Fastest Century In T20I: असे खूप कमी फलंदाज असतात, जे अशक्य वाटणाराही विक्रम मोडीत काढतात आणि इतिहास घडवतात. असाच काही पराक्रम एस्टोनियाचा फलंदाज साहिल चौहान (Sahil Chauhan) या पठ्ठ्याने केला आहे. त्याने एका आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात शानदार प्रदर्शन करत इतिहास घडवला आहे. त्याने अवघ्या 27 चेंडूत शतक ठोकले. हे शतक टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वात वेगवान शकत आहे. त्याने या विक्रमात ख्रिस गेल (Chris Gayle) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनाही मागे सोडले आहे.
साहिल चौहानचा पराक्रम
खरं तर, एस्टोनिया संघ सायप्रसच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 6 टी20 सामने खेळले जाणार आहेत. यातील दुसरा सामना सायप्रस विरुद्ध एस्टोनिया (Cyprus vs Estonia) संघात सोमवारी (दि. 17 जून) इपिस्कोपी (Episkopi) येथील हॅप्पी व्हॅली ग्राऊंड (Happy Valley Ground) येथे पार पडला. या सामन्यात सायप्रस संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सायप्रसने निर्धारित 20 षटकात 7 बाद 191 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना एस्टोनिया संघाने 13 षटकात 4 विकेट्स गमावत 194 धावा केल्या. या विजयात साहिल चौहान (Sahil Chauhan) याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रमही नावावर केला.
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना साहिल चौहान याने अवघ्या 27 चेंडूत शतक ठोकत इतिहास घडवला. त्याने आपल्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करत नाबाद 144 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 6 चौकार आणि 18 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे एस्टोनिया संघाने हा सामना 6 विकेट्स राखून आपल्या नावावर केला.
ख्रिस गेल आणि रिषभ पंतचा विक्रम मोडीत
विशेष म्हणजे, साहिलने या सामन्यात केलेल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याचा विक्रम मोडीत काढला. गेलने 2013 साली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुद्ध अवघ्या 30 चेंडूत शतक ठोकले होते. याव्यतिरिक्त साहिलने भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यालाही मागे सोडले आहे. त्याने 2018 मध्ये दिल्ली संघाकडून खेळताना हिमाचल प्रदेशविरुद्ध 32 चेंडूत शतक ठोकले होते. आता साहिलच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही आघाडीवर
साहिलने त्याच्या खेळीने जगातील दिग्गज खेळाडूंना मागे सोडले. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम नावावर केला आहे. आतापर्यंत हा विक्रम नामीबियाच्या निकोल लोफ्टी इयाटॉनच्या नावावर होता. त्याने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये नेपाळविरुद्ध खेळताना 33 चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर दुसऱ्या स्थानी कुशल मल्ला याचा नंबर लागतो, ज्याने 34 चेंडूत शतक ठोकले होते. तसेच, डेविड मिलर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 35 चेंडूत शतक ठोकले आहे. (cricketer sahil chauhan of estonia created history scored the fastest century in t20 left chris gayle rishabh pant behind)
हे वाचलंत का!
आम्ही चालवू पुढे वारसा! CSK विरूद्ध ऋतुराज बनला विकेटकिपर, MPL 2024 मध्ये दिसला धोनीच्या अवतारात
Pakistan Team: पाकिस्तानचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडण्याचे कारण आले समोर, टीममध्ये पडलेत दोन गट?