Breaking News

Womens Asia Cup: टीम इंडियाला नमवून श्रीलंका बनली ‘आशिया’ची चॅम्पियन! हरमनसेनेला जेतेपद राखण्यात आले अपयश

WOMENS ASIA CUPWomens Asia Cup 2024: महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान अंतिम सामना खेळला गेला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या श्रीलंका संघाने हरमनप्रीत गौरीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आठ गडी राखून पराभूत केले. यासोबतच त्यांनी प्रथमच आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली.

नववे आशिया चषक विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय महिला संघ या सामन्यात उतरला होता. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर, स्मृती मंधाना हिने फटकावलेल्या 47 चेंडूतील 60 धावांमुळे भारतीय संघाने मजबूत सुरुवात केली. आपला शंभरावा टी20 सामना खेळत असलेल्या जेमिमा रॉड्रिग्ज हिने 16 चेंडूंमध्ये 29 व रिचा घोषच्या 14 चेंडूतील 30 धावांमुळे भारतीय संघाने 165 अशी सन्मानजनक मजल मारली.

विजयासाठी मिळालेल्या 166 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. त्यानंतर मात्र कर्णधार चमारी अटापट्टू व हर्षिता समरविक्रमा यांनी 87 धावांची भागीदारी केली. चमारीने 43 चेंडूत 61 धावांची वेगवान खेळी केली. तर समरविक्रमा हिने अखेरपर्यंत नाबाद राहताना 51 चेंडूंमध्ये 69 धावा केल्या. कविशा दिल्हारी हिने नाबाद 30 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

या विजयासह श्रीलंकेने प्रथमच महिला आशिया चषक जिंकण्यात यश मिळवले. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या चमारी अटापट्टू हिला स्पर्धेची मानकरी घोषित केले गेले.

(Srilanka Womens Won Womens Asia Cup Beat India)

Exit mobile version