Breaking News

अवघ्या 17 व्या वर्षी रणजी शतक ठोकणारा मुंबईकर Ayush Mhatre? रोहितचा फॅन अन् कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याने बनला

AYUSH MHATRE
Photo Courtesy: Instagram/Ayush Mhatre

Ayush Mhatre Story: भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2024-2025) स्पर्धेच्या चालू हंगामातील दुसऱ्या फेरीचे सामने शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू झाले. एलिट गटातील मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (MUM v MAH) हा सामना बीकेसी मैदान, मुंबई येथे खेळला जातोय. सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईने महाराष्ट्राला बॅकफूटवर ढकलले. मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे (Cricketer Ayush Mhatre) याने आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक (Ayush Mhatre Ranji Century) ठोकले. केवळ 17 वर्षाचा असलेला आयुष त्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे.

मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या सामन्यात महाराष्ट्राचा 126 धावांत समाप्त झाला. त्यानंतर मुंबईला मोठी धावसंख्या उभी करत सामन्यावर पकड बनवण्याची संधी होती. त्यांच्यासाठी ही जबाबदारी युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याने घेतली. आपला केवळ तिसरा प्रथमश्रेणी सामना खेळत असलेल्या सतरा वर्षाच्या आयुष याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत 127 धावांची खेळी केली केली होती. यामध्ये 17 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

आयुष मूळचा विरारकर. वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेटची बॅट हातात पकडलेल्या आयुषने 10 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटला आपलेसे केले. यासाठी पुढाकार घेतला त्याच्या आजोबांनी. माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेत ऍडमिशन घेतल्यावर त्याने क्रिकेटला गांभीर्याने घेतले. ज्या वयात मुलं पहाटेची गोड स्वप्न पाहत असतात त्यावेळी आयुष साडेचार वाजता उठून, 46 किलोमीटर सरावाला यायचा.

त्याचे आजोबा लक्ष्मीकांत नाईक हे त्याला सकाळी सरावासाठी माटुंग्याला घेऊन येत. सरावानंतर शाळा आणि त्यानंतर पुन्हा चर्चगेटला सराव, त्यानंतर प्रवास करून घरी असे त्यांचे वेळापत्रक असत. आजोबा उतार वयातही आपल्या नातवासाठी इतकी मेहनत घेत. मात्र, दोन वर्षानंतर त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने ते येऊ शकत नव्हते. अशावेळी त्याचे काका विजय त्याच्यासाठी पुढे आले. आपल्या पुतण्यामध्ये असलेले टॅलेंट पाहून त्यांनी नामांकित एमआयजी क्लबच्या ट्रायल्समध्ये त्याला पाठवले. आयुष बाराव्या वर्षी अंडर 14 संघात निवडला गेला. विजय हे अकॅडमीपासून जवळच राहत असल्याने, आयुष्यात तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, त्याचवेळी कोविड आल्याने कोणत्याच स्पर्धा झाल्या नाहीत.

हे देखील वाचा: Tanush Kotian: मुंबईने तयार केला अश्विनचा उत्तराधिकारी! छोट्याशा करिअरमध्ये दाखवला स्पार्क, आकडेवारी एकदमच दर्जा

कोविडनंतर मुंबईतील प्रतिष्ठित कल्पेश कोळी टूर्नामेंटमध्ये त्याची निवड झाली. पुढे मुंबईच्या अंडर 19 संघात त्याची निवड झाली. त्याची वाटचाल यशस्वीपणे सुरू होती. तो शतकांवर शतके ठोकत होता. मात्र, त्याचवेळी एक दुर्दैवी घटना घडली. त्याच्या वडिलांची नोकरी गेली. मात्र, त्यानंतरही त्यांनी आपल्या मुलाला काहीही कमी पडू दिले नाही व त्याचा सराव सुरूच ठेवला.

कांगा लीगमध्ये एकापेक्षा एक गोलंदाजांना फोडून काढत त्याने खोऱ्याने धावा बनवल्या. मुंबईच्या अंडर 19 संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केली. अगदी महिनाभरापूर्वी झालेल्या केएससीए निमंत्रित स्पर्धेसाठी त्याची पहिल्यांदा मुंबई संघात निवड झाली. तिथे गुजरातविरूद्ध 52 व 172 धावांच्या खेळी करत त्याने आगामी रणजी हंगामासाठी आपली दावेदारी ठोकली.

रणजी ट्रॉफी आधीच इराणी ट्रॉफीमध्ये त्याला मुंबईची कॅप घालण्याची संधी मिळाली. त्या सामन्यात आणि रणजीच्या पहिल्या सामन्यात मिळवून एकच अर्धशतक ठोकल्यानंतरही, मुंबईने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. स्वतः आयुष म्हणतो की, माझ्या घरच्यांच्या मेहनतीचे चीज मला करायचे आहे.

आयुष भारतीय कर्णधार रोहित शर्माचा मोठा फॅन आहे. तर, पृथ्वी शॉ याच्याशी त्याचे खास जमते. दोघेही विरारचे असल्याने एक वेगळं नातं त्यांच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे आयुषने ठोकलेले पहिले शतक पृथ्वीच्या बॅटनेच आलेय. मुंबईच्या रणजी संघात आत्ता अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर व सूर्यकुमार यादव असे एकाहून एक बडे खिलाडी आहेत. त्यांच्याच नजरेखाली मुंबई आणि पर्यायाने भारताचे क्रिकेट आयुषच्या रूपाने वाढतंय.

(Teenager Ayush Mhatre Hits Maiden Ranji Century)

Exit mobile version