– महेश वाघमारे
Real Life Kabir Khan Amol Muzumdar: अखेर स्वप्न पूर्ण झालं! तमाम भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या एका वर्ल्डकपची अक्षरशः चातकाप्रमाणे वाट पाहत होते, तो वर्ल्डकप आला. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत हरमनप्रीत कौरच्या महिला संघाने हा वर्ल्डकप थाटात उचलला. साऱ्या संघाचा कौतुक होत होतंच. मात्र, सोशल मीडियावर एका नावाची तुफान चर्चा होती ते नाव म्हणजे याच टीमचे कोच अमोल मुझुमदार!

Real Life Chak De & Kabir Khan Amol Muzumdar
साल होतं 1988. मुंबईत शाळकरी मुलांची हॅरिस शिल्ड नावाची एक क्रिकेट टूर्नामेंट खेळली जाते. त्याच टूर्नामेंटच्या क्वार्टर फायनलची एक मॅच होती शारदाश्रम विद्यामंदिर विरुद्ध सेंट झेवियर्स. साध्या शाळेतील मुलांची ही मॅच क्रिकेटच्या इतिहासात नोंद झाली. याचं कारण होतं शारदाश्रमचे दोन बॅटर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. अवघ्या 15-16 वर्षाची ही कोवळी पोरं इतिहास लिहून गेली. आझाद मैदानावर त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 664 रन्सची पार्टनरशिप केली. एका रात्रीत ते दोघे चर्चेचा विषय बनले. मात्र, ही त्या कहाणीची एकच बाजू होती.
जेव्हा सचिन आणि विनोद दोन दिवस ती रेकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप करत होते तेव्हा In At 5 म्हणून पॅड अप झालेला मुलगा होता अमोल मुझुमदार. अमोल दोन दिवस पॅड अप राहिला मात्र सचिन-विनोदने त्याला मैदानावर यायची संधीच दिली नाही. कदाचित ही त्याच्या संघर्षाची सुरुवात होती. अमोलच्या बॅटिंगमध्ये दम होता आणि तोच दम दाखवत तो मुंबईच्या रणजीत टीमपर्यंत येऊन पोहोचला. भारतीय टेस्ट कॅपच्या बरोबरीची मानली जाणारी मुंबई रणजी कॅप त्याने डोक्यावर चढवली.
रणजी डेब्यू होता 1993-1994 च्या सिझनला हरियाणाविरूद्ध. फरिदाबादच्या त्या ग्राउंडवर आपल्याला ‘बॉम्बे स्कूल ऑफ बॅटिंग’चा सगळ्यात माहिर विद्यार्थी का म्हणतात? याची झलकच त्याने दाखवून दिली. कारण त्याच्या नावापुढे स्कोर होता 260. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू मॅचचा हा वर्ल्ड रेकॉर्ड पुढे 25 वर्ष अबाधित राहिला. ‘नेक्स्ट सचिन’ असं नाव त्याला मिळालं. मुंबई आणि भारतीय क्रिकेटचा भविष्यातील सितारा म्हणून त्याची चर्चा होऊ लागली. त्याच दरम्यान तो भारताच्या अंडर 19 टीमचा उपकर्णधारही बनला. राहुल द्रविड-व्हीव्हीएस लक्ष्मण त्याचे बॅचमेट्स.
अमोल रणजी गाजवत राहिला आणि इंडिया ए किंवा प्रेसिडेंट इलेव्हनसारख्या संघात त्याच सिलेक्शन होऊ लागलं. इथे मात्र त्याचं नशीब आडव आलं. रणजी आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा अमोल इथे कमी पडायचा. त्याच्याबरोबरच्या सौरव गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण यांनी नेमक्या याच सामन्यांत ‘मौके पे चौके’ मारले आणि भारताची कॅप जिंकली. असं असलं तरी वय अमोलच्या हातात होतं. तो प्रयत्न करायचा थांबला नाही आणि धावा बनवत राहिला. डोमेस्टिकचे कित्येक रेकॉर्ड मोडले तरी टेस्ट कॅप काही मिळत नव्हती. व्हायची ती फक्त त्याच्या नावाची चर्चा.
तिशी गाठायला आला तेव्हा 2002 मध्ये क्रिकेट सोडायचा विचार त्याच्या मनात आला देखील. परंतु, त्याने मन बदललं आणि मुंबई क्रिकेटची सेवा करत राहिला. 2007 मध्ये मुंबईचा कॅप्टन बनत मुंबईला रणजी चॅम्पियनही बनवलं. भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्न साकार होणारं नव्हतं हे कदाचित त्यालाही समजलेलं. बापू नाडकर्णी व बिशनसिंग बेदी यांच्या काळात पद्माकर शिवलकरांसोबत घडलं तेच, द्रविड-लक्ष्मण-गांगुली यांच्यामुळे अमोलबाबतीतही घडलं. शापित शिलेदार नावाचं नकोस लेबल त्याच्या नावा पुढेही चिकटलं.
Amol Muzumdar Journey From Azam Maidan To World Cup Winning Coach
करिअरच्या संध्याकाळी मुंबई क्रिकेटला रामराम करत तो आसाम आणि आंध्रसाठी खेळला. प्रोफेशनल क्रिकेटमधून बूट टांगले तेव्हा त्याच्या नावापुढे फर्स्ट क्लास रन्स होते 11,167. दुसऱ्या एखाद्या देशात असतात तर कदाचित तो त्या देशासाठी 100 कसोटी नक्कीच खेळला असता. मगर यह हो ना सका..!
रिटायर होताच त्याने काही महिन्यातच कोच म्हणून सेकंड इनिंग सुरू केली. इंडिया अंडर 23, नेदरलँड क्रिकेट, दक्षिण आफ्रिका क्रिकेट, मुंबई रणजी आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स यांच्यासाठी बॅटिंग मेंटर म्हणून काम पाहिले. ऑक्टोबर 2023 मध्ये रमेश पोवारच्या वादग्रस्त कार्यकाळानंतर अमोलने भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचे शिवधनुष्य उचलले आणि बरोबर दोन वर्षात ते लिलया पेलले देखील. आता तो भारताचा वर्ल्डकप विनिंग कोच बनलाय.
अमोल मुझुमदारची तुलना टीम इंडियाच्या विश्वविजयानंतर शाहरुख खानच्या कल्ट ‘चक दे’मधील कबीर खान या पात्राशी होतेय. दुग्धशर्करा योग म्हणजे 2 नोव्हेंबर हा शाहरूखचा ही वाढदिवसच. मात्र, अमोलची लढाई त्या फिल्मी कॅरेक्टरपेक्षा जरा जास्त होती. अमोल म्हणतो तसं “Trust In God But Lock Your Car” अखेर देवाला देखील अमोलचा Due द्यावा लागलाच..
आझाद मैदान ते डी.वाय पाटील स्टेडियम हे अंतर फार-फार तर एक तासाचे असेल. मात्र, या एका तासाच्या मार्गावरून संधी ते यश असा प्रवास करायला अमोलला जवळपास 37 वर्ष लागली. Cherry On The Top हेच होतं की, हे सर्व त्याच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या मुंबईत घडलं…!
THANK YOU AMOL MUZUMDAR FOR THIS! 🇮🇳
– India's Domestic legend finally receives much deserving appreciation for being the World Cup Winning Coach! 🏆💙 pic.twitter.com/MnvASY0HSU
— The Khel India (@TheKhelIndia) November 2, 2025
खूप खूप अभिनंदन अमोल सर
(ICC Womens Cricket World Cup 2025 Winning Coach Amol Muzumdar)
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: पोरींनी जग जिंकले! भारत बनला ICC Womens Cricket World Cup 2025 चा विश्वविजेता
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।