. कर्णधार रोवमन पॉवेल याने केवळ 17 चेंडूंमध्ये 36 धावा करत संघाच्या धाव गतीला वेग दिला. तर, आंद्रे रसेल एक धाव करू शकला. शेरफान रूदरफोर्ड याने अखेरीस 15 चेंडूंमध्ये 28 धावा करत संघाला 180 अशी मजल मारून दिली.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला बटलर व सॉल्ट यांनी सात षटकांमध्ये 67 धावांची आक्रमक सुरुवात दिली. बटलरने 25 धावा केल्या. त्यानंतर आलेला मोईन अली केवळ तेरा धावा करू शकला. यादरम्यान सॉल्टने आपले अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या जॉनी बेअरस्टोने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीला सुरुवात करत, वेस्ट इंडिजवर दडपण आणले. सॉल्ट व जॉनी यांनी 97 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. सॉल्ट याने 47 चेंडूवर 7 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या. तर, जॉनी 26 चेंडूंमध्ये 48 धावा करून नाबाद राहिला. सॉल्ट याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

(T20 World Cup 2024 England Beat West Indies Phil Salt Shines)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version