
Dream 11 Story And Revenue Model: आयपीएल 2025 (IPL 2025) सुरू झालीये म्हणजे तुम्हालाही 49 रुपयात करोडपती व्हायचे स्वप्न पडले असेलच? मार्केटमध्ये रोज नव्याने येणाऱ्या फँटसी ॲपने मोबाईलची मेमरी भरली असेल? ड्रीम इलेव्हन (Dream 11), एमपीएल, माय 11 सर्कल, विंझो असे डझनभर ऍप अट्टल फॅंटसी लीगच्या प्रो प्लेअरकडे असतात. अशा ऍपवर वेळ आणि पैसा घालवण्याचे एकच कारण असतं ते म्हणजे जास्त पैसा! पण, हे ऍपवाले पैसे कसे कमवतात? आणि त्यांची आजपर्यंत काय प्रगती झाली, हेच आपण जाणून घेऊया.
Dream 11 Story And Revenue Model
भारतात फॅन्टसी ऍप्सचा बागुलबुवा आणला ड्रीम इलेव्हन. अमेरिकेत शिकलेल्या हर्ष जैन आणि भाविश सेठ यांनी याची सुरुवात केली. हे दोघे 2007 मध्ये जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीतुन डिग्री घेऊन, मायदेशी आले तेव्हा त्यांना समजलं की, आपली 90 टक्के जनता क्रिकेटसाठी अक्षरशः वेडी आहे. फॅंटसी गेम्स नावाची गोष्ट जगात खूप आधीपासून सुरू आहे. आपल्याकडच्या भाषेत बोलायचं झालं तर सट्टा. मात्र, भारतात बेटिंग म्हणजे सट्टा बेकायदेशीर आहे. तरीदेखील हर्ष आणि भाविश यांनी रिस्क घ्यायची ठरवलीच.
त्यांनी 2012 ला आपले ऍप लॉंच केले. त्यांना विरोध होणार होता, आणि तो झालाच. सट्टा सट्टा म्हणत अनेकांनी कोर्टात धाव घेतली. पण या दोन्ही बिझनेस माइंडेड बिझनेसमनना बिझनेस करायचाच होता. त्यांनी कायद्यातून बरोबर पळवाट शोधून काढली. त्यांनी कोर्टात सिद्ध करून दाखवलं की, हा सट्टा नसून, ज्याला क्रिकेटची आणि खेळाची माहिती आहे असेच लोक फक्त इथे खेळू शकतात. त्यांनी अजूनही बरेच युक्तिवाद केले आणि अखेर कोर्टाला निर्णय ड्रीम इलेव्हनच्या बाजूने द्यावा लागला. भारतीय कायद्याच्या पब्लिक गॅम्बलिंग ऍक्टमधून ड्रीम इलेव्हन सहीसलामत सुटली आणि इतर ऍप्सनाही मार्ग मोकळा केला.
अगदी सुरुवातीच्या काळापासूनच ड्रीम इलेव्हनने मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. क्रिकेटसोबत कबड्डी आणि फुटबॉल लीगशीदेखील टाय-अप केला. धंदा करायचा म्हटल्यावर त्याला लागते जाहिरात आणि त्यासाठी त्यांनी निवडला थेट एमएस धोनी. भारतीय क्रिकेटमधला सर्वात मोठा ब्रँड त्यांनी आपल्याकडे घेत त्याच्या तोंडी ‘खेलो दिमाग से’ असा अडीच अक्षरांचाच डायलॉग दिला. या छोट्याशा डायलॉगने ड्रीम इलेव्हन आणि भारतीयांची किस्मत बदलून टाकली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
आता तुम्हाला पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकांना करोडोंची बक्षीस देणारं ड्रीम इलेव्हन किंवा इतर ऍप स्वतः पैसे कसे कमावतात. तर उदाहरणासह त्याचं स्पष्टीकरण वाचा.
समजा, ड्रीम इलेव्हनने एका आयपीएल सामन्यासाठी ‘मेगा ग्रँड लीग’ फँटसी कॉन्टेस्ट आयोजित केली आहे.
प्रवेश शुल्क: ₹50 प्रति वापरकर्ता
सहभागी वापरकर्त्यांची संख्या: 10 लाख लोक
एकूण जमा रक्कम: ₹5 कोटी
एकूण बक्षीस रक्कम: ₹4 कोटी
ड्रीम इलेव्हन किंवा ऍपचे प्लॅटफॉर्म कमिशन: 1 कोटी
वरील कॉन्टेस्टमध्ये प्लॅटफॉर्म कमिशन म्हणून 20 टक्के रक्कम ठरलेली होती. प्रत्येक कॉन्टेस्टमध्ये यामध्ये बदल होतो. काहीवेळा ही टक्केवारी 15 टक्के देखील असते. छोट्या कॉन्टेस्टमध्ये प्लॅटफॉर्मला अधिक फायदा होतो. तर, मोठ्या कॉन्टेस्टमध्ये प्रवेश शुल्क मोठे असल्याने तेथील फायदाही त्यांना आवश्यक इतकाच निघतो. याव्यतिरिक्त काही वापरकर्ते जे प्रायव्हेट कॉन्टेस्ट खेळतात, त्याचे कमिशन देखील प्लॅटफॉर्मला मिळत असते. या फॅंटसी ॲपला जाहिरातींच्या माध्यमातून देखील तगडी कमाई होते. एका जाहिरातीचे लाखो करोडो रुपये हे प्लॅटफॉर्म घेतात. उगीच नाही ड्रीम इलेव्हनचा सीईओ मुंबईत हर्ष जैन 138 कोटींच घर घेत.
हे देखील वाचा- IPL Archives: ललित मोदींनी लावलेलं आयपीएल नावाचं रोपट 18 वर्षांचं झालंय
IPL 2025 च्या ‘यंगगन्स’! ज्या यावर्षी नक्कीच धडाडणार, भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणार
भारतातल्या फॅंटसी गेमिंगचा मूळपुरुष असलेल्या ड्रीम इलेव्हनच्या मागील काही वर्षातील उलाढालीचा आपण जरा अभ्यास करूया. 2018-2019 ला कंपनीची उलाढाल होती 224 कोटी. त्यावर्षी जाहिरातींवर जास्त प्रमाणात खर्च केल्याने त्यांना 87 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र, 2019-2020 ला कंपनीची उलाढाल झाली 775 कोटींची आणि कंपनीचा निव्वळ नफा होता 181 कोटी. 2020-2021 या कोविड काळात त्यांनी आयपीएल स्पॉन्सर केली आणि याच काळात त्यांनी नफा कमवला तब्बल 327 कोटी रुपयांचा. पुढच्या वर्षी म्हणजे 2021-2022 मध्ये त्यांनी उलाढाल 3,841 कोटी रुपयांपर्यंत वाढवली. मात्र, जाहिराती व कर्मचारी वाढ याच्यामुळे त्यांचा नफा 142 कोटीपर्यंत राहिला. त्याच्या पुढील आर्थिक वर्षात भारतातील कर कायदे बदलल्यानंतरही ड्रीम इलेव्हनला फारसे नुकसान झाले नाही. त्यांच्या उलाढालीत 66 टक्क्यांनी वाढ होत, नफा 188 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
अनेकांना विश्वास बसणार नाही मात्र सध्या भारतातील ऑनलाइन फॅंटसी गेमिंगचे सध्याचे बाजारमूल्य हे 35,000 कोटी ते 40,000 कोटी दरम्यान असू शकते. निर्मला सितारमण यांनी 28% जीएसटी लावला तरी, ड्रीम इलेव्हनवालेही मागे हटायला तयार नाहीत आणि तुम्ही आम्ही देखील. उलट भारतातील वाढत असलेली क्रिकेटची लोकप्रियता आणि लोकांकडे येत असलेला पैसा याच्यामुळे या सगळ्यात वाढ होत राहणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
धोनीने ‘खेलो दिमाग से’ म्हटल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही अशा फॅंटसी गेमची जाहिरात करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. अगदी एखाद दोन सामन्याने प्रकाशझोतात आलेले नवखे क्रिकेटरही आता अशा एखाद्या फॅंटसी गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अँबेसिडर होतात. कितीही टीका होत असली, न्यायालयात प्रकरणे पोहोचली असली तरी, हेच फॅंटसी ऍप कित्येक जणांना ‘ड्रीम’ दाखवतात. धोनीने सांगू, विराटने सांगू नाहीतर रोहितने सांगू तुम्ही मात्र आपल्या बजेटमध्ये राहूनच याचा नाद धरा!
(Dream 11 Story And Revenue Model)