Breaking News

Cricket In USA: अमेरिकेत टी20 वर्ल्डकप नियोजनाचा उडाला फज्जा! वाचा काय घडलं

CRICKET IN USA
Photo Courtesy: X

Cricket In USA: नुकताच नववा आयसीसी‌ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) वेस्ट इंडिज व अमेरिका येथे पार पडला. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेतील अनेक महत्त्वपूर्ण साखळी सामने हे अमेरिकेत खेळले गेले होते. मात्र, अमेरिकेत या विश्वचषकाचे आयोजन करून आयसीसीला नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आयसीसीने या स्पर्धेचे सहयजमानपद अमेरिकेला देखील देऊ केले होते. विश्वचषकातील तब्बल 16 सामने अमेरिकेतील दोन मैदानांवर आयोजित केले गेलेले. विशेष म्हणजे भारतीय संघाने आपले सर्व साखळी सामने न्यूयॉर्क येथे खेळले. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याचा देखील समावेश होता. न्यूयॉर्क येथील जवळपास सर्व सामने रंगतदार झाले. मात्र, फ्लोरिडा येथील अनेक सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. असे असले तरी अमेरिकेच्या क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता.

अमेरिकेत क्रिकेटची म्हणावी तितकी क्रेझ नसल्याने आयसीसीला मात्र नुकसानाचा सामना करावा लागला. अमेरिकेतील विश्वचषक आयोजनामुळे आयसीसीला ‌तब्बल 20 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये जवळपास 167 कोटी होते. त्यामुळे भविष्यात अमेरिकेत क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत आता आयसीसीला विचार करावा लागू शकतो.

ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट

कोलंबो येथे 18 जुलैपासून होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील भारतीय उपखंडातील लोकांमुळे या स्पर्धेला ‌थोडाफार प्रतिसाद मिळाला होता. मात्र, स्थानिक अमेरिकन लोकांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. याच मुद्द्याला धरून आता अमेरिकेतील क्रिकेटच्या भवितव्याबद्दल आयसीसी काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे असेल.

(Cricket In USA ICC Lost 20 Millions In T20 World Cup In USA)

Exit mobile version