Breaking News

आजपासून WCL 2025 चा थरार! पुन्हा एकदा मिळणार दिग्गजांच्या खेळाची मेजवानी

wcl 2025
Photo Courtesy: X

WCL 2025: निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची प्रमुख आणि सर्वाधिक प्रसिद्ध स्पर्धा असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंडस (World Championship Of Legends) च्या दुसऱ्या हंगामाची शुक्रवारी (18 जुलै) सुरुवात होत आहे. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळली जाईल. सहा संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. सध्या इंडिया चॅम्पियन्स (India Champions) या स्पर्धेचे गतविजेते आहेत.

WCL 2025 Starts On 18 July

काही भारतीय उद्योजकांनी सुरू केलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. इंडिया चॅम्पियन्सने अंतिम सामन्यात पाकिस्तान लिजेंड्सला पराभूत करत विजेतेपद पटकावलेले. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात सहा संघ सहभागी होत आहेत. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व वेस्ट इंडीज या देशांच्या निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा यामध्ये समावेश असेल. स्पर्धेत एकूण 18 सामने खेळले जातील. प्रत्येक संघ एकेकदा समोरासमोर येईल. साखळी करीत पहिल्या चार क्रमांकावर राहणारे संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत.

भारतीय संघात अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. युवराज सिंग भारतीय संघाचे नेतृत्व करेल. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणार आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले मोईन अली, इमाद वसिम व डार्सी शॉर्ट आपापल्या संघासाठी खेळताना दिसतील. वेस्ट इंडिजचे टी20 दिग्गज ड्वेन ब्रावो व कायरन पोलार्ड वेस्ट इंडिज लिजेंड्स संघाचा भाग आहेत.

भारतात ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व फॅनकोड या लाईव्ह स्ट्रीमिंग ऍपवर पाहता येईल. स्पर्धेतील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 आणि सायंकाळी 9 वाजता सुरू होतील.

डब्लूसीएल 2025 साठी इंडिया चॅम्पियन्स संघ: युवराज सिंग (कर्णधार), हरभजन सिंग, इरफान पठाण, युसुफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिखर धवन, पियुष चावला, वरून एरोन, स्टुअर्ट बिन्नी, गुरकीरत मान, सिद्धार्थ कौल, विनयकुमार व अभिमन्यू मिथुन.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Andre Russell ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती! ‘या’ दिवशी अखेरच्या वेळी दिसणार मैदानावर

Exit mobile version