Breaking News

अशी होती अचानक चर्चेत आलेल्या Kochi Tuskers Kerala ची टीम? एकापेक्षा एक दिग्गज आणि 2011 चा एकच आयपीएल हंगाम

KOCHI TUSKERS KERALA
Photo Courtesy: X

Kochi Tuskers Kerala Squad In IPL 2011: अचानकपणे आयपीएलमध्ये एकच वर्ष खेळून बाहेर झालेला कोची टस्कर्स केरला (Kochi Tuskers Kerala) संघ चर्चेत आला आहे. बीसीसीआयविरुद्धची न्यायालयीन लढाई त्यांनी जिंकली असून, बीसीसीआयला त्यांना 538 कोटी इतकी रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागणार आहे.

Kochi Tuskers Kerala Squad In IPL 2011

बँक गॅरंटी जमा न केल्याने 2012 मध्ये बीसीसीआयने कोची टस्कर्स केरला संघाला निष्कासित केले होते. हे करणे चुकीचे आणि नियमबाह्य आहे, असा दावा संघाच्या संघमालकांनी कोर्टात केला होता. त्यावर अखेर मुंबई हायकोर्टाने कोची टस्कर्सच्या बाजूने निकाल दिला. मात्र, या सर्वात पुन्हा एकदा कोची टस्कर्स केरला संघाची चर्चा होतेय. केवळ एकच वर्ष (IPL 2011) आयपीएल खेळलेल्या या संघात कोण खेळाडू होते हे आपण जाणून घेऊया.

पुणे वॉरियर्स इंडिया व कोची टस्कर्स केरला हे दोन संघ 2011 मध्ये नव्याने आयपीएलमध्ये दाखल झालेले. कोची टस्कर्स केरलाची मालकी रॅंदेवूज स्पोर्ट्स यांच्याकडे होती. अनेक व्यावसायिक व कंपन्यांनी मिळून ही कंपनी स्थापन केलेली. केरळमधील कोची येथे संघाचे होम ग्राउंड होते. तर, दोन सामने त्यांनी इंदोर येथे खेळले. सुरुवातीला इंडी कमांडो असे नामकरण संघाचे करण्यात आले होते. मात्र, त्या नावाला विरोध झाल्याने अखेर कोची टस्कर्स केरला असे नाव जाहीर केले गेले.

कोची संघाने खेळलेल्या एकमेव हंगामात संघाचे नेतृत्व श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने केले. या संघात फलंदाजी विभागात भारताचा महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम व‌ टी20 स्पेशालिस्ट ब्रॅड हॉज हे अनुभवी फलंदाज होते. याव्यतिरिक्त त्यावेळी युवा असलेला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, मायकेल क्लिंगर, इंग्लंडचा ओवेस शहा, सुशांत मराठे, दीपक चौगुले, तन्मय श्रीवास्तव व यशपाल सिंग हे फलंदाज संघात सामील झालेले. यष्टीरक्षक म्हणून भारताचा पार्थिव पटेल आणि चंदन मदन हे काम पाहायचे.

अष्टपैलू म्हणून त्यावेळी रविंद्र जडेजा, केदार जाधव, श्रीलंकेचा थिसारा परेरा व ऑस्ट्रेलियाचा जॉन हॅस्टिंग हे संघाला मजबूत बनवत होते. प्रशांत पद्मनाभन, रायफी गोमेझ व ज्ञानेश्वर राव हे अनकॅप्ड भारतीय अष्टपैलू संघात समाविष्ट केले गेलेले. फिरकीपटू म्हणून श्रीलंकेचा सर्वकालीन महान मुथय्या मुरलीधरन, भारताचा रमेश पोवार व‌ ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह ओकिफ यांची निवड केली गेलेली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा लोकल बॉय श्रीसंत व त्यावेळी भारतीय संघाचा भाग राहिलेले आर.पी सिंग व विनयकुमार हे वाहत होते. त्यांना बालचंद्र अखिल व प्रशांत परमेश्वरन हे युवा भारतीय साथ देत. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू जेफ लॉसन हे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

कोची टस्कर्स केरला संघाला आपल्या एकमेव हंगामात फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यांनी खेळलेल्या 14 पैकी सहा सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला. तर, 8 सामन्यात ते पराभूत झालेले.‌ त्यामुळे त्यांना दहा संघांच्या स्पर्धेत आठव्या स्थानी समाधान मानावे लागलेले.

Kochi Tuskers Kerala Squad In IPL 2011

हे देखील वाचा: अखेर Kochi Tuskers Kerala कोर्टात जिंकली! BCCI ला इतक्या कोटींचा दणका

 

Exit mobile version