Breaking News

IND vs ENG : ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा नंबर, सेमीफायनलमध्ये भारताकडे 2 वर्षांपूर्वीची जखम भरुन काढण्याची संधी!

IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : सोमवारी (24 जून) डॅरेन सॅमी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) झालेला आपला शेवटचा सुपर 8 सामना भारताने 24 धावांनी जिंकला. या शानदार विजयासह भारतीय संघाने पाचव्यांदा टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी 2007, 2014, 2016 आणि 2022 मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. यानंतर आता सर्वांच्या नजरा भारताच्या उपांत्य फेरीतील लढतीकडे लागल्या आहेत. 

उपांत्य फेरी सामन्यात भारतापुढे इंग्लंडचे आव्हान असेल. 27 जून रोजी गयानाच्या प्रोव्हिनन्स स्टेडियमवर रात्री 8 वाजता उभय संघ दुसरा उपांत्य फेरी सामना खेळतील. आतापर्यंत या मैदानावर भारतीय संघाने चालू हंगामातील एकही सामना खेळलेला नाही. पहिल्या गटातून अव्वलस्थानी राहिलेल्या भारतीय संघ विरुद्ध दुसऱ्या गटातून दुसऱ्या स्थानी राहिलेल्या इंग्लंड संघांत ही लढत जवळपास निश्चित होती.

पराभवाचा वचपा काढण्याची भारताकडे संधी
भारतीय संघाकडे यंदा इंग्लंडकडून मागील दोन वर्षांचा हिशोब चुकता करण्याची संधी असेल. 2022 च्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारत पोहोचला होता. त्यावेळीही भारताचा सामना इंग्लंडशी झाला होता. ॲडलेड ओव्हलवर खेळवण्यात आलेला सामना इंग्लंडने 10 गडी राखून जिंकला होता. भारतीय संघाने 168 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले होते. जोस बटलरच्या बॅटमधून 80 धावा आल्या होत्या. यावेळीही बटलर इंग्लंड संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावत ​​आहे. त्यामुळे आता भारतीय संघ इंग्लंडला झुकवत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवू शकेल की नाही? हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version