Breaking News

अफगाणच्या ऐतिहासिक विजयाचा पडद्यामागचा नायक, ब्रावोचा ‘चॅम्पियन’ गाण्यावर भन्नाट डान्स – Video

Dwayne Bravo Celebration After Afghanistan Win :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. हा सामना विजय अफगाणिस्तानसाठी सर्वार्थाने खास होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच या विजयासह संघाने उपांत्य फेरीतील त्यांचे आव्हानही जिवंत ठेवले आहे. 

या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. अफगाणिस्तानचे खेळाडू आणि पडद्यामागील सितारे अर्थातच प्रशिक्षण स्टाफही विजयाचे सेलिब्रेशन करण्यात मागे राहिले नाहीत. सामन्यानंतर मैदानावर, ड्रेसिंग रुममध्ये, अगदी टीम बसमध्येही संघाने आनंद साजरा केला. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी विजयानंतर टीम बसमध्ये जोरदार डान्स केला. यादरम्यान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्होचे (Dwayne Bravo) ‘चॅम्पियन’ गाणे वाजवण्यात आले. ब्राव्होही त्याच्या गाण्यावर डान्स करताना दिसला. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक रंजक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ब्राव्हो संघात आल्यानंतर खेळाडूंमध्ये बरीच सुधारणा दिसून येत आहे. संघ फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे.

दरम्यान या विजयासह अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, पुढील वाटचाल खूपच गुंतागुंतीची होणार आहे. अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. यासोबतच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागणार आहे. ही दोन्ही समीकरणे तयार झाली तरच अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरी गाठता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version