Breaking News

IPL 2026 Retention मध्ये करारमुक्त केलेले टॉप 10 खेळाडू

ipl 2026 retention
Photo Courtesy: X

IPL 2026 Retention Top 10 Released Players: आयपीएल 2026 आधी शनिवारी (15 नोव्हेंबर) रिटेन्शन पार पडले. सर्व आयपीएल संघांनी आगामी हंगामाची रणनिती तयार करताना, महत्वपूर्ण खेळाडू राखण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी असे देखील काही खेळाडू होते, ज्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आतापर्यंत आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या या खेळाडूंना नव्या हंगामात नव्या संघासाठी खेळावे लागण्याची शक्यता आहे. याच रिटेन्शनमध्ये करारमुक्त व्हाव्या लागलेल्या प्रमुख 10 खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया.

IPL 2026 Retention Top 10 Released Players

1) आंद्रे रसेल (Andre Russell)- मागील जवळपास दशकभरापासून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कणा राहिलेल्या आंद्रे रसेल याला यावेळी करारमुक्त केले गेले. रसेल 2014 पासून संघाचा भाग होता. सध्या 37 वर्षाच्या असलेल्या रसेलची अलीकडची कामगिरी फारशी आशादायक नव्हती. तसेच, मागील हंगामात त्याला 12 कोटी इतकी मोठी रक्कम देत केकेआरने रिटेन केले होते. केकेआरसाठी खेळाच्या तीनही विभागात त्याने महत्त्वाचे योगदान दिले होते. केकेआर लिलावात पुन्हा एकदा त्याला आपल्या संघात सामील करून घेण्याचा प्रयत्न करू शकते.

2) मथिशा पथिराना (Matheesha Pathirana)- श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना याला चेन्नई सुपर किंग्सने रिलीज करणे क्रिकेट चाहते व समीक्षक यांच्यासाठी आश्चर्यकारक होते. मात्र, मागील हंगामातील त्याची निरस कामगिरी व सातत्याने होणारी दुखापत त्याच्या विरोधात गेल्याचे बोलले जातेय. तो मागील हंगामात 12 सामने खेळून केवळ 13 बळी मिळवू शकला होता. तसेच, त्याची 13 कोटी ही रक्कम चेन्नईसाठी काही प्रमाणात डोकेदुखी ठरत होती. यापेक्षा कमी किंमतीत तो उपलब्ध झाल्यास पुन्हा एकदा तो सुपरकिंग्सच्या ताफ्यात दिसू शकतो.

3) लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone)- मागील वर्षी प्रथमच आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या आरसीबीने आपला इंग्लिश अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्याला करारमुक्त करण्यामागे सर्वात मोठे कारण त्याची 8.75 कोटी ही किंमत असल्याचे बोलले जातेय. या व्यतिरिक्त संघाकडे टीम डेव्हिड व रोमारियो शेफर्ड असे दोन फिनिशर उपलब्ध आहेत.‌ लिलावात आणखी पर्याय शोधण्यासाठी आरसीबीने आपल्या विदेशी खेळाडूचा कोटा रिकामा केल्याचे दिसून येते.

4) ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)- ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा पुन्हा एकदा लिलावात सहभागी होणार आहे. पंजाब किंग्ससाठी अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पंजाबने त्याला मोकळे करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही वर्ष व त्यानंतर आरसीबीसाठी दोन हंगाम वगळता त्याची कामगिरी फ्लॉप दिसून आली आहे. मॅक्सवेल याला रिलीज करत 4 कोटी रुपये आपल्या पर्समध्ये वाढवले. आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस असलेल्या मॅक्सवेलला पुढील हंगामात नवा संघ मिळणार का तो अनसोल्ड राहणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

5) जोश इंग्लिश (Josh Inglish)- मॅक्सवेलप्रमाणेच पंजाबने ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक जोश इंग्लिश याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश याची मागील हंगामातील कामगिरी शानदार राहिली होती. अंतिम सामन्यात देखील तो आपल्या संघासाठी झुंज देताना दिसलेला. मात्र, पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लिश आयपीएल 2026 मधील जवळपास अर्ध्या सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. संघ व्यवस्थापन व इंग्लिश यांच्यातील परस्परसंमतीने त्याला करारमुक्त केले गेले.

6) डेव्हिड मिलर (David Miller)- जगातील सर्वात अनुभवी टी20 खेळाडूंपैकी एक असलेल्या डेव्हिड मिलर याला लखनऊ सुपरजायंट्सने नारळ दिला. आतापर्यंत पंजाब व गुजरातसाठी फिनिशर म्हणून केलेली कामगिरी त्याला आयपीएल 2025 मध्ये लखनऊसाठी करता आली नाही. तसेच, आगामी लिलावात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमुळे लखनऊ संघ व्यवस्थापनाने मिलरला मुक्त करण्याचा निर्णय घेतला असावा. तसेच, मिलर हा 7.50 कोटी इतकी मोठी किंमत देखील घेत होता.

7) रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)- आयपीएलमध्ये पदार्पण करताना 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्सने प्रमुख फिरकीपटू म्हणून रवी बिश्नोई याला ड्राफ्ट केले होते. मात्र, मागील दोन हंगामापासून तो अपेक्षित कामगिरी करताना दिसत आहे. आयपीएल 2025 साठी त्याला 11 कोटी इतकी मोठी रक्कम देऊन रिटेन केले गेलेले. परंतु, युवा दिग्वेश राठी याने दमदार कामगिरी करत संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून जागा बनवली. याच कारणाने बिश्नोई हा आगामी लिलावात दिसेल. लखनऊ सुपरजायंट्सने त्याची साथ सोडली असली तरी, बिश्नोई याला लिलावात मोठी किंमत मिळण्याची दाट शक्यता आहे.

8) फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis)- दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. प्लेसिस मागील हंगामात संघाचा उपकर्णधार होता. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी खेळाडूंपैकी एक असलेल्या प्लेसिसने 4773 धावा बनवल्या आहेत. मात्र, सध्या त्याचे वय 41 पेक्षा जास्त असून, ही गोष्ट त्याच्या विरोधात गेल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आगामी लिलावात तो अनसोल्ड राहिल्यास देखील आश्चर्य वाटायला नको.

9) व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)- केकेआरचा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर हा करारमुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आयपीएल 2025 लिलावात त्याला 23.75 कोटी इतकी तगडी रक्कम मिळाली होती. मात्र, त्या संपूर्ण हंगामात तो सपशेल अपयशी ठरलेला. त्याला सध्या करारमुक्त केले गेले असले तरी, पुन्हा एकदा तो केकेआरच्या जर्सीमध्ये दिसू शकतो.

10) महिश थिक्षणा (Maheesh Theekshana)- श्रीलंकेचा फिरकीपटू महिश तिक्षणा हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याची मागील हंगामात कामगिरी संमिश्र राहिलेली. संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून तो आयपीएल 2026 मध्ये दिसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, रविंद्र जडेजा याला ट्रेड केले गेल्याने थिक्षणा याला नारळ दिल्याचे म्हटले जात आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: IPL 2026 Retention: आयपीएल 19 साठी रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

Exit mobile version