Breaking News

Real Madrid Sign Kylian Mbappe: अखेर एम्बाप्पे रियाल माद्रिदच्या गोटात! एका मॅचसाठी मिळणार तब्बल इतके कोटी

Real Madrid Sign Kylian Mbappe
Photo Courtesy: X

Real Madrid Sign Kylian Mbappe: फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याने अखेर स्पेनमधील जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब रियाल माद्रिद (Real Madrid) सोबत करार निश्चित केला आहे. रियाल माद्रिदचे होम ग्राउंड असलेल्या सॅंटियागो बेर्नाबू स्टेडियमवर 80 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने त्याने पहिल्यांदा रियालची जर्सी परिधान केली.

सध्या जगातील सर्वोत्तम स्ट्रायकरपैकी एक असलेल्या एम्बाप्पे याने जून महिन्यातच संघासोबत करार केला होता. त्यानंतर आता युरो 2024 संपल्यावर अखेर तो संघात सामील झाला. विनामूल्य प्रवेश असलेल्या सॅंटियागो बेर्नाबू स्टेडियमवर त्याला प्रथम संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी तब्बल 80 हजार चाहते आले होते. त्याने आपण रियाल माद्रिद संघाशी जोडले गेल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हटले.

एम्बाप्पे यापूर्वी फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मन संघासोबत करारबद्ध होता. आता रियाल माद्रिदसोबत करारबद्ध झाल्यानंतर त्याला तगडी रक्कम मिळणार आहे. हा करार पाच वर्षांसाठी असेल. त्याला दरवर्षी पंधरा मिलियन युरो म्हणजे भारतीय रुपयात तब्बल 132 कोटी इतकी रक्कम मिळेल. म्हणजेच तो पाच वर्षात 660 कोटी रुपये कमावेल.

वर्षातील खेळल्या जाणाऱ्या 55 सामन्यांचा विचार केल्यास त्याला एका सामन्यासाठी 2.4 कोटी रुपये मिळणार आहेत.‌ यामध्ये ला लीगा, चॅम्पियन्स लीग, युरो सुपर कप व कोपा डेल रे यांचा समावेश असेल. असे गृहीत धरले की, एम्बाप्पे या सामन्यातील प्रत्येकी 90 मिनिटे खेळेल, तर तो प्रत्येक मिनिटाला 2.67 लाख रुपये कमावेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

सध्या रियाल माद्रिद संघात अनेक शानदार खेळाडूंचा समावेश आहे. कार्लो ऍन्सेलोटी मॅनेजर असलेल्या या संघात इंग्लंडचा जुड बेलिंघम, ब्राझीलचा विनिशियस जुनियर व जर्मनीचा ऍंटिनिओ रुडीगर हे दिग्गज आहेत. ला लीगा 2024-2025 मध्ये विजेतेपद राखण्याचे आव्हान आता या संघासमोर असेल.

(Real Madrid Sign Kylian Mbappe Infront 80000 Fans)

 

Exit mobile version