Breaking News

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!

mirabai chanu
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्सपूर्वी क्रीडा कॅफेने सुरु केलेल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील मेडलची चौथी दावेदार आहे टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारताच्या मेडल टॅलीचा शुभारंभ करणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu). मागील ऑलिंपिक्समध्ये चुकलेली गोल्ड मेडलची संधी यावेळी मीराबाई साधण्यासाठी कंबर कसून तयार आहे.

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Mirabai Chanu)

टोकियो ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी संपूर्ण देशात आनंदाची बातमी पसरली होती. यापूर्वी फारशी कोणाला माहित नसलेल्या मीराबाई चानू हिने देशाला ही जल्लोषाची संधी दिली होती.‌ तिची ही कहाणी.

मीराबाईचा जन्म मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळपासून 25 किलोमीटरवर असलेल्या नोंगपोक काकचिंग या गावातील. मणिपूरमध्ये लढाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैतई या समूहातून ती येते. गावातील राहणीमान असल्याने आणि अंगात नैसर्गिक शक्ती असल्याने, घरची कामे करताना तिची ताकद दिसून यायची. अगदी लहान वयात लाकूडफाटा आणण्यासाठी डोंगरात गेल्यावर ती आपल्या शरीरापेक्षा अधिक वजनाच्या मोळ्या सहज उचलून आणायची. कदाचित तिलाही माहीत नसेल की, भविष्यात अशाच प्रकारे वजन उचलून ती जगभरात मानसन्मान कमावेल.

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार: कहाणी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची! 140 कोटी भारतीयांना अपेक्षा दुसऱ्या सुवर्ण फेकीची

सुरुवातीच्या काळात मीराबाईला तिरंदाजीचे भयंकर आकर्षण होते. वयाच्या 13-14 व्या वर्षापर्यंत तिला आपण चांगले तिरंदाज होऊ असे वाटायचे. खेळात करिअर करायचं झाल्यास तिरंदाज व्हायचं असा तिने मनाशी निश्चय केलेला. मात्र, आठवीत आल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिच्या पाठ्यपुस्तकात भारताची वेटलिफ्टर कुंजुराणी हिच्या आयुष्याचा धडा होता.‌ तिच्याविषयी वाचून तिला वेटलिफ्टर होता येईल असं वाटू लागलं. वजन तर उचलायचेय? किती सोपे आहे असं तिला पहिल्यांदा वाटलं.

इम्फाळला असलेल्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तिने प्रवेश घेत वेटलिफ्टिंगचे ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. तिच्या या ट्रेनिंगची कहाणी देखील रंजक आहे. नोंगपोक काकचिंग ते इम्फाळ हे अंतर पार करण्यासाठी तिला रोज ट्रक ड्रायव्हर्स मदत करत. त्या रस्त्यावर होणाऱ्या वाळू वाहतुकीचे ट्रक तिला इम्फाळपर्यंत पोहचवत. अशा प्रकारे तिचा रोजचा प्रवास सुरू झाला.

ती सलग चार वर्ष कठोर मेहनत घेत राहिली आणि अखेर तिला मोठे यश मिळाले. 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये सिल्वर जिंकून तिने पहिले मोठे आंतरराष्ट्रीय यश मिळवले. दोन वर्षांनी तिच्यापुढे तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी होती. व्यासपीठ होतं रिओ ऑलिंपिकचे. मात्र, तिथे तिला अपयश आले. क्लीन अँड जर्क प्रकारात ती तीनही प्रयत्नात वजन उचलू शकली नाही. त्यादिवशी ती खूप रडली आणि पुढच्या ऑलिंपिकमध्ये मेडल मिळवायचेच असा निश्चय तिने मनाशी केला.

Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?

रिओमधील अपयश तिने इतकं प्रेरणा म्हणून घेतलं की पुढील वर्षी ती थेट वर्ल्ड चॅम्पियन बनली. 2017 लाच कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये तिने ग्लासगोतील मेडल चा रंग बदलून थेट सोनेरी केला. कोणत्याही परिस्थितीत टोकियोमध्ये मेडल आणायचं हे तुझ्या मनाशी घट्ट झालेला. आणि त्याच दिशेने तिचा प्रवास सुरू होता.

कोविड आल्याने 2020 हे वर्ष पूर्णतः स्पर्धांविना गेले. ऑलिंपिक लांबले तरी मीराबाईची मेडल मिळवण्याची इच्छा अजिबात कमी झाली नव्हती. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी तिचा इव्हेंट होता. तिने 202 किलो वजन उचलत भारताच्या खात्यात पहिलं मेडल टाकलं. चार वर्षांपासून केलेली मेहनत फळाला आली होती. मेडल मिळाल्यावर तिला एक वेगळी ओळख मिळाली. कोट्यावधींची बक्षिसे घोषित झाली. मात्र, तिने केलेल्या एका कृत्याने सर्वांचे मन जिंकले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

लहानपणी आपल्या गावावरून कोचिंग सेंटरपर्यंत पोचवणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा तिने सन्मान केला. तब्बल दीडशे ट्रक ड्रायव्हर्सला मणिपुरी शाल व खास टी-शर्ट देऊन सन्मानित केले आणि सोबतच त्यांचे पायही धरले. तिच्या मेहनतीनंतर 2022 बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्येही गोल्ड आणण्यात तिला यश आलं. मागच्या वर्षी जास्त स्पर्धां न झाल्याने तिला फारशी संधी मिळाली नाही. मात्र, तरीदेखील तिने सरावात सातत्य ठेवत ऑलिंपिकचे तिकीट पक्के केले आहे.

पॅरिस ऑलिंपिक्ससाठी भारताकडून ती एकटीच पात्र ठरली आहे. त्यामुळे तिच्याच खांद्यावर आता मेडलचा भार असेल. ती देखील 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा हा भार यशस्वीपणे तोलेल यात कोणालाही शंका वाटत नाही.

(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Weightlifter Mirabai Chanu)

Paris Olympics 2024:‌ ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| गोष्ट फुलराणी पीव्ही सिंधूची! देशाला आशा मेडल हॅट्रिकची

Exit mobile version