Breaking News

IPL 2024 Final| या पाच नाईट रायडर्सने नेली गंभीरची KKR फायनलमध्ये

IPL 2024 FINAL
Photo Courtesy: X/KKR

IPL 2024 Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दोन वेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स व एक वेळचे विजेते सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) समोरासमोर येणार आहेत. रविवारी (26 मे) चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर त्यांच्या दरम्यान सामना होईल. स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून पुढे आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची यावेळी संधी असेल. त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्या खेळाडूंनी सर्वाधिक प्रभाव टाकला त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सुनील नरीन (Sunil Narine)- केकेआरच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या सुनील नरीन याने या हंगामात स्वतः जबाबदारी घेत अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. मेंटर बनताच गौतम गंभीर याने त्याला पुन्हा एकदा सलामीला संधी देत फटकेबाजीचे लायसन्स दिले. त्याने देखील हा विश्वास सार्थ ठरवताना 13 सामन्यात एक शतक व तीन अर्धशतकांसह 482 धावा कुटल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 179 असा राहिला. याबरोबर त्याने गोलंदाजीतही 7 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा देत 16 बळी आपल्या नावे केले.

फिल सॉल्ट (Phil Salt)- प्ले ऑफ्स व अंतिम सामन्यात केकेआर ला ज्याची सर्वात जास्त आठवण येईल असा खेळाडू ठरला सलामीवीर फिल सॉल्ट. राष्ट्रीय संघाचा भाग होण्यासाठी जाण्यापूर्वी त्याने केकेआरला प्ले ऑफ्समध्ये स्थान मिळवून दिले होते. इंग्लंडच्या या सलामीवीराने 12 सामने खेळताना 180 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 435 धावा काढल्या. जवळपास प्रत्येक सामन्यात त्याने संघाला वेगवान सुरुवात करून दिली.

मिचेल स्टार्क (Mitchell Starc)- तब्बल 24 कोटी 75 लाख इतकी ऐतिहासिक रक्कम घेऊन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून या आयपीएलमध्ये उतरलेल्या मिचेल स्टार्क याने आपल्या किमतीची परतफेड संघाला करून दिली. सुरुवातीच्या काही सामन्यात खराब कामगिरी झाल्यानंतरही मुख्य सामन्यांच्या वेळी त्याने आपला दर्जा दाखवून देत केकेआरसाठी 12 सामन्यात 15 बळी मिळवले. क्वालिफायर एक सामन्यात तो सामनावीर होता.

वरूण चक्रवर्ती‌ (Varun Chakravarty)- सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला मिस्टरी स्पिनर वरूण चक्रवर्ती या हंगामात देखील चांगलाच झळकला. त्याने नरीनसोबत केकेआरच्या गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना 18 बळी नावे केले. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर त्याने फलंदाजांना वेसन घालत संघाच्या विजयात योगदान दिले.

हर्षित राणा (Harshit Rana)- अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा पहिल्या सामन्यापासून चमकताना दिसला. भयानक वेग नसला तरी अचूक टप्पा व टी20 क्रिकेटला साजेशी गोलंदाजी करताना त्याने 12 सामन्यात 17 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने गोलंदाजीत व मैदानावर आक्रमकता दाखवताना सर्वांची मने जिंकली.

(IPL 2024 Final Five Players Who Take Responsibility Of KKR Final Journey)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version