Breaking News

Pratik Athavale| नाशिककर प्रतीक आठवले T20 World Cup गाजवायला सज्ज, वाचा ओमानच्या KL Rahul ची जर्नी

pratik athavale oman
Photo Courtesy: Instagram/ Pratik Athavale27

PRATIK ATHAVALE: आयपीएलच्या समाप्तीनंतर लगेचच अमेरिका व वेस्ट इंडीजमध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा (2024 T20 World Cup) खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ओमानच्या संघाने पात्रता मिळवली असून, या संघात अनेक भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश दिसून येतो. यामध्ये एक मराठमोळे नाव आहे प्रतीक आठवले (Pratik Athavale) याचे. ओमानच्या संघाचा केएल राहुल अशी ओळख असलेल्या प्रतीक याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयात.

आगामी टी20 विश्वचषकात तब्बल वीस संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये मोजून दोन खेळाडू मराठी मातृभाषा असलेले आहेत. यापैकी एक असलेला प्रतीक ओमान संघासाठी सलामीवीर व यष्टीरक्षक अशी दुहेरी भूमिका बजावतो. तो बऱ्याच अंशी केएल राहुलसारखा दिसत असल्याने तसेच त्याची फलंदाजीची शैली देखील तशीच असल्याने त्याला ओमानचा केएल राहुल म्हणतात.

प्रतीक याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात होण्यामागे त्याच्या वडिलांची प्रेरणा आहे. त्याचे वडील सुरुवातीला युनिव्हर्सिटी क्रिकेट खेळले होते. मात्र, त्यांना पुढे कारकीर्द करता आली नाही. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये क्रिकेटचे गुण दिसल्याने त्यांनी त्याला क्रिकेटर होण्यासाठी पाठबळ दिले. प्रतीक याने 2013 पासून क्रिकेटला गांभीर्याने घेतले.

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये तो नाशिक संघाचे प्रतिनिधित्व करत. तो काही काळ जळगाव येथील रावेर येथे देखील राहून क्रिकेट खेळत होता. पुढे त्याने पुणे युनिव्हर्सिटी संघासाठी देखील क्रिकेट खेळले. मुंबईतील प्रसिद्ध कांगा लीगमध्ये देखील त्याने सहभाग नोंदवला. मात्र, भारतात क्रिकेट खेळण्यासाठी असलेली मोठी स्पर्धा पाहता त्याने दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

एका मित्राच्या मदतीने तो 2020 मध्ये ओमान येथे नोकरी व क्रिकेटच्या निमित्ताने स्थायिक झाला. ओमानच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इतर देशातील खेळाडूंना तीन वर्षाचा कुलिंग पिरेड पाळावा लागतो. त्यामध्ये प्रतीकने मेहनत करत आपली दखल घ्यायला भाग पाडले. अखेर 2023 मध्ये त्याला ओमानसाठी खेळण्याची संधी मिळाली. नेपाळ येथे झालेल्या टी20 विश्वचषक पात्रता फेरीत त्याने जबरदस्त कामगिरी करत आपल्या संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळवून दिले.

टी20 विश्वचषकासाठी गेल्यावर वेस्ट इंडिजचे सर्वकालीन महान फलंदाज सर विवियन रिचर्ड्स यांना भेटण्याचा त्याचा मनोदय आहे. कारण त्याचे वडील रिचर्ड्स यांचे मोठे चाहते आहेत. तसेच आपल्या वडिलांच्या वाढदिवसाची आठवण राहावी म्हणून प्रतीक 27 क्रमांकाची जर्सी वापरतो.

आगामी टी20 विश्वचषकात ओमान संघाचा सुपर एटपर्यंत मजल मारण्याचा मनसुबा आहे. यामध्ये प्रतीक याची कामगिरी कशी राहते यावर अनेकांचे लक्ष असेल.

माहिती स्त्रोत- स्पोर्ट्स कट्टा यूट्यूब 

(Nashik Born Pratik Athavale Will Play For Oman In 2024 T20 World Cup)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

One comment

  1. WONDERFUL Post.thanks for share..more wait .. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version