Breaking News

Sarfaraz Khan ने अब्बूंचे पांग फेडले! वाचा बाप-लेकाची सिनेमाला लाजवणारी संघर्षगाथा

sarfaraz khan
Photo Courtesy; X

Sarfaraz Khan Story: उत्तर प्रदेशच्या आझमगडवरून मुंबईत रेल्वे जॉबसाठी आलेले नौशाद खान (Naushad Khan). रेल्वेत ग्रेड 4 कर्मचारी. नोकरी लागली तरी क्रिकेटची आवड होती आणि त्यातून सुरू केलं क्रिकेट कोचिंग. अनेक छोटे छोटे खेळाडू त्यांनी घडवले. अशात उत्तर प्रदेशवरूनच आलेल्या एका मुलाला त्यांनी आपलं मानलं आणि आपल्या घरात आपल्या तीन मुलांसारख वाढवलं. पुढे तो खेळाडू आयपीएल आणि रणजी खेळला. अशातच त्यांचा वाद झाला आणि त्या खेळाडूने नौशाद यांच्याशी फारकत घेतली. “इतके चांगले कोच असाल तर तुमच्या मुलांना बनवा क्रिकेटर” असं आव्हान नौशाद यांना आपल्याच शिष्याकडून मिळालं होतं. ते त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी स्वीकारलं आणि सुरू झाला एक अविश्वसनीय प्रवास.

नौशाद यांनी मनाशी चंग बांधला की, आता काही करून माझ्या मुलांना देशासाठी खेळायलाच तयार करणार. सर्फराज (Sarfaraz Khan) तिन्ही मुलांपैकी सगळ्यात जास्त टॅलेंटेड. त्याच्यावरच लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली. मुंबईत एक असं ग्राउंड राहिलं नसेल, जिथे सर्फराजने वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शतक ठोकलं नसेल. आझाद मैदान (Azad Maidan) तर त्यांचं घरचं मैदान बनलं होतं. नौशाद यांनी सर्फराज आणि मुशीर (Musheer Khan) यांच्यात क्रिकेट इतकं भिनवल की, त्यांना शाळेतही जाता येत नव्हतं. फक्त गणित आणि इंग्लिश शिकवायला खाजगी शिक्षक येत असत. मुंबईत पावसात मैदाने खराब होत असल्याने घराच्या अंगणातच सिमेंट पिच बनवून तिथं मुलांचा सराव घेत.

वयाच्या बाराव्या वर्षी 2009 मध्ये सर्फराज खान हे नाव क्रिकेट जगताला समजले. मुंबईच्या हॅरिस शिल्ड या स्पर्धेत रिझवी स्प्रिंगडेल स्कूलसाठी खेळताना 421 चेंडूवर 439 धावा करून सचिन तेंडुलकरचा 1988 मध्ये बनवलेला विक्रम मोडीत काढलेला. त्यानंतर त्याच्या यशाचा आलेख चढत राहिला. मुंबईच्या वयोगट स्पर्धेत त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. पुढच्या पाच वर्षात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या खांद्याला खांद्या लावून आयपीएल खेळत होता. त्याने 2015 मध्ये आयपीएल आणि भारतासाठी अंडर 19 वर्ल्डकप देखील खेळला. तिथं त्याने खऱ्या अर्थाने नाव कमावलं. मात्र, परिस्थिती तशीच राहिली नाही.

 

मधल्या काळात त्याचा फॉर्म गेला. मुंबई सोडून उत्तर प्रदेशसाठी खेळण्याचा निर्णय त्याने घेतला. पहिल्या सीजनमध्ये आयपीएल गाजवल्यानंतर त्याला आरसीबीने रिटेन केले होते. मात्र, त्यांच्यासाठी तो तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही व संघातून बाहेर झाला. मैदाना बाहेर देखील एखाद दुसरा वाद त्याच्याशी जोडला गेला. या साऱ्यातून त्याला फिनिक्स भरारी घ्यायची होती. त्याच्या या कमबॅकची जबाबदारी पुन्हा वडिलांनी घेतली.

उत्तर प्रदेश सोडून पुन्हा मुंबईकडे येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, त्यासाठी कूलिंग ऑफ पिरेड म्हणून त्याला एक सीझन खेळता येणार नव्हतं. हाच वेळ नौशाद व सरफराज यांनी आपला बनवला. दिवसातील 12-12 तास सर्फराज सराव करायचा. अक्षरशः पैसे देऊन संघ बोलावून आपल्या दोन्ही मुलांच्या सरावाची सोय नौशाद करत. मुंबईत पाऊस आल्यामुळे सर्वात खंड पडू नये, यासाठी ते उत्तर प्रदेशला मुलांना घेऊन जात आणि तिथे सराव करायला लावत.

अशात कोविडमूळे त्यांना स्वतःला तयार करण्यासाठी आणखी वेळ मिळाला. त्यानंतर मुंबईसाठी त्याने जो कमबॅक केला तो थेट भारताचा ब्रॅडमन म्हणून. सलग तीन रंणजी हंगामात सर्फराज खोऱ्याने धावा काढत राहिला. शतक, द्विशतक, त्रिशतक सगळं काही त्याच्या बॅटमधून आलं. कोणत्याही सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली की, त्यात सर्फराजचे नाव आहे का? हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुर असायचे. मात्र, ती संधी मिळत नव्हती. सर्फराज निराश होऊन सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करायचा. मात्र, हिम्मत आणि मेहनत यात तडजोड करत नव्हता.

अवघ्या 17 व्या वर्षी रणजी शतक ठोकणारा मुंबईकर Ayush Mhatre? रोहितचा फॅन अन् कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याने बनला

अखेर खान कुटुंबासाठी 2024 हे वर्ष सगळं आनंद घेऊन आलं. वर्षाच्या सुरुवातीला छोटा मुशीर भारताच्या अंडर 19 संघात निवडला गेला. तो वर्ल्डकप त्याने आपल्या ऑलराऊंड खेळाने गाजवला. त्यानंतर मार्च महिन्यात तो क्षण आला जो नौशाद यांनी आपल्याला लहानपणापासून स्वप्नात पाहिला होता. त्यांना स्वतःला भारतासाठी खेळायचं होतं. मात्र, मुलगा सर्फराज याच्या रूपाने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत होतं. इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये सर्फराजच्या डोक्यावर इंडियाची कॅप होती.

सर्फराजने कॅप मिळाल्यानंतर ती आपल्या अब्बूंच्या हातात दिली आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू हे त्यांच्या संघर्षाचे फलित होते हे साऱ्या जगाने पाहिले. पहिल्याच इनिंगमध्ये रनआउट होण्यापूर्वी त्याने दाखवून दिले की, मी क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिल्या तीन टेस्टमध्ये तच्या बॅटमधून तीन फिफ्टी आल्या होत्या.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

आता न्यूझीलंडविरुद्ध त्याने आपल्या करिअरमधील दुसरा मार्क शतकाच्या रूपाने टिक केला. खरी लढाई आता इथून पुढे सुरू होणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रचलेल्या धावांच्या डोंगराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसेच्या तसे उभे करण्याचे आव्हान त्याला स्वतःलाच द्यावे लागेल. त्यामध्ये यशस्वी झाल्यानंतरच नौशाद खान यांच्या कष्टाचे खरे चीज होईल, हे मात्र नक्की! बाकी, नौशाद यांची मान आणखी उंच करायला, मुशीरही तितक्यात ताकतीने तयार आहे. त्याच्याबद्दल नंतर कधीतरी.

(Story Of Sarfaraz Khan And His Father Naushad Khan)

हे देखील वाचा: Tanush Kotian: मुंबईने तयार केला अश्विनचा उत्तराधिकारी! छोट्याशा करिअरमध्ये दाखवला स्पार्क, आकडेवारी एकदमच दर्जा

Exit mobile version