Breaking News

Pro Kabaddi 2024 चा शुक्रवारी शंखनाद! वाचा नव्या हंगामाविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर

PRO KABADDI 2024
Photo Courtesy: X

Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या जगातील सर्वात मोठ्या फ्रॅंचाईजी स्पर्धेचा नवा हंगाम शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू होत आहे. बारा संघ या अकराव्या हंगामाचे विजेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांशी लढतील. पीकेएल 2024 (PKL 2024) च्या या हंगामाविषयी आपण सर्वकाही जाणून घेऊया.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या लिलावामूळे संघांमध्ये अनेक बदल झाल्याचे दिसते. मागील अनेक हंगाम पटना पायरेट्ससाठी खेळणारा सचिन या लिलावात 2 कोटी 15 लाख इतकी रक्कम घेऊन सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तर, स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू असलेला परदीप नरवाल याला केवळ 70 लाखांची बोली लागली होती. तो या हंगामात बेंगलुरू बुल्स संघासोबत खेळताना दिसेल.

यावेळी स्पर्धेच्या प्रारूपात मोठा बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वी सहभाग घेत असलेल्या बारा संघांना आपापल्या शहरात खेळण्याची संधी मिळत होती. मात्र, यावेळी साखळी फेरी केवळ तीनच शहरात पार पडणार आहे. स्पर्धेचा पहिला लेग 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद येथे होईल. त्यानंतर दुसरा लेग 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत नोएडा येथे खेळला जाईल. तर, तिसरा लेग 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर या काळात पुणे येथे होणार आहे. तर, प्ले ऑफचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

स्पर्धेच्या नियमानुसार, साखळी फेरीअंती अव्वल दोन स्थानांवर राहणारे संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तर, उर्वरित चार संघांमध्ये एलिमिनेटर सामने होतील. त्यातील विजेते संघ उपांत्य फेरी प्रवेश करेल. त्यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

आतापर्यंत पटना पायरेट्स स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून, त्यांनी तब्बल तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर जयपुर पिंक पँथर्स यांनी दोनदा ही ट्रॉफी उंचावली. याव्यतिरिक्त यु मुंबा, बेंगलुरू बुल्स, बंगाल वॉरियर्स, दबंग दिल्ली व पुणेरी पलटण यांना प्रत्येकी एक वेळा विजेतेपद जिंकण्यात यश आले आहे. तेलगू टायटन्स, तमिल थलायवाज, गुजरात जायंट्स, हरियाणा स्टीलर्स व यूपी योद्धाज हे अद्याप विजेतेपद जिंकू शकले नाहीत.

या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार यांच्यावरून दररोज सायंकाळी आठ वाजता केले जाईल. हंगामातील पहिला सामना बेंगलुरू बुल्स विरुद्ध तेलगू टायटन्स असा होणार आहे.

(Pro Kabaddi 2024 Preview)

हे देखील वाचा Pro Kabaddi च्या इतिहासातील टॉप 10 रेडर्स! दिग्गजांसह यंगिस्तानही यादीत, पाहा संपूर्ण लिस्ट

Exit mobile version