Breaking News

पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड

PARIS OLYMPICS
Photo Courtesy: X/Amitabh Bacchan

Vinesh Phogat In Paris Olympics 2024: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पॅरिस ऑलिंपिक 2024 (Paris Olympic)आधी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील सातवी दावेदार आहे,‌ अनुभवी महिला कुस्तीपटू दिनेश फोगट (Vinesh Phogat).

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Vinesh Phogat)

ऑलिंपिक इतिहासात भारताला ज्या खेळाने सर्वाधिक वैयक्तिक पदके मिळवून दिली आहेत तो खेळ म्हणजे कुस्ती. भारताच्या मातीतीलच या खेळाने मागील चारही ऑलिंपिक्समध्ये दरवेळी भारताचा तिरंगा पोडियमवर नेण्याचे काम केले. यंदा देखील भारताचे सहा कुस्तीपटू पॅरिसला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे यात पाच महिला कुस्तीपटू आहेत. त्यातही सर्वांची नजर असणार आहे सर्वाधिक अनुभवी आणि मागील दोन ऑलिंपिक्समध्ये मेडलपासून वंचित राहिलेल्या विनेश फोगटवर. ‘देश की बेटी’ असं बिरूद लावणारी विनेश यंदा अखेर बहुप्रतिक्षित मेडल आणणार असा विश्वास अनेकांना वाटतो आहे.

महावीर सिंग फोगट यांच्या तीनही मुलींवर आधारित दंगल चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. मात्र, त्याच घराण्यातून येणारी विनेश आज एकमेव महिला कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसते. रक्तातच कुस्ती असलेल्या विनेशला कुस्तीच्या आखाड्याकडे यायला फारसा वेळ लागला नाही.अगदी लहानपणापासून तिने हे बाळकडू घ्यायला सुरुवात केली. ज्युनियर लेवलपासून राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास तिने 2012 मध्ये पूर्ण केला.

आपल्या इतर बहिणींप्रमाणे ती देखील नाव कमावू लागली. 2013 ला ज्युनियर गटातून सीनियर गटात आल्यावर पहिल्याच वर्षी तिच्या नावे एशियन चॅम्पियनशिपमध्ये मेडल होतं. पुढे 2014 ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये थेट गोल्ड तिने मिळवलं. त्यावर्षी एशियन गेम्समध्ये देखील ब्रॉंझ तिच्या नावे होत. संपूर्ण जगभरात 48 किलोग्राम फ्री स्टाईल कुस्तीत तिचा दबदबा सुरू होता.

रिओ ऑलिंपिक्स 2016 ला भारताची सर्वात कन्फर्म मेडलिस्ट म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते‌. अनेक अनुभवी ऍथलिट भारतीय पथकात असताना तिच्याकडे सर्वांची नजर होती. तिने देखील निराश न करता क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ती एक लढत जिंकल्यावर ती मेडलपासून फक्त एक पाऊल दूर राहणार होते. मात्र, नियतीला कदाचित हे मंजूर नसावे. चालू लढतीत तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. तिला सामना सोडावा लागला. सर्वांसाठी तो एक निराशाजनक दिवस होता.

हे देखील वाचा- पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Satwik-Chirag कडून मेडलची गॅरंटी? बॅडमिंटन विश्वात त्यांचीच चर्चा

त्या गंभीर दुखापतीतून जवळपास वर्षभरानंतर ती सावरली. 2017 एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर जिंकण्यात तिला यश आलं. 2018 कॉमनवेल्थमध्ये सलग दुसरे गोल्ड जिंकण्याचा कारनामा तीने केला. मात्र, 2019 मध्ये तिला करिअरमधील सर्वात मोठे यश मिळालं. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉंझ जिंकून तिने आपण अजूनही लढणार असल्याचे दाखवून दिले. 2021 मध्ये एशियन चॅम्पियन बनून तिने एक मैलाचा दगड पार केला. मात्र, खरा कस लागणार होता तो टोकियो ऑलिंपिक्समध्ये.

दुसऱ्यांदा ऑलिंपिक खेळण्यासाठी उतरणाऱ्या विनेशकडून यावेळी देखील अपेक्षा होत्या. मात्र, ती दुसऱ्याच राऊंडमध्ये पराभूत झाली. तिच्या त्या पराभवापेक्षा तिला सस्पेंड केल्याने तिची अधिक चर्चा सुरू होती. ऑलिंपिक वेळी तिने भारतीय खेळाडूंसोबत सराव केला नाही. तसेच, तिने संघाचा अधिकृत पोशाख ही परिधान केला नव्हता. याच कारणाने भारतीय कुस्ती महासंघाने तिला निलंबित केले. तिने माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. पुढे 2022 बेलग्राड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा ब्रॉंझ आणि कॉमनवेल्थ गोल्ड ची हॅट्रिक साधत तिने, आपल्यात अजून खूप कुस्ती बाकी असल्याचे दाखवून दिले.

मॅटवर सारं काही ठीक सुरू आहे असे वाटत असतानाच, 2023 च्या जानेवारी महिन्यात भारतीय क्रीडा क्षेत्रात एक भूकंप झाला. विनेशसह ऑलिंपिक मेडलिस्ट बजरंग पुणिया व साक्षी मलिक यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली (Vinesh Phogat In Protest). सिंग हे मनमानी करतात तसेच महिला कुस्तीपटूंचे शोषण केले जाते, असे गंभीर आरोप त्यांनी केले. त्यावेळी सरकारने कारवाईची हमी दिल्यामुळे त्यांनी ते आंदोलन थांबवले. मात्र, याप्रकरणी काहीच कार्यवाही न झाल्याने एप्रिल 2023 मध्ये पुन्हा हे सर्व कुस्तीपटू धरणे द्यायला बसले.

या आंदोलनामुळे संपूर्ण देशात विनेश फोगट चर्चेचा विषय बनली होती. साक्षी मलिक व विनेश यांना पोलीस फरफटत नेतानाच्या व्हिडिओ आणि छायाचित्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीला नेले. अखेर ब्रिजभूषण यांना हटवल्यानंतर या खेळाडूंनी हे आंदोलन संपवले. मैदानाबाहेरील या सर्व गोष्टींमुळे विनेशचे बऱ्यापैकी नुकसान झाले होते. मात्र, तरीदेखील तिने पॅरिस ऑलिंपिवरून आपले लक्ष हटवले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

एप्रिल महिन्यात तिने भारताला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला. यासोबतच ट्रायल्समध्ये देखील विजय संपादन करत तिने, आपले तिसरे ऑलिंपिक तिकीट पक्के केले. अगदी काही दिवसांपूर्वीच स्पॅनिश ग्रांप्रीमध्ये गोल्ड मेडल जिंकून आपण ऑलिंपिक्ससाठी तयार असल्याचे दाखवून दिले.

विनेश सध्या भारताची सर्वात मोठी महिला कुस्तीपटू मानली जाते. कदाचित ती अखेरच्या वेळी ऑलिंपिक्समध्ये खेळताना दिसू शकते. यंदा तिच्याकडे मेडल मिळवण्याची अनेक कारणे आहेत. मैदानावर व मैदानाबाहेर अनेक प्रश्नांची उत्तरे ती केवळ मेडल जिंकून देऊ शकते. तमाम भारतीयांना आशा आहे की, ती थेट गोल्ड जिंकून या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल!

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Vinesh Phogat)

अधिकचे वाचा-

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची

 Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| हॉकीला पुन्हा येणार ‘सोन्या’चे दिवस, वाचा भारतीय हॉकीचा गौरवशाली इतिहास

Exit mobile version